राजधानीची सफर (भाग-1)

 

22221 छत्रपती शिवाजी महाराज (ट) ह. निजामुद्दिन राजधानी एक्सप्रेस.

       तशी माझी दिल्लीला जाण्याची ही सहावी वेळ होती. तरीही दिल्लीला पहिल्यांदाच जात असल्याप्रमाणे माझ्यात उत्साह संचारला होता. माझ्यासाठी दिल्ली आहेच तशी! या आधी केलेले प्रवास किमान महिनाभर आधी ठरवून केलेले होते. गेल्या आठवड्यात मात्र अचानक दिल्लीला जायचं ठरलं, तेही अगदी एकाच दिवसात. आता इतक्या ऐनवेळी राजधानी, दुरोंतोशिवाय अन्य गाड्यांची आरक्षणं मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून मिळताहेत, तोवर लगेच मुंबईहून राजधानीचं आरक्षण करून टाकलं. मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज (ट) (CSMT) वरून सुटणारी आणि मुंबई सेंट्रलवरून सुटणारी ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी यांची आरक्षणं शिल्लक होती. मग पटकन छत्रपती शिवाजी महाराज (ट)वरून सुटणाऱ्या 22221 राजधानी एक्सप्रेसचं आरक्षण करून टाकलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याहून मुंबई गाठली आणि राजधानीची वाट पाहत थांबलो.

      22221 राजधानी ही भारतामधली सर्वात नवी म्हणजे सर्वात अलीकडे सुरू झालेली राजधानी एक्सप्रेस आहे. त्याचबरोबर ढकल-ओढ म्हणजेच  Push-Pull तंत्रज्ञानावर चालणारी ही एकमेव राजधानी एक्सप्रेस आहे. या तंत्रज्ञानामुळे या गाडीला पुढे आणि मागे एक-एक इंजिनं जोडली जातात. अशा गाडीतून माझा पहिलाच प्रवास होणार होता. आधी दिल्लीला जायचंय या विचारानंच उत्साहित झालेलो मी 22221 राजधानीतून प्रवास करण्याच्या विचारानं आणखीनच उत्साहित झालो. गाडी त्या दिवशी लवकरच CSMT च्या 18व्या फलाटावर लावली गेली. HOG तंत्रज्ञानाने युक्त आणि ढकल-ओढसाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा केलेल्या कल्याणच्या एका WAP-7 कार्यअश्वाने (इंजिन/लोको) राजधानीला फलाटावर आणले. संपूर्ण प्रवासात मात्र हा कार्यअश्व राजधानीला ढकलण्याचं काम करणार होता. त्यानंतर पाचच मिनिटांनी कल्याणचा असाच एक विविध तंत्रज्ञानाने युक्त WAP-7 कार्यअश्व गाडीला पुढच्या बाजूला जोडला जाऊ लागला. पॉईंटस्मननं त्या इंजिनाला थोडं लांबच थांबण्याचा इशारा केला आणि तो इंजिनाच्या मधल्या जागेत उतरला. त्यानंतर गाडीचा पहिला डबा आणि इंजिनाचे CBC म्हणजे Central Buffer Coupler कपलर सताड उघडले आणि ते हव्या त्या कोनात असल्याची खात्री फक्त नजरेनं करू लागला. 2-3 वेळा तसं केल्यावर त्याची खात्री पटली आणि त्याने इंजनाला गाडीकडे येण्याचा इशारा केला. मग इंजिनानं गाडीजवळ येऊन हलकी धडक गाडीला दिली अन् धडामकन् आवाज झाला आणि गाडी आणि इंजिनाचं कपलिंग बंद झालं. त्यानंतर ब्रेक पाईप आणि फीड पाईपचीही त्यानं जोडणी केली. पुढच्या इंजिनाची गाडीशी ही मुख्य जोडणी केल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्सही दोन्ही इंजिनं आणि गाडीशी इतर कर्मचाऱ्यांनी जोडल्या. त्याचवेळी तिकडे Hot Buffet Car मधल्या कर्मचाऱ्यांनी गाडीत खानपानाच्या सगळ्या वस्तू चढवण्यास सुरुवात केली होती. या गाडीच्या प्रवाशांचीही आपली जागा पकडण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. मला एक कळालेलं नाही, आपल्याकडे आरक्षण असतं, गाडीला सुटायला अजून बराच वेळ असतो, तरी मग इतकी धावपळ कशाला करायची? तर अशी धावपळ करणाऱ्यांची जरा जास्तच भंबेरी उडत होती, ती केव्हा, तर जेव्हा दुसऱ्याच कोणत्या तरी गाडीचा भोंगा ऐकू आला की.

      आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो, तेव्हा तिथे उशी, पांघरूण, बेडशीट ठेवलेले नव्हते. COVID-19 च्या काळात राजधानी-दुरोंतोमध्ये मिळणारे बेडरोल बंद करण्यात आले होते आणि खिडक्यांचे पदडेही काढून टाकलेले होते. आमच्या जवळच्या सीट्सवर असलेलं कुटुंब गाडीच्या बाहेर उभे होतं बराचवेळ, पण त्यांच्यापैकी एक जण हमालाच्या मदतीने सामान गाडीत आणून ठेवत होता. प्रवासी पाच आणि त्यांच्या पाच भल्यामोठ्या बॅगा आणि मोठी दोन-चार बोचकी असं सगळं सामान लावून झाल्यावर तोही गाडी सुटायची वेळ होईपर्यंत खाली उतरला आणि सोडायला आलेल्यांबरोबर गप्पा मारू लागला.

      माझीही इकडे गाडी सुटण्याआधीची पूर्वतयारी झाली होती. त्याबरोबरच पुढे चालक (लोको पायलट) आणि मागे गार्ड यांचीही गाडी सुरू करण्याआधीची तांत्रिक पूर्वतयारी सुरू होती. राजधानीची जबाबदारी देण्यात आलेले आमचे लोको पायलट आणि गार्डही मोठा अनुभव गाठीशी असलेले होते. अखेर संध्याकाळी ठीक 4 वाजता आमच्या राजधानीनं दिल्लीच्या दिशेनं कूच केलं. गाडी सुटताच पँट्रीच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाचे सीट नंबर आणि रात्रीचं जेवण शाकाहारी की मांसाहारी, सकाळी नाश्ता काय हवा - शाकाहारी की मांसाहारी, शाकाहारी नाश्ता हवा असेल, तर त्यात काय हवं – कटलेट, पोहे, उपमा, हे सगळं त्यानं नोंदवून घेतलं. त्याचवेळी प्रत्येकाला पाण्याची बाटलीही तो देत गेला. आमच्या मागे होते, त्यांनी तिकीट काढताना भाडं कमी लागावं - जेवण-नाश्ता नको - असा पर्याय निवडला होता. पण गाडीत बसल्यावर ते जेवण पाहिजे म्हणत होते. त्यावर तो पँट्रीवाला सांगत होता की, जेवण-नाश्त्याचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. मग ते सगळे म्हणत होते की, तुला 500 रुपये देतो, पण आम्हाला तिघांना त्यात जेवण दे. ज्येष्ठ नागरिक होते ते. मात्र त्यांच्या मागणीला त्या कर्मचाऱ्याने नकार दिला. आमच्या इथे तो ऑर्डर लिहून घ्यायला आला, तेव्हा आमच्या शेजारी असलेल्या कुटुंबातील प्रवाशांची चर्चा रंगली होती, जेवण-नाश्त्यात काय-काय मागवायचं याची. इकडे हे सगळं डब्यात सुरू असताना राजधानीनं अगदी जोरात दादर ओलांडलं. मस्त वाटलं ते दृश्य बघून! इतरवेळी दख्खनच्या राणीतूनच हे दृश्य पाहिलं होतं. दादरनंतर फरक इतकाच दिसला की, राजधानी कल्याणपर्यंत तशीच धडाडत गेली, दख्खनची राणी फक्त दादर ओलांडत असतानाच अशी दणक्यात जात असते. पुढे माटुंग्यापासून हळू होते. दादर ओलांडत असतानाच सगळ्यांना संध्याकाळच्या चहाबरोबरचा अल्पोपहार दिला गेला, गरमागरम सामोसा, सोन केक, डाएट चिवडा आणि चहासाठीची सामग्री. अल्पोपहार करून झाला, तेव्हा राजधानी ठाणे ओलांडत होती. त्याचवेळी चहासाठी कागदी कप आणि थर्मासमधून गरम पाणी दिलं गेलं.

    समांतर धावणारी पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस.   

    दरम्यान, खिडकीतून बाहेर मुंबईचे दृश्य दिसत होतंच. आमच्या राजधानीच्या दोन्ही बाजूंकडून जलद आणि धीम्या लोकल्स पळत होत्याच, अधूनमधून एखादी मेल-एक्सप्रेसही जात होती. चहासाठीच्या सामग्रीतून मग चहा करून घेतला आणि त्याचाही आस्वाद घेण्यास सुरुवात केली. ठाण्यानंतर राजधानी चौथ्या मार्गावरून जाऊ लागली आणि बोगदे ओलांडून दिव्याला आली. पण दिवा तिनं जरा हळुहळूच ओलांडलं. त्यानंतर थोडावेळ पनवेलकडून आलेली पनवेल-गोरखपूर एक्सप्रेसही आमच्याबरोबर समांतर दौडत होती. चहा झाल्यावर आमच्या शेजारच्यांनी घरून आणलेले मांसाहारी जेवणाचे डबे बाहेर काढले आणि ते खाण्यास सुरुवात केली.

      थोड्याच वेळात कल्याणला गाडी पोहचली, अधिकृत वेळेच्या 2 मिनिटं उशिरा. गाडी सुटताच कल्याणला चढलेल्यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप सुरू झाले. आता इथून पुढे मनमाडपर्यंत माझ्यासाठी नवा मार्ग होता. त्या मार्गावरून याआधी मी एकदाच गेलो होतो. त्यालाही आता 17 वर्षे झालीत. कसारा घाटाकडे जात असताना आता मुंबईच्या लोकल्सची गर्दी कमी झालेली होती; कसाऱ्याकडून येणाऱ्या लोकल्स अधूनमधून क्रॉस होत होत्या. आज नागपूरकडून येणाऱ्या गाड्या बऱ्याच उशिराने धावत होत्या. त्यामुळे बऱ्याच गाड्या काही मिनिटांच्या अंतराने आम्हाला क्रॉस होत होत्या. त्यापैकीच एक गोरखपूरहून मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस होती. ती जाणार असल्यामुळे सेक्शन कंट्रोलरच्या सुचनेप्रमाणे एक कंटेनर घेऊन कल्याणच्या दिशेने निघालेली, WDG-4 इंजिन जोडलेली गाडी खडावलीला बाजूला उभी करून ठेवण्यात आली होती. गोरखपूरहून येणाऱ्या गाडीला मार्ग मोकळा करून देण्यासाठी. आम्ही पुढे गेलो आणि मुंबईकडे निघालेली आणखी एक एक्सप्रेस आम्हाला क्रॉस झाली. 17:34 ला कसाऱ्याला राजधानी पोहचली; पण ही ढकल-ओढ तंत्रावर चालणारी असल्यामुळे हिला मागे बँकर जोडण्यासाठी तिथे थांबावे लागले नाही. 

कसारा घाट

आता मी कसारा घाटाचे दृश्य अनुभवू लागलो होतो. घाटात दोन एक्सप्रेस आम्हाला क्रॉस झाल्या. वीसच मिनिटांनी घाटातला प्रवास संपवून ‘राजधानी घाटमाथ्यावरील इगतपुरीत दाखल झाली; पण अन्य गाड्यांप्रमाणे बँकर्स काढण्यासाठी हिला इथे थांबण्याची गरज नव्हती. त्यावेळी कसारा घाट खंडाळा घाटापेक्षा छोटा आहे हे लक्षात आले. इगतपुरीत शिरत असतानाच 12533 लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघून गेली.

      राजधानी 18:23 ला लहावीत ओलांडत असताना तिथे WAP-4 इंजिन सारथ्य करत असलेली 12139 सेवाग्राम एक्सप्रेस बाजूला काढून आम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला होता. आता घड्याळात 18:34 झालेले होते आणि आमची राजधानी नाशिक रोडला दाखल झाली होती. आज इथं ती 16 मिनिटं उशिरा पोहचली होती. कल्याणपेक्षा नाशिक रोडला बरीच गर्दी गाडीत चढली. प्रत्येक जण माझी सीट कुठली हे शोधण्यात गुंतलेला होता. दोनच मिनिटांनी आपला दुसरा थांबा आटपून राजधानी पुढच्या प्रवासाला निघाली. आता पुन्हा नव्या प्रवाशांचे स्वागत पाण्याच्या बाटल्या देऊन करण्यात आले आणि पुन्हा जेवण आणि नाश्ता याबाबतची प्रश्नोत्तरे सुरू झाली. आमच्या मागच्या कंपार्टमेंटमध्ये असलेली लहान मुलं आपापल्यात मस्ती करण्यात आणि त्यांच्याबरोबर असलेले मोठे आपापसांत गप्पा मारण्यात मग्न होते. पुढे चारच मिनिटांनी दक्षिण गंगा अशी ओळख असलेली गोदावरी नदी ओलांडली.
(क्रमश:)

भाग-2 ची लिंक
भाग-3 ची लिंक 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा