....आणि अपघात होता होता टळला (भाग-2)

…. आणि अपघात होता होता टळला (भाग-1)

आता मनमाडहून तिहेरी मार्ग सुरू झाला होता आणि गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली होती. मनमाडनंतर पाचच मिनिटांनी पुढच्या पाणेवाडी स्टेशनमध्ये पनवेल-गोरखपूर एक्सप्रेसला ओव्हरटेक केलं आणि त्याचवेळी शेजारून कोल्हापूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस मनमाडकडे गेली. पुढच्या हिसवाल स्टेशनमध्ये परत एका मालगाडीला आम्ही ओव्हरटेक केलं. स्टेशनमधून बाहेर आल्यावर दानापूर-पुणे एक्सप्रेस क्रॉस झाली. आमच्या गाडीचा वेग आता चांगलाच वाढला होता. त्यानंतर आम्ही नांदगाव स्टेशनला आलो, तेव्हा तिथून WAG-7 आणि WDG-4D आणि WDG-4 अशी तीन इंजिनांची मालगाडी मनमाडच्या दिशेनं सुटत होती. तिला तिथं बराच वेळ थांबवून ठेवलेलं असावं. त्याचवेळी तिच्या पलीकडच्या दोन लाईन्सवर दोन मालगाड्या त्यांच्या-त्यांच्या इंजिनांसह विश्रांती घेत उभ्या होत्या. आता इथून पुढं पुन्हा दुहेरी मार्ग सुरू झाला असला तरी तिसऱ्या मार्गाचं कामही सुरू होतं. याचवेळी मधल्या एका छोट्या पुलाचं काम सुरू असल्यामुळं गाडी जरा हळू धावू लागली.

      20.56 ला पिंपळखेड सोडलं आणि पुन्हा तिहेरी मार्ग सुरू झाला. रात्री 9.14 ला चाळीसगाव जंक्शन वेगानं क्रॉस करत असताना तिथं उभी असलेली 11058 अमृतसर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस नजरेस पडली. पूर्वी धुळ्याहून मुंबईसाठीचे दोन डबे पॅसेंजरबरोबर चाळीसगावमध्ये येत असत आणि इथंच ते नंतर अमृतसरहून आलेल्या या गाडीला जोडले जायचे. तेव्हा ती गाडी अमृतसर-दादर अशी होती. चाळीसगावमध्येच भुसावळकडे निघालेली डबल WAG-9 इंजिनं जोडलेली एक कोळशाची मालगाडी आमची गाडी पुढं जाण्याची वाट पाहत उभी होती.

वाघलीनंतर पुन्हा दुहेरी मार्ग सुरू झाला. पण तिसऱ्या मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं दिसत होतं. दर पाच मिनिटांनी गाड्या शेजारून क्रॉस होतच राहिल्या. रात्री 9.43 ला पाचोरा जंक्शन क्रॉस केलं. पूर्वी इथून जामनेरला नॅरो गेज रेल्वेगाडी जात होती. पण आता त्या नॅरो गेज लाईनचं ब्रॉडगेजमध्ये रुपांतर सुरू आहे. पाचोऱ्यानंतर पुन्हा तिहेरी मार्ग सुरू झाला. दरम्यान, माझ्या कंपार्टमेंटच्या दुसऱ्या बाजूच्या सीटवर पुण्यापासून बसलेल्या तरुणांची आता ओळख झाली होती आणि त्यांची नोकरी या विषयावर चर्चा सुरू झाली होती. करियर विश्वात असलेल्या समस्या आणि इतर गोष्टींचा त्यात समावेश होता.

      रात्री 10.11 ला ऐतिहासिक हावडा-मुंबई मेल क्रॉस झाली, तेव्हा आमची गाडी जरा हळू धावू लागली होती. त्यानंतर 22.16 ला जळगाव जंक्शन ओलांडत असताना शेजारच्या प्लॅटफॉर्मवर उभी असलेली नागपूरहून मुंबईकडे निघालेली सेवाग्राम एक्सप्रेस दृष्टीस पडली. त्यानंतर आमची गाडी भुसावळच्या होम सिग्नलला दोन मिनिटं थांबली, कारण रक्सौलहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे निघालेली एक्सप्रेस भुसावळमधून बाहेर पडत होती. शेवटी 22.42 ला आमची गाडी भुसावळमध्ये पोहचली. इथं आमचा जवळजवळ निम्मा प्रवास संपला होता. इथं गाडीचे चालक आणि गार्ड बदलले गेले. त्यामुळं त्यांच्याबरोबर असणाऱ्या वेगवेगळ्या साधनसामग्रीच्या ट्रंकाही चढवल्या-उतरवल्या गेल्या. एकीकडे हे सगळं सुरू असताना बाहेर आमच्या डब्यासमोरच उभ्या असलेल्या वेफर्सवाल्याकडून आमच्यापैकी बऱ्याच जणांनी भरपूर पुडे खरेदी केले होते. यादरम्यान, अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 5 नंबरवर येऊन उभी राहिली. तिचेही चालक-गार्ड इथं बदलले जाणार होते. भुसावळच्या एका फलाटाकडे मला लांबूनच स्थानकाच्या जुन्या इमारतीचा भागही दिसत होता. अलीकडेच त्यावर वेगवेगळ्या रंगात रेखाटनं केलेलं दिसत होतं.

भुसावळ जं.

      आठ मिनिटांनंतर भुसावळचा थांबा आटपून आमची गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. आता डब्यात प्रवाशांची हळुहळू निद्रेची तयारी सुरू झाली होती. दौंडमध्ये आलेल्यांच्यातल्या 7-8 वर्षांच्या लहान मुलाला झोपायचं होतं, पण झोप येत नव्हती. असं काही तरी त्याचं झालं होतं. शेवटी तो उठून बसला आणि त्यानं मला विचारलं, काका, आता कोणतं स्टेशन येणार आहे?”. मी सांगितल्यावर पुन्हा विचारलं, मग?” परत विचारलं, मग?” मी सांगितल्यावर म्हणाला, म्हणजे नागपूर आता तीन स्टेशन लांब राहिलं आहे. मी हो म्हटल्यावर त्यांच्याबरोबरचेही त्याला सांगू लागले. त्यातच गाडी भुसावळच्या नागपूरकडच्या केबीनजवळ येऊन तीन मिनिटं थांबली. नंतर ताशी 30 किलोमीटरच्या वेगानं धावू लागली, कारण पुढं असलेल्या Road Under Bridge चं काम सुरू होतं. त्यानंतरच्या एका छोट्या नाल्यावरच्या पुलाचंही काम सुरू होतं. हे दोन भाग पार केल्यावर मात्र गाडीनं मस्त वेग घेतला. शेजारून धडाधड एक्सप्रेस आणि मालगाडया भुसावळकडं जात होत्या.

      भुसावळला माझ्या समोरच्या सीटवर आलेल्या दोन तरुणांची समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणावर चर्चा रंगत चालली होती. त्याचदरम्यान मध्यरात्री बारा वाजून तीन मिनिटांनी नांदुराचा थांबा आवरून आमची गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. 00.13 ला जालंब जंक्शनही वेगात ओलांडत असताना पलिकडच्या फलाटावर आमच्यासाठी सेवाग्राम एक्सप्रेसला रोखून धरण्यात आलेलं होतं. पुढं सातच मिनिटांनी नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस शेजारून गेली. माझा परतीचा प्रवास याच गाडीनं होणार होता. तिच्या पाठोपाठ हावडा-मुंबई एसी दुरंतोही गेली. बाहेर वाढलेली थंडी आता गाडीच्या वेगामुळं चांगलीच जाणवू लागली होती. त्यातच माझ्या समोरची खिडकी पूर्ण बंद होत नव्हती आणि माझ्या खिडकीच्या वरच्या हलणाऱ्या पत्र्यातूनही गार वारं लागत होतं. त्यामुळं सगळ्यांनी आता गरम कपडे परिधान केलेले होते. थोड्याच वेळानं म्हणजे 00.42 ला गाडी अकोल्याला पोहचली. तिथं काही जण आत चढले आणि बसण्यासाठी जागा शोधू लागले. पण सगळ्यांनी त्यांना सांगितलं की, हा रिझर्वेशन डबा आहे. मग एकानं त्यांना विचारलं की, कुठं जायचं आहे. मग त्यांनी सांगितल्यावर तो त्यांना म्हणाला की, मागून सेवाग्राम येत आहे, त्यानं जा तुम्ही. मग सगळे पटकन खाली उतरले. अकोल्यात बरीच WDG-4D, WDP-4D इंजिनं यार्डात विश्रांती घेत असलेली दिसली. अकोल्यातून चार दिशांना चार मार्ग जात असल्यामुळं इथं जास्त संख्येनं ही इंजिनं दिसत होती.

      अकोल्यानंतर आमच्या गाडीनं पुन्हा वेग धरला. गाडीत आता बरेच जण गाढ निद्रेत होते. स्टेशनमागून स्टेशन पार करत आमची गाडी सुसाट निघाली होती. शेजारून अकोला/भुसावळच्या दिशेनंही गाड्या सुसाट जात होत्या. मध्यरात्री 1.15 ला मुर्तिजापूर जंक्शनही वेगातच ओलांडलं. त्यानंतर पाचएक मिनिटांनी अचानक गाडीत कोणी तरी चेन ओढल्यासारखा ब्रेक प्रेशरचा आवाज झाला. माझ्या मनात आलं की, अकोला जाऊन बराच वेळ झाला आहे, मग आत्ता चेन कोणी आणि कशासाठी ओढली असेल. जवळजवळ 120 च्या वेगानं पळत असलेली गाडी अचानक थांबू लागली होती. वेग खूप असल्यामुळं ती मुर्तिजापूरच्या पुढच्या माना स्टेशनच्या बाहेर जाऊन थांबली. काय झालं असेल, अशा विचारानं मी खिडकीतून डोकावून बाहेर बघत होतो, तेव्हा पुढं बारीकबारीक लाईट दिसत होते आणि तिथं काही लोकं काहीतरी शोधत आहेत असं वाटत होतं. गार्डलाही (ट्रेन मॅनेजर) शंका आली असल्यामुळं त्याचा चालकाशी वॉकीटॉकीवरून संपर्क झाला होता. त्याचवेळी पुढच्या-मागच्या स्टेशनच्या मास्तरांशी त्यांनी तातडीनं संपर्क करून झालेल्या प्रकाराची माहिती दिलेली होती. याची माहिती भुसावळच्या कंट्रोल ऑफिसलाही कळवण्यात आलेली होती. त्यामुळं आमच्या मागून येणाऱ्या सगळ्या गाड्या जागोजागी थांबून राहिलेल्या होत्या. आमचा गार्डही गाडीतून उतरून काय झालं आहे हे वघायला पुढं गेलेला होता.

      दरम्यान, 1.56 ला एक एक्सप्रेस जोरानं हॉर्न वाजवत शेजारून अकोल्याच्या दिशेनं गेली. आमची गाडी आता एकाच जागी थांबून अर्धा तास उलटून गेलेला होता. त्यामुळं काही तरी गडबड आहे हे लक्षात आलं होतं. पुढं इंजिनाच्या बाजूला अजूनही काही तरी शोधाशोध करत असलेले मिणमिणते दिवे दिसत होतेच. मागूनही बराच वेळ दिसणारा एक मोठा सर्च लाईट जवळ जवळ येऊ लागला होता. या मार्गावर गस्त घालणाऱ्या गँगमनच्या हातामधला तो लाईट होता हे आता समजलं होतं. एकूण घडलेला प्रकार पाहून त्याच्याशीही स्टेशन मास्तरांनी संपर्क केला होता. तोच आता रुळांवर काही दिसत आहे का ते पाहत येत होता. तो आमच्या शेजारून जात असतानाच त्याला साहेबाचा फोन आला होता. तो फोनवर त्याला सांगत होता, हां, आ रहा हूं साब!”

                असाच आणखी थोडा वेळ गेला. जागा मिळेल तिथं झोपलेले गाडीमधले काही जण अजून गाढ झोपेत होते, तर काही जण जरा जागे होऊ लागले होते. कारण आरक्षणाविना प्रवास करणाऱ्या त्या महिलेचा दोन-अडीच वर्षांचा मुलगा जोरजोरात रडू लागला होता. त्याची आई त्याच्यावर ओरडत होती. शेवटी तिनं वरच्या समोरासमोरच्या दोन सीटांना शालीची टोकं बांधून तयार केलेल्या पाळण्यात त्या मुलाला झोपवलं होतं.

दरम्यान, आता अडीच वाजून गेले होते. पुढून मागे गाडीच्या चाकांची तपासणी करत आलेले काही कर्मचारी आमच्या डब्याजवळ आल्यावर पलीकडे बसलेल्या तरुणांनी त्यांना विचारलं, क्या हो गया है जी? गाड़ी क्यों रुकी है इतनी देर?” त्यावर त्यांनी त्याला सांगितलं की, रुळावर दरवाजा पडला होता. त्याला गाडी धडकली आहे. मग लक्षात आलं की, मगाशी गाडी सुसाट धावत असताना रुळावर पडलेला डब्याच्या दरवाजाचा भाग गाडीवर आदळला होता. म्हणून चालकानं इमर्जंसी ब्रेक लावला होता. त्याचाच तो प्रेशरचा आवाज होता. तो दरवाजा कुठं आहे आणि गाडीला काही झालं आहे का याची तपासणी सुरू होती. आणखी काही वेळानं आमच्या गाडीचा गार्ड माझ्या सीटखाली असलेल्या ब्रेक सिलिंडरमधलं प्रेशर कमी करत होता, तेव्हा माझ्या समोरच्या सीटवर बसलेल्या तरुणानं माझ्या खिडकीतून त्याला विचारलं की, सर, क्या हुआ है। गाड़ी इतनी देर क्यों रुकी हुई है। त्यावर त्यानं उत्तर दिलं की, क्या बताऊं। बहुत कुछ हो गया है। मग तो तरुण त्याला म्हणाला की, कुछ तो बताईएं। पण आता गाडी पुढं न्यायची असल्यामुळं गार्ड त्याच्या केबिनमध्ये चढण्याच्या तयारीत होता. चालकानं हॉर्न वाजवल्यामुळं तो गोंधळला आणि अरे रुको, अरे रुको करत चुकून आमच्या इथंच चढू लागला. पण मग - अरे ये जनरल सेक्शन है – म्हणत त्याच्या केबिनच्या जवळ गेला. त्याच्या केबिनचं दार उघडण्याचा प्रयत्न करत होता. पण इकडचं दार त्यानं आधीच आतून लॉक केलेलं होतं. मग तो परत डब्याला वळसा घालून जायला बघत असतानाच एका कर्मचाऱ्यानं पलिकडून आत जाऊन त्याला दार उघडून दिलं.

माना स्टेशन

      या सगळ्या प्रकारात आमची गाडी 1 तास 50 मिनिटं एकाच जागी थांबून असल्यामुळं मागं गाड्यांची रांग लागली होती. म्हणून शेवटी आमच्या गाडीला सेक्शन कंट्रोलरनं माना स्टेशनमध्ये घेण्यास सांगितलं आणि पहाटे 3.14 आमची गाडी अगदी हळुहळू स्टेशनमध्ये नेण्यात आली. त्यानंतर तिथं आमच्या गाडीसाठी लुपवर घेतल्या WDG-4 आणि WDG4D इंजिनांच्या मालगाडीला पुढं वर्ध्याच्या दिशेनं सोडून देण्यात आलं. कारण मानामध्ये परत एकदा आमच्या गाडीच्या चाकांची पूर्ण तपासणी केली जाणार होती. तसंच मागं अडकून पडलेल्या गाड्यांनाही पुढं सोडून द्यायचं होतं. मानामधून मालगाडी पुढं सोडल्यावर पाठोपाठ सेवाग्राम, नागपूर दुरंतो आणि काही मालगाड्यांनाही पुढं सोडून दिलं गेलं. मानामध्ये तपासणी झाल्यावर सगळं ओके आहे असं समजल्यावर या संपूर्ण प्रकाराची स्टेशन बुकमध्ये नोंद करण्यात आली आणि दीड तासानंतर आमची गाडी मानाहून पुढं निघाली. या सगळ्या प्रकारामुळं तीन तास 20 मिनिटं गाडी थांबून होती. मानामधून निघाल्यावर लगेचच गाडीनं पुन्हा पहिल्यासारखा वेग घेतला.

      वर्ध्यापासून उगवत्या सूर्याच्या साक्षीनं प्रवास सुरू झाला होता. सेवाग्रामपासून चौपदरी मार्ग सुरू झाला होता. काही ठिकाणी त्याचं काम पूर्ण व्हायचं होतं. डब्यामधले बरेच जण आता उठले होते. मध्यरात्री झालेल्या प्रकाराची काहींना कल्पना होती, तर काहींना त्याचा पत्ताही नव्हता. दौंडपासून बसलेल्यांमधल्या बाईंनी बरच्या बाजूला झोपलेल्या त्यांच्या भावाला सांगितलं की, गाडी रात्री दीड तास एकाच जागी थांबून होती. तो म्हणाला की, त्याला झोप लागली असल्यामुळं समजलं नाही. गारेगार थंडीत खिडकीतून येत असलेलं कोवळं ऊन अंगावर घेत आणि संपूर्ण परिसर 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच न्याहाळत माझा प्रवास सुरू होता. शेवटी आमची गाडी सकाळी 7.53 ला गाडी नागपूर जंक्शनच्या 4 नंबरच्या फलाटावर दाखल झाली. उतरल्यावर पुढच्या डब्यांमध्ये असलेल्या माझ्या नातलगांना मी विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, रात्री डब्याखालून खूप जोरात धाडधाड आवाज आला होता. काही तरी आदळत असल्यासारखं वाटत होतं. एकूणच असं वाटत होतं की, गाडी घसरवण्याच्या उद्देशानं कोणी तरी हे केलेलं तर नसेल. कारण सध्या असे प्रकार होताना दिसत आहेत.

टिप्पण्या