बोगी-वोगी : रेस्टॉरंट ऑन व्हिल्स


Bogie-Wogie Restaurant on Wheels
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai

      मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात अलीकडेच Bogie-Wogie हे रेल्वेच्या डब्यामधले रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू झालेले आहे. त्या संबंधीची बातमी मला रेल्वेच्या वेबसाईटवरून समजली आणि तेव्हाच ठरवून टाकले की, मुंबईला गेल्यावर त्या रेस्टॉरंटमध्ये नक्की जायचं म्हणून. लगेचच तो योग आलाही. सकाळी दख्खनच्या राणीनं मुंबईत पोहचलो. त्यानंतर एक-दोन ठिकाणी जायचं होतं, ते करून दुपारी जेवणाच्यावेळी या रेस्टॉरंट ऑन व्हिल्समध्ये गेलो.

      रेल्वेच्या जुन्या प्रवासी डब्याची अंतर्गत पुन:रचना करून त्यामध्ये रेस्टॉरंट सुरू करण्याची संकल्पना रेल्वे राबवत आहे. प्रवासी आणि मालभाड्याशिवाय अन्य मार्गांनी महसूल मिळवण्याचा रेल्वेचा हा प्रयत्न आहे. या संकल्पनेमुळे जुने डबे भंगारात न काढता त्यांचा वापर रेस्टॉरंटच्या माध्यमातून सुरू ठेवणे आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळवणे रेल्वेला शक्य होणार आहे. यातून पुढील काही वर्षे रेल्वेला मिळत राहणारे उत्पन्न आहे, जे डबे भंगारात काढल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त असणार आहे. या रेस्टॉरंटसाठी रेल्वेने कंत्राटदाराला जुना डबा आणि जागा उपलब्ध करून दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील या रेस्टॉरंटच्या माध्यमातून रेल्वेला 42 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हे रेस्टॉरंट चालवण्याचे कंत्राट Bogie-Wogie या रेस्टॉरंट चालकाला मिळाले आहे. हे रेस्टॉरंट लोकांच्या सेवेत 24x7 सुरू असते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील रेस्टॉरंट ऑन व्हिल्ससाठी रेल्वेच्या सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या वातानुकुलित 3-टियर डब्याचा वापर करण्यात आलेला आहे. त्या डब्यातील मूळच्या सर्व सीट आणि बर्थ काढून टाकून त्या जागी 10 टेबल बसवण्यात आलेली आहेत. त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये एकाचवेळी 40 जणांची बसण्याची सोय झालेली आहे. ही बैठक व्यवस्था डब्याच्या अर्ध्या भागात करण्यात आलेली असून उर्वरित अर्ध्या भागामध्ये स्वयंपाकघर करण्यात आलेले आहे. तिथे खाद्यप्रेमींच्या मागणीनुसार पदार्थ बनवून दिले जातात. नेहमीच्या प्रवासी डब्याच्या खालच्या बाजूला असणाऱ्या बॅटरी बॉक्सचा वापर रेस्टॉरंटसाठी लागणाऱ्या धान्याच्या साठवणुकीसाठी केला जात आहे.

मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणांची चित्रे या रेस्टॉरंट डब्याच्या बाहेरील बाजूवर रंगवलेली आहेत, जसे, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, वरळीचा सी लिंक पूल इत्यादी. या डब्याचा अंतर्गत भाग अतिशय आकर्षक बनवण्यात आलेला आहे. मुंबईतील रेल्वे वाहतुकीच्या इतिहासातील काही महत्वाच्या घटनांशी संबंधित चित्रे, छायाचित्रे इथे लावलेली आहे. मूळच्या डब्यातील प्रसाधनगृहे काढून टाकण्यात आली असून तिथे बिल काऊंटर आणि वॉश बेसिनची सोय केलेली आहे.

या रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्रीयन, पंजाबी,  चायनीज, इटालियन, दक्षिण भारतीय अशा  वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद आपल्याला घेता येतो.  या पदार्थांचा दर्जा, चव अतिशय चांगली असून त्यांचे  दरही किफायतशीर ठेवण्यात आलेले आहेत.

आसनसोल येथील चाय चुन टी कॅफे

रेल्वेच्या जुन्या डब्यात रेस्टॉरंट सुरू करण्याची संकल्पना याआधी पश्चिम बंगालमधील पूर्व रेल्वेच्या आसनसोल जंक्शनवर राबवण्यात आली. देशातील ते पहिले चाकांवरील रेस्टॉरंट (Restaurant on Wheels) ठरले. त्याचे उद्घाटन 26 फेब्रुवारी 2020 रोजी झाले होते. दोन जुन्या मेमू डब्यांमध्ये ते रेस्टॉरंट बनवण्यात आलेले आहे. त्याला चाय चुन टी कॅफे असे नाव दिलेले आहे.

पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर जंक्शन, मदन महल, कटनी मुईवारा, सतना आणि रिवा तसेच पश्चिम रेल्वेच्या बोरिवली आणि अन्य काही स्थानकांवरही असे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू झालेले हे मध्य रेल्वेवरील पहिलेच चाकांवरील रेस्टॉरंट आहे. अशाच प्रकारची रेस्टॉरंट अन्य ठिकाणी सुरू करण्याची मध्य रेल्वेची योजना असून त्यामध्ये नागपूर, लोणावळा, इगतपुरी, चिंचवड, मिरज, बारामती, आकुर्डी, कल्याण, कुर्ला, नेरळ इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. चिंचवड, मिरज, बारामती, आकुर्डी येथील रेस्टॉरंट ऑन व्हिल्ससाठी जुन्या जनरल डब्यांचा वापर केला जाणार आहे.

      रेल्वेच्या डब्यात रेस्टॉरंट सुरू करण्याची ही संकल्पना लवकरच लोकप्रिय होईल, यात शंका नाही. मी जेव्हा या रेस्टॉरंटमध्ये पोहचलो, तेव्हा तिथे बसायला जागाच नव्हती. काही वेळ वाट बघितल्यावर मला तिथे जागा मिळाली होती. नव्या संकल्पनेवर आधारलेल्या या रेस्टॉरंट ऑन व्हिल्समध्ये मिळालेली सेवा आणि चविष्ट पदार्थ यामुळे मी खूप समाधानाने बाहेर पडलो. या रेस्टॉरंटच्या म्हणजेच डब्याच्या प्रवेशद्वाराजवळ सेल्फी-पॉईंटही करण्यात आलेला आहे. मी या डब्याजवळ पोहोचलो होतो, तेव्हा या रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन समाधानाने बाहेर पडत असलेल्यांचे फोटो सेशन सुरू असलेले पाहिले. त्यांच्याही चेहऱ्यावरील समाधान न लपणारे होते.

      छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 18 क्रमांकाच्या फलाटाच्या बाजूला Bogie-Wogie हे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू झालेले आहे. सध्याची या रेस्टॉरंटमध्ये होणारी गर्दी बघता नजीकच्या काळात ते आणखीनच लोकप्रिय होत जाईल, अशी खात्री वाटत आहे.

टिप्पण्या

  1. महत्वाची माहिती दिली , अनेक जन रेस्टोरंट ला भेट देतील

    उत्तर द्याहटवा
  2. डब्यात गाडी चालताना जो आवाज येतो तो आहे का?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नाही, तसा आवाज येत नाही, पण आला तर आणखी मजा वाटेल यात बसून खाताना.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा