पुणे ते लोणावळा

 

       दख्खनच्या राणीला व्हिस्टा डोम डबा जोडला जाणार अशी बातमी आली. त्या डब्यात बसून बोर घाटामधलं निसर्गसौंदर्य आणखी स्पष्टपणे न्याहाळायला मिळणार या विचाराने दख्खनच्या राणीच्या चाहत्या प्रवाशांमध्ये आणि तथाकथित रेल्वेप्रेमींमध्ये उत्साह संचारलेला होता. परिणामी भाडं जास्त असूनही पहिल्या दिवशी या डब्याचं आरक्षण पूर्ण झालं होतं. अनेकांचं प्रतीक्षा यादीतील तिकीट प्रतीक्षा यादीतच राहिलं.

15 ऑगस्टपासून ही नवी सुविधा दख्खनच्या राणीत उपलब्ध होत होती. त्यामुळे मीही या गाडीचं आरक्षण केलं होतं. मीही या निमित्ताने दख्खनच्या राणीनं छोटासा प्रवास करून येऊ, असा विचार करून पुणे ते लोणावळा आणि परत असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पण मी व्हिस्टा डोमचं आरक्षण मुद्दामच केलं नाही.

    त्या दिवशी सकाळी लवकरच पुणे जंक्शनवर पोहचलो होतो. तेव्हा तिथे यूट्यूबर तथाकथित रेल्वेप्रेमींची गर्दी जमू लागली होतीच. मीही गाडीत बसण्याआधी त्या डब्याजवळ गेलो. दख्खनच्या राणीबरोबर व्हिस्टा डोम पहिल्यांदाच धावणार होता, म्हणून त्याला आतून-बाहेरून फुग्यांनी सजवण्यात आलं होतं. 15 ऑगस्टअसल्यामुळे सजावटीसाठी तिरंगी फुग्यांचा वापर करण्यात आलेला होता.

व्हिस्टा डोमच्या दोनच डबे पुढे माझा डबा होता. गाडी सुटायला अजून 15 मिनिटं होती. त्यामुळं माझा डबा बऱ्यापैकी मोकळा होता. पण तो पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये एकदम भरून गेला. मी बाकीच्या गाडीचं निरीक्षण करून माझ्या आरक्षित जागेवर जाऊन बसलो होतोच. गाडीत चाय-चाय-चाय करत रेल्वेच्या केटरिंग सेवेच्या कर्मचाऱ्यांची तुरळक येजा सुरू होती.

गाडी सुरू करण्याचे इंजिनापासून कंट्रोल रूमपर्यंत आणि स्टेशन मास्टरपासून गार्डपर्यंतचे सर्व ठिकाणचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर ठीक सव्वासातला चॉकलेटी रंगातल्या कल्याणच्या डब्ल्यूसीएएम-2 कार्यअश्वासह फलाट क्रमांक 5 वरून दख्खनच्या राणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघाली. फलाट सोडतानाच्या चाकांच्या त्याच टिपिकल ठेक्यात गाडी फलाट सोडणार तोच कोणी तरी साखळी ओढली आणि गाडी थांबली. लोको पायलटनेही सांकेतिक हॉर्न वाजवून तशी सूचना द्यायला सुरुवात केली. पण काही सेकंदांमध्येच दख्खनच्या राणीनं पुन्हा गती घेण्यास सुरुवात केली. एव्हाना आपापल्या आसनांवर स्थानापन्न झालेल्यांमध्ये जे एकेकटे प्रवास करत होते, त्या तरुणाईने कान कधीच हेड फोन लावून बंद करून घेतले होते आणि हातातल्या भ्रमणध्वनीमध्ये डोळे खुपसले होते. जे आपल्या ओळखींच्यांबरोबर प्रवास करत होते त्यांच्या गप्पांना आता कुठे सुरुवात झाली होती. त्यात अजून रंग यायला वेळ होता.

शिवाजीनगर, खडकी, दापोडी अशी स्थानकं ओलांडत असतानाच दख्खनच्या राणीचा विशेष मेन्यू प्रवाशांच्या सेवेत येऊ लागला. पहिल्यांदा आले गरमागरम साबुदाणा वडे. पण मी घेतले नाहीत, कारण मी दख्खनची राणीची स्पेशल कटलेटची वाट बघत होतो.

घड्याळात 7.34 झाले होते. दख्खनची राणी आता चिंचवड ओलांडत होती आणि तिने वेगही चांगला घेतला होता. आता गरमागरम कटलेटही आणले गेलेच. मी त्यांचा आस्वाद घ्यायला सुरुवात करणार तितक्यात शेजारच्या डाऊन मेन लाईनवरून वेरावळहून आलेली 01087 वेरावळ-पुणे जं. विशेष एक्सप्रेस डब्ल्यूएपी-4 कार्यअश्वासह पुण्याच्या दिशेने निघून गेली. आज ती गाडी थोडी उशीराने धावत होती. पुढच्या 4च मिनिटांत दख्खनची राणीने देहू रोड गाठले. तिथे लूप लाईनवर कर्जतच्या दिशेने जाणारी बीसीएन वाघिण्यांची मालगाडी गडद पिवळ्या-निळ्या रंगाच्या तिच्या डब्ल्यूडीजी-4 या कार्यअश्वांसह दख्खनची राणी पुढे जाण्याची वाट पाहत उभी होती. सेक्शन कंट्रोलरच्या आदेशावरून त्या मालगाडीला देहू रोडमध्ये बाजूला काढून दख्खनच्या राणीला प्राधान्याने मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. अशा पद्धतीने दुसऱ्या गाडीला ओलांडून पुढे जाताना ऐकू येणारा चाकांचा खडखडाट खूपच आनंददायी असतो. देहू रोडला पुणे जं.-लखनौ जं. एक्सप्रेसचा मोकळा रेक डाऊन लूप लाईनवर उभा करून ठेवलेला होता. सध्या ती गाडी बंद असल्यामुळे ती निमूटपणे तिथे उभी होती.

        देहू रोडच्या बाहेरच 02940 जयपूर जं.-पुणे जं. विशेष एक्सप्रेस आपल्या पांढऱ्याशुभ्र कार्यअश्वाच्या साथीने (डब्ल्यूएपी-7) आपल्या अंतिम लक्ष्याच्या दिशेने धडाडत गेली. आता रुळांच्या आसपास दाटीवाटीनं असलेली घरं विरळ होऊ लागली होती. त्यामुळे पावसाने झालेला हिरवागार परिसर स्पष्टपणे, अगदी जवळ दिसू लागला होता. बाहेर बरसणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी पाहत माझा गरमागरम कटलेटचा आस्वादही घेऊन झाला होता.पुढच्या चार मिनिटांत तळेगावही गेले. आता जरा पावसाचा जोर वाढलेला होता. बाहेर पावसाळी वातावरण, त्यामुळे झालेला हिरवागार परिसर, त्यातून पळणारी दख्खनची राणी आणि हातात गरमागरम चहा!
     घड्याळात ठीक 7.50 झाले होते. चहा हातातला संपत असतानाच डाऊन लाईनवरून बीसीएन वाघिण्यांची मालगाडी पुण्याच्या दिशेने गेली. कल्याण लोको शेडचे दोन डब्ल्यूसीएजी-1 कार्यअश्व तिचे नेतृत्व करत होते. कामशेतमध्ये स्थानकाच्या आणि रुळांच्या शेजारून वाहणारी इंद्रायणी नदी पाहत असतानाच डाऊन लाईनवरून पांढऱ्याशुभ्र डब्ल्यूएपी-7 अश्वासह 02944 इंदौर जं.-दौंड जं. विशेष एक्सप्रेस पुण्याकडे गेली. अगदी वेगाने! दख्खनची राणी आणि ती गाडी दोघीही वेगाने पळत होत्या, त्यामुळे हे क्रॉसिंग खूपच झटकन झाले.

      आज दख्खनची राणी लोणावळ्यात नियोजित वेळेच्या आधी पोहचत होती. पावसाळ्यामुळे लोणावळ्याच्या जवळपासच्या हिरव्यागार डोंगररांगा ढगांमागे लपलेल्या होत्या. दख्खनची राणी लोणावळ्यात शिरली, तेव्हा अपला जाणाऱ्या दोन मालगाड्या तिथे उभ्या होत्या. दोघींनाही डब्ल्यूडीजी-4 आणि डब्ल्यूडीजी-4डी हे दोन्ही कार्यअश्व जोडलेले होते. एक मालगाडी बीसीएन वाघिण्यांची आणि दुसरी बॉक्सएन वाघिण्यांची होती. त्या वाघिण्यांची तिथे तपासणी सुरू होती. ती पूर्ण झाली की, त्या कर्जतच्या दिशेने प्रस्थान करणार होत्या. त्यावेळी डाऊन दिशेने जाणारी बीटीपीएन वाघिण्यांची तिसरी मालगाडी दोन डब्ल्यूडीजी-4 कार्यश्वांसह पुण्याच्या दिशेने निघण्यासाठी स्टार्टर सिग्नलची वाट बघत उभी होती. तिला अजून तिथं रोखून धरण्यात आलं होतं, कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या इंद्रायणी विशेष एक्सप्रेसला मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. नियोजित वेळेच्या तीन मिनिटं आधीच दख्खनची राणी फलाटावर पोहचत असताना इंद्रायणी विशेष शेजारून निघून गेली. मी उतरत होतो, तेव्हा पॉईंट्समन दख्खनच्या राणीच्या गार्डला कॉशन ऑर्डर देत असलेला दिसला.
    लोणावळ्यात मी उतरल्यावर लगेच गाडीच्या मागच्या दिशेने, व्हिस्टा डोमकडे गेलो. तिथे चढणाऱ्या-उतरणाऱ्या प्रवाशांपेक्षा तथाकथित रेल्वेप्रेमींची व्ह्लॉग करण्यासाठीची धडपड जास्त दिसत होती. इथं थोडी जास्तच रेंगाळून मग दख्खनची राणी पुढच्या प्रवासाला निघाली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा