Video link: https://youtu.be/l6vi4KB5gb8?si=QpDwFTw4NFg3w1Vt
याआधी शताब्दी एक्सप्रेसनं मी
बऱ्याचदा प्रवास केलेला आहे, पण भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचं आणि वेगवान
रेल्वेगाड्यांच्या युगाच्या आरंभाचं प्रतीक सांगितलं गेलेल्या आणि भरपूर
जाहिरातबाजी झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास मी नुकताच केला. प्रवासाचा
दिवस निश्चित करून पुणे ते मुंबई आरक्षण करून टाकलं. परतीलाही वंदे भारतनं यायचा
आधी विचार होता, पण ऐनवेळी तो बदलला. इतरवेळी प्रगती, दख्खनची राणी, शताब्दी,
दुरंतोसारख्या गाड्यांचं आरक्षण केल्यावर जो उत्साह संचारलेला जाणवतो, तसा वंदे
भारतच्यावेळी फारसा जाणवत नव्हता.
प्रवासाच्या दिवशी मी आणि माझा भाऊ पुणे स्टेशनवर वेळेवरच पोहचलो.
निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15
मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आम्ही एकमेकांना म्हटलंसुद्धा - ठीक आहे, 15 मिनिटं म्हणजे फार लेट नाही आहे.
आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत
परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.
साडेनऊ होऊन गेले तरी ‘वंदे’ काही आली नव्हती. आधी सांगितलेल्या वेळेनुसार ती आतापर्यंत यायला पाहिजे होती. त्यातच display board वर वंदे भारतप्रमाणे बऱ्याच गाड्यांचे फलाटही दर्शवले जात नव्हते. हैदराबाद-मुंबईही अजून आलेली नव्हती, चेन्नई-मुंबई, कोईंबतूर-लोटिट, चेन्नई-लोटिटही लेट येणार एवढंच दर्शवलं जात होतं. मी माझ्या मोबाईलवर पुन्हा-पुन्हा या सगळ्या गाड्यांचं स्टेटस बघत होतोच. काही वेळानंतर समोरच्या बोर्डवर सगळ्या गाड्यांच्या पुण्यात येण्याच्या सुधारित वेळा दाखवल्या गेल्या. थोड्याथोड्या वेळानं या वेळा सतत बदलत जाऊन शेवटी दाखवलं गेलं की ‘हैदराबाद’ 3 नंबरवर आणि ती गेल्यानंतर वंदे भारत तिथं येईल. ‘हैदराबाद’पाठोपाठ आलेली चेन्नई-मुंबई पलीकडे 4 नंबरवर येऊन दाखल झाली. हैदराबाद गेल्यावर 5 वर आलेल्या इंटरसिटीचं WCAM-2 लोको 3 वरून पुढे इलेक्ट्रीक ट्रीप शेडच्या दिशेनं जाऊ लागलं होतं, पण शंटिंग सिग्नल ऑन असल्यामुळं ते फलाटाच्या शेवटाला वाट बघत उभं होतं. मी माझ्या भावाला म्हटलं की, ते लोको बाहेर जात नाही, तोवर आपली गाडी काही येणार नाही. शेवटी फलाट मोकळा झाला आणि बरोबर अकरा वाजता वंदे भारत फलाटावर दाखल झाली.
मला अपेक्षित होतं की, आज ले असल्यामुळं ‘वंदे’ला या दोन गाड्यांवर प्राधान्य मिळेल, पण तसं झालेलं नव्हतं. पण एक गोष्ट अशी की, अशा परिस्थितीत बाकीच्यांची जी चिडचिड होत असते, तशी माझी होत नव्हती, कधीच होत नाही. गाडीत आमच्या जागेवर जाऊन बसलो. मला पाहिजे, अगदी तशीच सीट होती, पण window seat असून मला खिडकी नव्हती. कारण आमच्या सीट्सची रांग दोन खिडक्यांच्या मधल्या जागेत होती. वंदे भारतनं मला दिलेला हा पहिला धक्का. सीटवर आमच्यासाठी 1 लीटर पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. आता बघा – या गाडीत तीन तासांसाठी 1 लीटर पाणी मिळतं आणि शताब्दीच्या साडेआठ तासांसाठी अर्धा लीटर पाणी दिलं जातं – हे रेल्वे मंत्रालयाचं लॉजिक काही समजलं नाही. सध्याचा काळ असाच आहे! पावणेदोन तास लेट झालेली वंदे भारत आता 5 मिनिटांत सुटेल असं वाटलं होतं. दरवाजे बंद होत आहेत, अशी उद्घोषणाही झाली होती. पण गाडी हलत नव्हती. नंतर अशी उद्घोषणा थोड्याथोड्या अंतरानं अजून दोन वेळा झाली. पण दरवाजे काही बंद होत नव्हते. त्यामुळं बाहेर उभ्या असलेल्या डेक्कनला दोन नंबर घेऊन लगेच एक नंबरवरच्या निजामुद्दिन दुरंतोलाही सोडून देण्यात आलं. त्यामुळं अजून काही मिनिटं तरी 'वंदे' सुटणार नव्हती. दरवाजे बंद हो रहें हैं, अशी पाचव्यांदा उद्घोषणा झाल्यावर मग लगेचच वंदे पुण्याहून निघाली होती. ती आता दोन तास 4 मिनिटं लेट झालेली होती.
मी पुढच्या खिडकीच्या एवढ्याच्या कोपऱ्यातून बाहेरचं दृश्य न्याहाळू लागलो. फलाट सोडून पुढं गेली आणि इलेक्ट्रीक लोको शेडपाशी पुन्हा मिनिटभर थांबून निघाली. तोपर्यंत तपासनीस येऊन तिकिटं तपासू लागला होता. आल्याआल्या पहिल्या सीट्सजवळ त्याला एक जण सांगत होता, माझा तो नंबर होता, मी इकडे बसलो आहे, कारण त्यांना सीट बदलून हवी होती. ते झाल्यावर तो हिंदीभाषिक ज्येष्ठ तपासनीस पुढच्या रांगेजवळ आला. तिथं एका तरुणानं ओळखीच्या पुराव्यादाखल आधार कार्ड दाखवलं, तर तपासनीस त्याला म्हणत होता, “हे नाही चालणार. हे तुम्ही प्रिंट काढून लॅमिनेट केलेलं आहे.” त्यावर तो तरुण सांगत होता की, हे ओरिजिनलच आहे. पण तपासनीसाला ते पटत नव्हतं. त्यावर तो तरुण म्हणत होता की, त्याला असंच कार्ड मिळालेलं आहे. शेवटी तपासनीस त्याला म्हणाला, “आता ठीक आहे, पण पुढच्या वेळेपासून याच्याऐवजी ओरिजिनल जवळ ठेवत जा.” मग तो आमच्याजवळ आला. आमचे नंबर पुकारले आणि मी तिकीट दाखवत होतो तर म्हणाला, “ते राहू द्या फक्त आयडेंटिटी दाखवा.”
शिवाजीनगर |
दरम्यान, गाडीत नाश्ता आला होता. वंदे भारतमधील खानपानाच्या
दर्जाविषयी ऐकून होतो, म्हणून आम्ही तिकीट काढतानाच No Food ची निवड केली होती. तरीही आपल्याला चहा मिळेल असं
मी भावाला खात्रीनं सांगत होतो. कारण तिकिटात आमच्याकडून 20 रुपये घेतले गेल्याचं
दिसत होतं. No Food ची
सुविधा दिल्यापासून नाश्ता-जेवण मिळणार नसलं तरी चहा-कॉफी मिळेल असं जाहीर करण्यात
आलेलं होतं. नाश्ता दिला जात असताना मागच्या एकानं खानपानवाल्याला विचारलं की, आज
गाडी इतकी लेट का झाली आहे. त्यानं सांगितलं, सोलापूरनंतर “अतिशय गच्च धुकं होतं. शेजारचंही काही दिसत
नव्हतं, बराचवेळ गाडी एकाच जागी थांबून होती.”
आता पुन्हा ‘वंदे’चा वेग कमी झाला. खडकीच्या बाहेर शेजारून उद्यान एक्सप्रेसला WAP-7 कार्यअश्व पुण्याकडे घेऊन गेले होते. तिचाही वेग कमी होता, कारण खडकीत ती लूपवरून एका मालगाडीला ओलांडून पुढे आली होती आणि आता शिवाजीनगरही तिला लूपवरूनच ओलांडावं लागणार होतं. लोको पायलटला पुढे Permissive Signal Double Yellow दिसत होता. शिवाजीनगरमध्ये डाऊन मेन लाईनवर एक मालगाडी WAG-9 कार्यअश्वासह पुण्याकडे जाण्यासाठी स्टार्टर सिग्नल मिळण्याची वाट पाहत उभी होती.
आता आमच्या इथल्या प्रवाशांना नाश्ता दिला गेला. शाकाहारी नाश्त्यात
होतं – दोन मेथीचे ठेपले, दही, छोटासा पॅन केक, मटार उसळ आणि उपीट. आम्ही हळूच त्याच्या
प्लेटकडे कटाक्ष टाकून पदार्थांच्या दर्जाचा अंदाज घेतला. त्यामधलं उपीट पाहून मला
वाटलं की, बरं झालं नाश्ता मागवला नाही. मांसाहारी नाश्त्यात ऑमलेट-ब्रेड, पॅन केक
होता. माझ्या मागच्या सीटवरच्या काकांचा नाश्ता झाला होता आणि ते घरी कळवत होते,
नाश्ता अगदी गारगार होता. गाडी आधीच लेट आहे वगैरेवगैरे. बोलताबोलता पुढे थोड्या काळजीवजा
सुरात ते सांगत होते, “परवा
परतीला याच गाडीनं येणार आहे.”
वंदे भारतची प्रसार-सामाजिक माध्यमांवर तथाकथित रेलफॅन्स आणि
पत्रकारांनी प्रचंड प्रमाणात जाहिरात केलेली आहे. गाडीत गेल्यावर गाडीच्या अंतर्गत
रचनेत पूर्वीपेक्षा बदल झालेला नक्कीच दिसत होता. तरीही त्यामुळं मला
त्यांच्यासारखं हुरळून जाणं होत नव्हतं, या गाडीच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी
बऱ्याच वर्षांपूर्वीपासून माहीत असल्यामुळं असेल कदाचित!
वंदे भारतमध्ये बसल्यापासून मी तिची शताब्दीशी तुलना करून बघत होतो. त्यात मला खिडकीची सीट, नाश्त्याचा दर्जा, नाश्ता नको म्हटलं म्हणून चहाही नाही, अशा बाबतीत शताब्दीच सरस दिसत होती. चहा, नाश्ता, वाचायला पेपर, पाण्याची बाटली, आसन व्यवस्था या सेवा सुविधांच्या बाबतीत वंदे भारत शताब्दीसारखीच होती. म्हणूनच वंदे भारत शताब्दीची कॉपी वाटत होती, पण ती शताब्दी वाटत नव्हती. असं होण्याला काही कारणंही आहेत. वंदे भारतमध्ये एलईडी स्क्रीन, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, सीसीटीव्ही, स्मोक डिटेक्टर, प्रत्येकाला स्वतंत्र मबाईल चार्जिंग पॉईंट अशी काही वैशिष्ट्ये दिसत होती. पण यापैकी काही वैशिष्ट्ये बऱ्याच वर्षांपूर्वी दुरंतो, राजधानीध्येही पाहिलेली होती. दरम्यान, तळेगावच्या बाहेरचा- 30 किलोमीटर वेगमर्यादेचा टप्पा ओलांडल्यावर वंदे भारतचा वेग ताशी 118 किलोमीटरपर्यंत काही क्षण गेला. पण परत तो कमी झाला. कारण कल्याणपर्यंत हिच्या मार्गामध्ये तीन गाड्या येत राहणार होत्या.
लोणावळ्याला TXR यार्डाजवळ वंदे भारत थोडा वेळ थांबून होती. परत लोणावळ्यात 7 मिनिटं हॉल्ट घेऊन गाडी पुढं निघाली.
(क्रमश:)
पुढच्या भागात वंदे भारत गाडी बद्द्दल चा निष्कर्श लेखका कडून अपेक्षित आहे.
उत्तर द्याहटवाGreat experience of a great train
उत्तर द्याहटवापुढचा प्रवास लवकर येऊ दे
उत्तर द्याहटवा