…. आणि अपघात होता होता टळला (भाग-1)

                एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं. काही दिवसांनी समजलं की, वऱ्हाडी मंडळीही माझ्याच गाडीनंच जात आहेत, पण ते वातानुकुलित श्रेणीनं जाणार होते. प्रवासाच्या दिवशी माझ्या सवयीप्रमाणं खूप आधीच मी पुणे स्टेशन गाठलं होतं. गाडीची वेळ होत आल्यावर वऱ्हाडींची भेट घेऊन मी माझ्या डब्याकडे, शेवटच्या डब्याकडे गेलो. माझं आरक्षण विनाएसी, सिटींगचं असल्यामुळं तिथं खूप गर्दी असेल असं वाटत होतं. कारण या गाडीला जनरलचा डबा नसला आणि हा डबाही आरक्षित असला तरी जनरलचे प्रवासी डब्यात चढण्याची शक्यता जास्त वाटत होती.

      मी शेवटच्या डब्यात असणार असल्यामुळं तिथं खाण्यापिण्यासाठी काही येईल याची खात्री कमी वाटत होती. कारण एक तर या गाडीला कमी थांबे आहेत. त्यामुळं रात्री गाडीत कोणी फेरीवालाही येण्याची शक्यता वाटत नव्हती. म्हणून गाडीत चढण्याआधीच रात्रीसाठी थोडं खायला विकत घेऊन ठेवलं. नंतर मी माझ्या जागेवर जाऊन बसलो आणि मला हवी तिथं सीट मिळाल्यामुळं तर खूपच उत्साहित झालो. या डब्यात गर्दी व्हायची शक्यता वाटत असली तरी संपूर्ण प्रवास आता मस्त होईल अशी आशा वाटत होती. पुण्याहून गाडी सुटेपर्यंत जनरलवाले डब्यात येऊन बसू लागले होतेच. असाच एक पुरुष त्याच्याबरोबर एक आजी, त्यांची मुलगी आणि लहान बाळ असे सगळे गडबडीनं माझ्या समोरच्या काही मोकळ्या सीट्सवर येऊन बसले आणि तेवढ्यात गाडीही सुटली.

      दुपारी बरोबर सव्वातीनला सकरणी सिमेंटच्या जाहिरातीनं रंगलेल्या अजनीच्या WAP-7 कार्यअश्वाच्या साथीनं पुणे-अजनी एक्सप्रेसनं आपला प्रवास सुरू केला. ही गाडी अजनीपर्यंत असली तरी डिसेंबरपर्यंत तिला नागपूरपर्यंत वाढवण्यात आलं होतं. अजनीमध्ये फलाटांचं काम सुरू असल्यामुळं या गाडीप्रमाणंच अन्य गाड्यांचाही अजनीचा थांबा रद्द करण्यात आला होता. पुण्यातून बाहेर पडत असतानाच कोल्हापूरहून आलेली कोयना वाटेतच थांबलेली दिसली. तिला बहुधा पाचनंबरवर घेतलं जाणार होतं. म्हणून मधल्या सिग्नलला ती आमची गाडी पुढं जाईपर्यंत वाट पाहत उभी होती. हळुहळू घोरपडी यार्ड पार करत गाडी हडपसरच्या बाहेर येऊन थांबली. तिथं सिग्नलची वाट बघण्यात सहा मिनिटं गेली. पुन्हा हडपसरमध्ये आत गेल्यावर तिथं अर्धा मिनिटभर थांबली. त्यावेळी हडपसरमध्ये नव्या टर्मिनलचं काम संथगतीनं सुरू असलेलं दिसलं. पुढं थोड्याच वेळात बेंगळुरूहून मुंबईकडे निघालेली उद्यान एक्सप्रेस क्रॉस झाली. उद्यान शेजारून धडाडत पुढे गेलेली असली तरी आमची गाडी हळुहळूच पुढं सरकत होती, कारण पुढं मालगाड्या आणि पुणे-दौंड डेमू होती. म्हणूनच मांजरीच्या बाहेरही पाच मिनिटं आम्ही थांबून राहिलो. मांजरी सोडताच कंटेनरवाली मालगाडी WDG-4 आणि WDG-4D अशा डिझेलवर चालणाऱ्या दोन शक्तिशाली कार्यअश्वांबरोबर पुण्याकडे गेली. लोणीमध्ये येत असताना रेल्वेची क्रेन पुण्याकडे गेली. त्याचवेळी नव्याकोऱ्या WDG-4G इंजिनांची जोडी मात्र दुसरीकडे विश्रांती घेत होती. इथं दौंडकडं जात असलेल्या कंटेनरवाल्या गाडीला आम्ही ओलांडून पुढं गेलो. आता आमच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला होता. पण आमच्या सुपरफास्ट गाडीनं आतापर्यंत 16 किलोमीटरसाठी 42 मिनिटं घेतली होती. त्यानंतर उरुळीत पुणे-दौंड डेमूला ओलांडलं. मार्गातला हा दुसरा अडथळा पार केल्यानंतर मात्र आमची गाडी आता वेग घेत आहे असं वाटत असताना पुढच्या दोनच मिनिटांनी ती पुन्हा हळुहळू धावू लागली. 

त्यावेळी निझामुद्दीनहून आलेली गोवा एक्सप्रेस खरोखर सुपरफास्ट या नावाला जागत पुण्याकडे गेली. त्यानंतर यवतमध्ये दौंडच्या दिशेनं मोटारगाड्या घेऊन निघालेल्या एका मालगाडीला ओव्हरटेक केलं. केडगावमध्येही मोटारगाड्या वाहणारी एक मालगाडी इंजिनाशिवाय मधल्याच मार्गावर उभी करून ठेवल्यामुळं आम्हाला लूपवरून पुढं सोडण्यात आलं. तेव्हाच जम्मूतावीहून आलेली झेलम एक्सप्रेस अप मेन लाईनवरून जोरदार आवाज करत पुण्याकडे गेली. पुन्हा पुढं पाटसमध्ये एक मालगाडी मुख्य मार्गावर उभी असल्यामुळं आम्हाला लूपवरून पुढं सरकावं लागलं. काही मिनिटांनी सोलापूर-पुणे इंटरसिटी क्रॉस झाली आणि अखेर 16.53 ला म्हणजेच 40 मिनिटं उशिरानं आम्ही दौंड कॉर्ड लाईन स्टेशनवर पोहचलो. मी दौंडची ही बाजू पहिल्यांदाच पाहत होतो.

      इथं बरीच गर्दी गाडीत चढली. त्यांच्याबरोबर वडापाववाले, पाणीवाले आणि इतर विक्रेतही आले होते. आरक्षणवाल्या प्रवाशांची आपली जागा पकडण्यासाठी, आपल्या जागेवर बसलेल्यांना उठवण्यासाठीची गडबड सुरू असतानाच विक्रेत्यांचीही पटापट विक्री करून खाली उतरण्यासाठी धडपड सुरू होती. अगदी दोनच मिनिटांमध्ये इथला थांबा आटपून आमची गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. मोठं वळण घेत गाडी भीमा नदीवरच्या पुलाकडे जात होती. त्याचवेळी दौंडमध्ये चढलेले पाच प्रवासी आमच्या इथं त्यांच्या सीट शोधत आले. मग इथं त्यांच्या आरक्षित सीट्सवर बसलेल्यांना ते उठायला सांगू लागले. त्यांच्यापैकी काही जण उठले, पण काही जण त्यांनाच उलट प्रश्न विचारू लागले होते. पुण्यातून गाडी सुटतासुटता लहान बाळासह आलेलेही उठत नव्हते. दौंडमध्ये आलेल्या आरक्षणवाल्यांनी त्यांना बाजूला व्हायला सांगितलं तरी ते काही हलेनात. शेवटी वादावादीनंतर थोडेसे सरकून त्यांनी आरक्षणवाल्यांना जागा करून दिली. हे सगळं पाहून त्यांच्यातील साधारण सातवी-आठवीमधली मुलगी त्या आजींशी भांडू लागली. तिला नीट बसता येत नव्हतं. म्हणून बराचवेळ तिची चीडचीड होत होती. मग तिला जरा जागा मिळाल्यावर तिच्याबरोबर असलेल्या तिच्या आई आणि मामीनं तिला गप्प आता बसायला सांगितलं. पण तिची बडबड अधूनमधून सुरूच होती, तेव्हा माझ्या शेजारी बसलेला एक जण तिला म्हणाला की, अगं शांत बस आता. मी कोपरगावला उतरणार आहे. मग ही सीट मोकळी होईल आणि तुलाही जागा होईल.

      दरम्यान, बाहेर दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाची प्रगती दिसत होती. दौंड-काष्टी या मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालं होतं. पुढं काष्टी ते विसापूर दरम्यानचा दुहेरी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला होता. याच दरम्यान शेजारून हावडा-पुणे एसी दुरंतो, गोरखपूर-पुणे विशेष आणि काही मालगाड्या दौंडच्या दिशेनं गेल्या. रांजणागाव रोड आमच्या गाडीनं सरळच पार केलं होतं. समोरून कोणतीही गाडी येत नसल्यामुळं तिथं असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कात्रीत आम्ही सापडलो नाही. इथं कात्री (scissor) क्रॉसिंगवर आहे. पुरेशा जागेअभावी इथं इतर स्थानकांप्रमाणं रुळ टाकलेले नाहीत. या स्थानकामधल्या रुळांची रचना कात्रीच्या आकाराची आहे.

मधल्या काळात आणखी एखादी जागा मोकळी होणार आहे का, याचा अंदाज घ्यायला त्या मुलीच्या आईनं सुरुवात केली होती. मलाही तिनं विचारलं, तुम्ही कुठं जाणार आहात?” मी सांगितलं की, नागपूर. आमची गाडी काही वेळानं सरोला स्टेशन ओलांडत असताना आमच्यासाठी रोखून धरलेली दानापूर-पुणे विशेष तिथं दिसली. आता पुन्हा दुहेरी मार्ग सुरू झाला होता. संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी अहमदनगर ओलांडलं. अहमदनगरच्या आधीपासूनच पुन्हा एकेरी मार्ग सुरू झाला होता. अहमदनगर गेल्याबरोबर दौंडमध्ये आलेल्या त्या प्रवाशांचं जेवण झालं. पुढे निंबळकपासून पुन्हा दुहेरी मार्ग सुरू झाला आणि विळद स्टेशन ओलांडत असताना शेजारून कर्नाटक एक्सप्रेस दौंडच्या दिशेनं गेली. तिच्या मागोमाग योगनगरी ऋषिकेश-श्री सिद्धरुद्ध स्वामी हुब्बळ्ळी विशेष एक्सप्रेसही गेली. वांबळीनंतर पुन्हा एकेरी मार्ग सुरू झाला होता. दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम असंच मध्येमध्येच पूर्ण झालेलं आहे. कान्हेगाव स्टेशनमधून जात असलेल्या लेव्हल क्रॉसिंगचं गेट बंद केलं जात असल्यामुळं त्या स्टेशनचा होम सिग्नल लाल होता. परिणामी आमची गाडी अर्धा मिनिट तिथं थांबली. गेट बंद झाल्यावर सिग्नल ऑफ झाला आणि आम्ही पुढं निघालो. दरम्यानच्या काळात आमच्या वाटेत येत असलेल्या काही प्रवासी आणि मालगाड्यांना ओलांडत आमची गाडी संध्याकाळी 7.27 ला कोपरगावला पोहचली, तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या गोरखपूर-पुणे एक्सप्रेसमधील गर्दी पाहून माझ्या शेजारी आलेला नवा प्रवासी म्हणाला, ती गाडी कशी जॅम पॅक्ड झाली आहे बघा!” मी त्याला म्हटलं की, बिहार, उत्तर प्रदेशकडून येणाऱ्या गाड्या कायमच अशा भरलेल्या असतात.

                कोपरगावहून गाडी निघाल्यानंतर डब्यामधलं वातावरण बदललं. दौंडमध्ये जागेवरून आरक्षित आणि विनाआरक्षित प्रवाशांमध्ये झालेल्या वादावादीचं रुपांतर आता संवादात होऊ लागलं होतं. त्याला कारण होतं - पाणी. आरक्षणवाल्यांकडचं पाणी संपलेलं होतं आणि खाली उतरू की नको यावरून त्यांचा गोंधळ सुरू होता. तेवढ्यात आरक्षणविना प्रवास करत असलेल्या त्या लहान बाळाच्या आईनं थोडंसं पाणी कोपरगावातून गाडी सुटेपर्यंत भरून घेतलं होतं. मग या सगळ्यांनी, तुम्हाला पाणी कुठं मिळालं, असं तिला विचारलं. त्यानंतर मगाशी जागेवरून लहान बाळाच्या आई-आजीशी भांडणारी ती मुलगी त्या बाळाशी बोलू-खेळू लागली, बाळाला जवळ घेऊन बसली. तिची आई त्या बाळाच्या आईला - त्याला हे द्या, असं करा - वगैरेवगैरे सल्ले देऊ लागली. हे आहे भारतातल्या कोणत्याही रेल्वेगाडीत अनुभवायला मिळणारं दृश्य आणि रेल्वेप्रवासाचं वैशिष्ट्य!

      अंकाई स्टेशन जवळ आल्यावर अंधारातही बाहेर डोंगर दिसत होता. मग समोर बसलेल्यांचं लक्ष गेल्यावर केवढा डोंगर आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि मग त्यांच्यापैकी एकीनं गाडी आता कुठं आली आहे हे मोबाईलवर तपासल्यावर तिच्या लक्षात आलं हा अंकाई किल्ल्याचा डोंगर आहे. अंकाई किल्ल्याच्या स्थानकात लूप लाईनवर डिझेल इंजिनांसह उभ्या असलेल्या मालगाडीला ओलांडून आमची गाडी मनमाडकडे गेली. मनमाड जवळ आल्याचं समजल्यावर त्या मुलीच्या आईनं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, अरे, पाणी मिळतंय का बघा लवकर खाली उतरून. मनमाडमध्ये शिरत असतानाच गोरखपूर-पुणे विशेष दौंडकडे गेली. रात्री 8.24 ला गाडी मनमाडला पोहचली. गाडी थांबत असतानाच शेजारच्या तीन नंबरवरून कोळशाची मालगाडी आकाशी रंगाच्या 2 WAG-7 कार्यअश्वांसह मुंबईच्या दिशेनं धडाडत गेली. त्यावेळी होत असलेला खडखडाट नेहमीप्रमाणंच खूप रोमांचक वाटत होता. मी खाली उतरून काही हलकंफुलकं खायला मिळतंय का ते पाहिलं. पण आमचा शेवटचा डबा फलाट्याच्या शेवटी होता आणि डब्यासमोरच फलाटावर काम सुरू होतं. त्यामुळं तिथं वडापावशिवाय काहीच आलं नव्हतं. पुढं एका स्टॉलमध्ये गरमागरम वडापाव, कांदाभजी समोरच ठेवलेली होती. पण माझा शेवटच्या डबा असणार असल्यामुळं तिथं काही येईल की नाही हे सांगता येत नाही, असा विचार करून मी पुण्याहूनच वडापाव घेऊन ठेवला होता. म्हणून त्या स्टॉलवरून गरमागरम चहा तेवढा घेऊन पुन्हा माझ्या जागेवर येऊन बसलो. दरम्यान मनमाडमध्ये आमच्या गाडीचे चालक आणि ट्रेन मॅनेजर बदलून झालेले होते. समोरच्यांना पाणीही मिळालं होतं. काही प्रवासी इथं उतरले आणि काही नवीन चढले. त्यानंतर थोड्याच वेळात 8.31 ला आमच्या गाडीनं मनमाड सोडलं.

(क्रमश:)

     

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा