जगामधल्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय रेडिओ
प्रसारण केंद्रांपैकी एक असलेल्या Voice Of America (VOA) नभोवाणी (रेडिओ) केंद्राची सेवा 15 मार्च 2025
पासून बंद करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या
दुसऱ्या कार्यकाळामध्ये अमेरिकन सरकारच्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी पावलं
उचलण्यास सुरुवात केलेली आहे. VOA बंद होणं हा त्याच पावलांचा परिणाम आहे.
राष्ट्रपती ट्रंप यांनी खर्चावर नियंत्रणाबरोबर सरकारी विभागांची
कार्यक्षमता सुधारण्यासाठी Department of Government Efficiency ची स्थापना केली आहे. अब्जाधीश
उद्योगपती एलन मस्क यांच्याकडे जबाबदारी असलेला हा विभाग सरकारी कर्मचाऱ्यांची
संख्या कमी करण्याचा, अनावश्यक सरकारी विभाग बंद करण्याचा किंवा ते इतर विभागात
विलीन करण्याचा राष्ट्रपतींना सल्ला देत आहे. त्यातूनच आधी USAID (Link of article on the USAID) आणि नंतर VOA बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पण या दोन्ही गोष्टी अमेरिकेच्या
परराष्ट्र धोरणाची महत्वाची साधनं होती. त्यामुळं ती बंद करण्याचे निर्णय अमेरिकेच्या
परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीवर काही प्रमाणात विपरीत परिणाम करण्याची शक्यता
आहे.
सरकारी निधीद्वारे चालणाऱ्या VOA ची सुरुवात 1 फेब्रुवारी 1942 ला झाली होती. त्यावेळी
दुसरं महायुद्ध शिगेला पोहचलं होतं. कदाचित #VOA ची सुरुवात या आधीच झाली असती. रेडिओ मॉस्को, बीबीसी यांसारख्या नभोवाणी
केंद्रांचा प्रभाव पाहून अमेरिकेनंही आपलं एखादं आंतरराष्ट्रीय नभोवाणी प्रसारण
केंद्र सुरू करावं अशी मागणी अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडली जात होती. शेवटी दुसऱ्या
महायुद्धाच्या काळातील गरज म्हणून, नाझींच्या प्रचाराला तोंड देण्याच्या हेतूनं अमेरिकेनं
व्हॉईस ऑफ अमेरिका हे नभोवाणी केंद्र सुरू केलं.
VOA चं पहिलं प्रसारण न्यू यॉर्कहून जर्मन भाषेतून झालं होतं. त्यानंतर VOA च्या सेवेचा हळुहळू विस्तार सुरू झाला. दुसऱ्या महायुद्ध
संपेपर्यंत VOA जगभरातील 40 भाषांमधून
प्रसारण करू लागलं होतं. त्याचं प्रसारण न्यू यॉर्क आणि सॅन फ्रॅन्सिस्कोमधल्या
केंद्रांमधून होत असे. पण महायुद्ध संपल्यावर त्यापैकी निम्म्या भाषांचं प्रसारण
बंद करण्यात आलं आणि VOA ला
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत आणण्यात आलं. पण शीतयुद्धाच्या
सुरुवातीच्या काळातच VOA चं महत्व
अमेरिकन सरकारला पुन्हा जाणवू लागलं. त्यानंतर VOA चा विस्तार नव्यानं सुरू करण्यात आला आणि वेगवेगळ्या भाषांमधून प्रसारण सेवा
पुन्हा सुरू होऊ लागली. जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमध्येही, खासकरून अमेरिकेच्या
गटात नसलेल्या देशांच्या भाषांमधून प्रसारण सुरू झालं. त्यातून त्या देशांमधील
जनतेवर प्रभाव टाकण्याचा उद्देश होता.
दुसऱ्या महायुद्धानंतर VOA ला अमेरिकन सरकारच्या U.S.
Agency for Global Media (USAGM) या
स्वतंत्र एजन्सीअंतर्गत आणण्यात आलं. 1954 मध्ये VOA चं मुख्यालय न्यू यॉर्कहून अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन
डी. सी.मध्ये स्थलांतरित करण्यात आलं. अमेरिकन सरकारच्या धोरणांचा प्रचार आणि पत्रकारिता स्वातंत्र्य तसंच
मानवाधिकार यांसारख्या मूल्यांचा प्रसार एकाधिकारशाही, साम्यवाद असलेल्या
देशांमध्ये करणं ही VOA ची उद्दिष्टं
होती. VOA च्या मते, त्याचा भर अचुकता,
वस्तुनिष्ठ आणि सर्वसमावेशक रिपोर्टिंगवर असे.
2025 मध्ये जेव्हा बंद करण्यात आलं, तेव्हा VOA जगातील सर्वांत मोठं नभोवाणी केंद्र बनलं होतं. जगातील 48
भाषांमधून ते विविध कार्यक्रम प्रसारित करत होतं. 2022 मध्ये जगभरात दर आठवड्याला सुमारे 32 कोटी
60 श्रोते VOA चे कार्यक्रम ऐकत असत. त्याआधी
मे 2004 पासून VOA TV चीही
सुरुवात झाली होती.
VOA बंद झाल्याची बातमी आल्यावर मलाही वाईट वाटलं. हे रेडिओ केंद्र गेली अनेक
वर्षे मी ऐकत होतो. त्यावरच्या कार्यक्रमांची मांडणी चांगल्या पद्धतीनं केली जात
असे. कार्यक्रमांच्या सादरीकरणात आक्रस्ताळेपणा नसायचा. मुद्देसूद मांडणी हे या
कार्यक्रमांचं वैशिष्ट्य होतं. प्रसारणाच्या शेवटी महत्वाच्या आंतरराष्ट्रीय
घटनेवर अमेरिकन सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करणारं संपादकीय प्रसारित केलं जात होतं.
काही वर्ष मी या केंद्राच्या हिंदी सेवेचाही नियमित श्रोता होतो. 2008 मध्ये
आलेल्या जागतिक मंदीमध्ये VOA नं
खर्चकपातीसाठी हिंदी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत माझा त्या
केंद्राशी पत्रव्यवहारही नियमित सुरू होता. हिंदी सेवेचे कर्मचारी/निवेदक निहारिका
आचार्य, जगदिश सरीन यांची कार्यक्रम सादर करण्याची एक वेगळी शैली होती. त्यामुळं
ते कार्यक्रम रटाळ, कंटाळवाणे, नकोनकोसे कधी वाटत नव्हते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा