‘शताब्दी’ची कॉपी, पण ‘शताब्दी’ नव्हे! (भाग-2)

‘शताब्दी’ची कॉपी, पण ‘शताब्दी’ नव्हे! (भाग-1) (avateebhavatee.blogspot.com) 

लोणावळ्याला TXR यार्डाजवळ वंदे भारत थोडा वेळ थांबून होती. परत लोणावळ्यात 7 मिनिटं हॉल्ट घेऊन गाडी पुढं निघाली. पुढं खंडाळ्याला परत 11 मिनिटं वंदे भारत थांबली होती. आज मधली लाईन खाली कर्जतपर्यंत देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असल्यामुळं कर्जतकडे जाणारी सगळी वाहतूक अप लाईनवरूनच चालू होती. म्हणून गाड्यांना घाटात वेळ लागत होता. वंदे भारत खंडाळ्यात उभी असतानाच पेट्रोल टँकरची मालगाडी कर्जतकडून अत्याधुनिक WAG-12B इंजिनासह आणि तीन WAG-7 बँकर्सच्या मदतीनं खंडाळ्यात येऊन दाखल झाली होती. आज बराच वेळ खंडाळ्यात रेंगाळलेली वंदे भारत आता निघायच्या तयारीत होती, पण लोको पायलटच्या लक्षात आलं की, सी-8 डब्याचा दरवाजा उघडलेला आहे. त्यानं गाडीत तशी उद्घोषणा करून आरपीएफला तिथं पोहचण्याची विनंती केली.

खंडाळा स्टेशन

माझी window seat असली तरी तिला खिडकी नव्हती. वंदे भारतमध्ये अशीच आसनव्यवस्था आहे. त्यामुळं मला बाहेर वाकून बघावं लागत होतं. मग शताब्दीप्रमाणं जरा सीट मागे करावी म्हटलं तर त्यासाठीची कळ तिथं दिसली नाही. हा आणखी एक धक्का! म्हणूनच विमानासारख्या सुविधा या गाडीत मिळत असल्याचा दावा केला जात असला तरी या गाडीपेक्षा शताब्दीमधल्या सीट आरामदायक असल्याचं वाटलं.

घाट उतरत असताना मंकी हिलला परत वंदे 5 मिनिटं थांबून पुढं निघाली. नागनाथला मिनिटभराचा थांबा घेऊन मग कुठंही न थांबता ती पुढेपुढे जात राहिली; पण हळुहळूच! कारण संपूर्ण घाटात ताशी 25 किलोमीटरची वेगमर्यादा लागू आहे. दरम्यान, गाडीत प्रवाशांच्या आपासांत गप्पा सुरू होत्या. जांभरुंगजवळ कंटेनरची मालगाडी शेजारून डाऊन लाईनवरच्या बोगद्यातून बाहेर येत घाट चढत गेली. कल्याणचे तीन WAG7 bankers तिला घाट चढण्यासाठी मदत करत होते. माझ्या मागे बसलेले काका नैसर्गिक विधीला जाऊन आले, तेव्हा त्यांना शौचालय तुंबलेलं असल्यासारखं वाटलं. मग जागेवर आल्यावर घरी फोन करून परत वंदे भारतबद्दल सांगू लागले.

कर्जत जंक्शन

अखेर घाट संपला. लोणावळा ते कर्जत अंतर कापण्यासाठी वंदेनं 54 मिनिटं घेतली होती. लोणावळ्यापासून एक तरुणी मेकअपचं कीट काढून मेकअप करत बसली होती. तिचाही मेकअप आता होत आला होता. बाहेर आता मुंबईच्या लोकलची वर्दळ दिसू लागली होती. कर्जतच्या बाहेरच एक लोकल शेजारून कर्जतमध्ये गेली होती. आता परत, बोलो, चाय-कॉफी अशी विचारणा केली जाऊ लागली. पण मगाचचा मसाला चहा मला फारसा आवडला नव्हता, म्हणून मी परत घेतला नाही.

कर्जतनंतर किनारी मैदानी प्रदेश सुरू झाला असला तरी वंदे भारत 40-50 च्या वेगानंच जात होती. मधूनच वेग 20 किलोमीटरपर्यंत खाली येत होता. मध्येमध्ये मालगाड्यांना वंदे ओव्हरटेक करत होती. अंबरनाथला पुन्हा गाडी अर्धा मिनिट थांबली होती. आता कल्याण जवळ आलं असल्यामुळं तिथं उतरणाऱ्यांची लगबग सुरू झाली होती. कल्याणच्या होम सिग्नलला वंदे थांबून होती, कारण मुंबई-चेन्नई एक्सप्रेस बाहेर पडत होती. तोपर्यत गाडीत उद्घोषणा दुमदुमू लागली की, पुढील स्टेशन कल्याण जंक्शन. कृपया गाडी थांबल्याशिवाय खाली उतरू नये. आता गाडी पूर्ण थांबल्याशिवाय दरवाजे उघडत नसताना कोणी चालत्या गाडीतून कसं काय खाली उतरू शकेल? त्यानंतर दुपारी 2.12 ला, 2 तास 39 मिनिटं उशिरा वंदे कल्याणला पोहोचली आणि तीन मिनिटांनंतर निघाली. कल्याणनंतर दिव्याला जात असताना बीसीएन वाघिण्यांची मालगाडी WAG-9 इंजिनाबरोबर कल्याणच्या दिशेनं वेगानं गेली आणि तिच्यापाठोपाठ साधारण मिनिटाच्या अंतरानं WDG-4D इंजिनांची जोडीही तशीच वेगानं गेली. आता दिवा जंक्शन आली होतं आणि पनवेलकडे जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या गाड्याही दिसत होत्या. एक कंटनेर मालगाडी पनवेलकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा होण्याची वाट पाहत तिथं उभी होती. तिच्या पलीकडून मंगला लक्षदिप एक्सप्रेस कल्याणकडे निघाली होती.

दिव्यानंतर पार्सिक बोगद्यातून वंदे भारत बाहेर आल्यावर ठाण्याचा होम सिग्नल लाल होता. त्यामुळं मिनिटभर तिथं थांबून गाडी आत आली. ठाण्यातही बऱ्यापैकी प्रवासी उतरले होते. आमचा डबा शेवटी असल्यामुळं गाडी पुढं निघाल्यावर फलाटावरची ती गर्दी दिसत होती. ठाण्याच्या पुढं कल्याणकडे जाणाऱ्या कोणार्क आणि हैदराबाद क्रॉस झाल्या. वंदे भारतनं मुंबईला जाऊन लगेच हैदराबादनं पुण्याला यायचा आधी प्लॅन होता. पण तो नंतर बदलला, ते किती बरं झालं हे दर्शवणारी ही परिस्थिती होती. अखेर दुपारी 2.57 ला वंदे दादरला पोहचली आणि आम्ही तिथंच उतरण्याचा निर्णय घेतला, सीएसएमटीपर्यंत तिकीट असूनही. कारण आम्ही परतीला बसनं येणार होतो आणि पुढं जाऊन परत दादरला येण्यात आणखी वेळ गेला असता. उतरत असताना मागच्या सीटवर बसलेला IRCTC चा खानपान सेवक हसतहसत बडबडत होता की, आज आमचे हाल होणार आहेत. कारण गाडी पोहचली की, लगेच परत निघणार आहे. त्यामुळं जरा मोकळं व्हायलाही वेळ मिळणार नाही आहे.

दादरला वंदे भारत एक्सप्रेसमधून खाली उतरत असतानाच माझं या गाडीबद्दलचं मत तयार होत गेलं ते असं की, वंदे भारतमध्ये मिळणारी सेवा शताब्दीसारखीच आहे. गाडीचा वेग बदलताना बसणारे जर्क्स वंदे भारतमध्ये जाणवत नाहीत आणि ही ईएमयू असल्यामुळं लोकलप्रमाणं लगेच वेग घेते. दरवाज्याची आणि शौचालयाची जागा बदलल्यामुळं आत येता प्रशस्त जागा दिसते. या बाबी असल्या तरी वंदे भारतमधली आसनांची रचना योग्य वाटली नाही, कारण गाडीतील निम्म्याच आसनांना पूर्ण खिडकी मिळते. शेवटी मला शताब्दीच जास्त चांगली वाटत आहे. म्हणूनच असं वाटतं की, वंदे भारत शताब्दीची कॉपी आहे, पण ती शताब्दी नाही!

Video link: https://youtu.be/l6vi4KB5gb8?si=QpDwFTw4NFg3w1Vt

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा