![]() |
पालासिओ रेआल दे माद्रिद (स्रोत- https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/f/f7/Madrid_May_2014-34a.jpg) |
स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये वसलेला ‘पालासिओ रेआल’ (रॉयल पॅलेस) स्पॅनिश राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान होते. जगातील अतिभव्य राजवाड्यांपैकी एक असलेला हा राजवाडा खुला होऊन २०२१ मध्ये २६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या राजवाड्यात तब्बल २८०० प्रशस्त कक्ष आहेत. सध्या या राजवाड्यात स्पॅनिश राजांचे वास्तव्य नसले तरी त्याचा वापर प्रामुख्याने राजकीय समारंभासाठी होत आहे.
रॉयल पॅलेस
(स्पॅनिश भाषेतील मूळ नाव – पालासिओ रेआल दे माद्रिद) माद्रिदच्या मध्यभागी वसलेला
आहे. हा राजवाडा ‘पालासिओ दे ओरिएन्ते’ या नावानेही ओळखला जातो. स्पॅनिश राजांचे हे अधिकृत निवासस्थान असल्यामुळे स्पेनमध्ये
या वास्तुला अतिशय मानाचे स्थान लाभले. सन १९३१ पर्यंत याच राजवाड्यात स्पॅनिश राजघराण्याचे
वास्तव्य होते. त्यानंतर स्पॅनिश राजांनी आपला मुक्काम माद्रिदच्या बाहेर असलेल्या
‘पालासिओ रेआल’पेक्षा छोट्या ‘पालासिओ दे ला झार्झुएला’मध्ये हलविला.
‘पालासिओ रेआल’
उभारला जाण्याआधी तेथे ‘रेआल आल्काझार’ म्हणजेच भुईकोट अस्तित्वात होता. पण त्या आधीपासून ही जागा स्पेनमधील राजकीय घडामोडींचा
केंद्रबिंदू राहिली होती. या जागेवर दहाव्या शतकात एक भुईकोट बांधण्यात आला होता. त्यावेळी
इबेरियन द्वीपकल्पाचा बहुतांश भाग अरब राजवटींच्या अधिपत्त्याखाली होता.
कोर्डोबाचा अमीर महंमद (पहिला) याने आपली स्पेनमध्ये सत्ता स्थापन केल्यावर हा
किल्ला बांधला होता. अकराव्या शतकाच्या सुरुवातीला तेथे स्वतंत्र तोलेदो राज्याची निर्मिती
करण्यात आली. पुढे १०८५ मध्ये कास्तिले राज्याच्या आलोन्सो (चौथा) याने तोलेदोवर ताबा
मिळविला. चौदाव्या शतकात अरबांचा पराभव झाल्यावर सन १३२९ मध्ये स्पॅनिश राजा
आल्फान्सो (अकरावा) याने त्याचा दरबार माद्रिदमध्ये भरविला. त्यानंतर सोळाव्या
शतकापर्यंत त्या किल्ल्यातील आरेखनामध्ये बदल करण्यात आले नाहीत.
पंधराव्या शतकाच्या
अखेरीस युरोपात अंधारयुगाचा शेवट होऊन आधुनिकतेचे वारे वाहू लागले होते. औद्योगिक
क्रांतीला सुरुवात झाल्यावर युरोपातील विविध सत्तांनी जगातील नवनवीन प्रदेशांच्या शोधासाठी
अनेक सागरी मोहिमा आखल्या आणि नव्या प्रदेशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्यास
सुरुवात केली. त्या काळात अशा शोधमोहिमा राबविण्यात स्पेन आघाडीवर होता.
ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिगो आदींनी धाडसी सागरी मोहिमा राबवून नवनव्या
भूप्रदेशांचा शोध घेतला होता. परिणामी त्या काळात ज्ञात झालेल्या जगापैकी निम्म्या
प्रदेशावर स्पेनची सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे राज्यकारभाराचा वाढलेला
व्याप सांभाळण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी राजधानी आणण्याचा निर्णय घेण्यात
आला. १५६१ मध्ये स्पेनचा राजा फिलीप (दुसरा) याने आपला दरबार माद्रिदमध्ये आणल्यावर
आल्काझारच्या जागी नव्याने किल्ला उभारण्यात आला. मात्र १७३४ मध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला
हा संपूर्ण किल्ला आगीच्या भक्षस्थानी पडला. त्यामुळे तत्कालीन राजा फिलीप (पाचवा)
याने याच जागेवर एक नवा आणि स्पॅनिश साम्राज्याच्या वैभवाला साजेसा राजवाडा उभारण्याचे
आदेश दिले.
या नव्या
राजवाड्याचे बांधकाम १७३८ ते १७६४ दरम्यान चालले. या वास्तूत स्पॅनिश राजाचे वास्तव्य
असल्यामुळे तो पुढे रॉयल पॅलेस (पालासिओ रेआल) म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘पालासिओ
रेआल’चे प्राथमिक टप्पातील आरेखन फिलिपो युवारा व जी.बी. साच्चेट्टी या इटालियन
वास्तुतज्ज्ञांनी केले आहे. युवारा यानेच फिलीपे (पाचवा) याच्या दरबाराचाही या
नव्या वास्तुच्या आरेखनात समावेश केला.
या तीन मजली आयताकृती राजवाड्यामध्ये तब्बल २८०० आलिशान कक्ष, ४४ आकर्षक जिने
आहेत. यातील प्रत्येक कक्षामध्ये उच्च दर्जाची वैशिष्ट्यपूर्ण सजावट करण्यात आली आहे.
सालोन दे लोस आलाबार्देलोस, स्तंभ कक्ष (स्पॅनिश भाषेतील नाव- सालोन दे लास
कोलुमनास), सिंहासन कक्ष (साला देल त्रानो), गॅस्परिनी कक्ष (सालितास गास्पारिनी),
पोर्सेलन कक्ष (साला दे पोर्सेलानास) आदी कक्ष आहेत. तसेच राजघराण्यातील
व्यक्तींना आणि सरदारांना राहण्यासाठी कक्ष, सेवकांचे कक्ष, प्रशासकीय कार्यालय
आही कक्षही येथे आहेत.
‘पालासिओ रेआल’च्या प्रत्येक दिशेचे आरेखन वेगळ्या प्रकारचे आहे. राजवाड्याच्या बांधकामात चुनखडक आणि ग्रॅनाईटचा वापर बऱ्याच प्रमाणात करण्यात आला आहे. राजवाड्याच्या पूर्वेकडील भाग सहा मजली असून उत्तर आणि पश्चिमेकडे तळघरेही बांधलेली आहेत. राजवाड्याच्या पहिल्या दोन मजल्यांच्या भिंतींचा बाह्यभाग आयताकृती दगडांच्या मोठ्या आकारातील ठोकळ्यांपासून बनविलेला आहे. त्यावरील दोन मजल्यांवर पांढऱ्या रंगातील अखंड दुमजली स्तंभ तयार करण्यात आले आहेत.
![]() |
राजवाड्याच्या दर्शनी भागावर बसवलेली फिलीप (पाचवा) याची राजमुद्रा. (स्रोत-File:Royal Palace of Madrid 01.jpg - Wikimedia Commons) |
राजवाड्याच्या दक्षिणेकडील बाजूच्या आल्मुदेना कॅथेड्रलसमोर असलेल्या भव्य संचलन प्रांगण असून त्याच्या समोर उंच कुंपण बसविलेले आहे. राजा चार्लस् (तिसरा) याच्या काळात ‘पालासिओ रेआल’मध्ये काही आकर्षक कक्ष तयार करण्यात आले. त्यात राजाकडे आलेल्या विशेष पाहुण्यांसाठी २५२ कक्ष, राजघराण्याची बॉलरुम, स्वागतकक्ष, संगीतकक्ष आदींचा समावेश होतो. ‘पालासिओ रेआल’मध्येच राजघराण्यातील व्यक्तींसाठी ‘बॅसिलिका’ (राजाचे चर्च) उभारण्यात आले आहे. 'ला रेआल आर्मेरिया' (शस्त्रास्त्र कक्ष) येथे राजांकडून वापरली गेलेली शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली आहे.
राजवाड्यातील तीन कक्षांचे एकत्रीकरण करून १८८५ मध्ये अवाढव्य भोजनकक्ष तयार करण्यात आला. त्यावेळी त्या तीन कक्षांच्या सीमेवरील स्तंभांवर आणखी आकर्षक सजावट करण्यात आली. या कक्षाच्या छतावर अप्रतिम चित्रे रंगविण्यात आली आहेत. गास्पारिनी कक्षाला त्याची निर्मिती करणाऱ्या मातेओ गास्पारिनी याचे नाव देण्यात आले आहे. या कक्षाच्या भिंती आणि छतावर सोनेरी आणि चंदेरी रंगांमध्ये कलाकुसर केलेली आहे. येथील भिंती रेशमी एम्ब्रॉयडरीने सजविलेल्या आहेत. याची सजावट गिओवानी बातिस्ता तिपोलो याने केलेली आहे. या कक्षाच्या भिंतीवर सजावटीसाठी मखमलीचा वापर करण्यात आला आहे. छतावर तत्कालीन स्पॅनिश साम्राज्याची ओळख करून देणारी चित्रे काढण्यात आली आहेत. या कक्षात जमिनीवर उंची गालिचे अंथरण्यात आले आहेत. यातील सिंहासनाच्या पायथ्याशी कांस्य धातूत घडविलेल्या सिंहांच्या प्रतिमा बसविण्यात आलेल्या आहेत. मातेओ बोनिसेली याने ही शिल्पे तयार केलेली आहेत. येथील भिंतींवर बारीक कलाकुसर केलेल्या सोनेरी फ्रेममध्ये मोठे आरसे बसविलेले असून प्रत्येक आरशाजवळ सोनेरी टेबल ठेवण्यात आले आहे. त्या टेबलांवर अतिशय आकर्षक कलाकुसर केलेले मेणबत्त्यांचे स्टँड ठेवण्यात आलेले आहे. या कक्षात जमिनीपेक्षा थोड्या उंचीवर स्पॅनिश राजा आणि राणीची सोन्याची सिंहासने ठेवलेली आहेत. म्हणूनच स्पॅनिश साम्राज्याच्या वैभवाची झलक या कक्षात पाहायला मिळते.
‘सिंहासन कक्षा’च्या छताच्या एका भागावर ऑलिंपस आणि अन्य देवांच्या कथांवर आधारित घटना
चितारण्यात आल्या आहेत. दुसऱ्या भागात स्पेनमधील राज्यांचे आणि जगभरातील स्पॅनिश
वसाहतींचे प्रतिनिधित्व करणारी चित्रे काढण्यात आलेली आहेत.
‘पोर्सेलन कक्षा’ची निर्मिती १७७१ मध्ये पूर्ण झाली. या
कक्षाच्या भिंती सजविण्यासाठी चिनी माती आणि हिरव्या व पांढऱ्या रंगाचा आकर्षक
पद्धतीने उपयोग करण्यात आला आहे. ‘पालासिओ रेआल’मधील एका कक्षात राजाचे ग्रंथालय
(स्पॅनिश भाषेतील नाव – बिब्लिओतेका रेआल) आहे. ‘रॉयल फार्मसी’मध्ये राजघराण्यातील व्यक्तींच्या उपचाराची सोय
करण्यात आली होती. पूर्वीच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींवर उपचार करण्यासाठी वापरण्यात
येणाऱ्या साधनांचे संग्रहालय आता या कक्षात उघडण्यात आले आहे.
राजवाड्यातील प्रत्येक
कक्षाचे छत आतील बाजूने घुमटाकृती असून त्यावर विविध प्रकारची चित्रे रंगविलेली
आहेत. त्या सर्व चित्रांना सोनेरी आणि अन्य रंगातील फ्रेम करण्यात आल्या आहेत.
काही कक्षातील चित्रांच्या कोपऱ्यांवर छोटी-छोटी शिल्पेही बसविलेली आहेत. या
राजवाड्यात जवळजवळ २४० व्हरांडे तयार केलेले आहेत. या इमारतीतील जिनेही तिच्या
सौंदर्यात भर घालण्याचेच काम करत आहेत.
‘पालासिओ रेआल’च्या
पश्चिमेच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या मार्गावर ‘प्लाझा दे ओरिएन्ते’ तयार करण्यात आलेला आहे. एकोणिसाव्या शतकात
फ्रान्सचा सम्राट नेपोलियनच्या भावाच्या आदेशावरून याची निर्मिती करण्यात आली आहे.
‘पालासिओ रेआल’च्या अतिभव्य परिसरात अनेक उद्याने विकसित करण्यात आलेली आहेत. त्यातील
यार्दिनेस दे साबातिनी हे मुख्य उद्यान आहे. येथे अनेक शिल्पे आणि कारंजे बसविलेले
आहेत. येथेच राजा फेलिपे (चौथा) याचा आकर्षक अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. मात्र
राजवाड्याच्या पश्चिमेला असलेले ‘काम्पो देल मोरो’ हे उद्यान यापेक्षाही मोठे असून राजघराण्यातील व्यक्ती पूर्वी त्याचा वापर
क्रीडांगणाप्रमाणे करत असत. ‘पालासिओ रेआल’मधील तळघर येथूनच दिसते. ‘पालासिओ रेआल’च्या
मुख्य इमारतीसमोर भव्य प्रांगण आहे. तेथे दिव्यांचे जुन्या पद्धतीचे आकर्षक खांब
उभारलेले आहेत.
Thanks
उत्तर द्याहटवा👌👌👍
उत्तर द्याहटवाछान लेख!!
हटवा