राजधानीची सफर (भाग-3)

भोपाळ जंक्शनवर उभी असलेली 12433 राजधानी एक्सप्रेस

भाग-१

        भोपाळ जंक्शनवर गाडी थांबल्यावर मी खाली उतरून जरा फलाटावर रेंगाळलो. इथे आमच्या राजधानीचे चालक, गार्ड, तपासनीस, पोलीस बदलले गेले. भोपाळ जं.वर नियोजित वेळेच्या दोन मिनिटं आधी दाखल झालेली आमची राजधानी सुटली मात्र नियोजित वेळेच्या 4 मिनिटं उशीरा म्हणजे मध्यरात्री 2:09 वाजता. तिच्यापाठोपाठ शेजारच्या फलाटावरची 12433 चेन्नई सेंट्रल-ह. निजामुद्दिन राजधानी सुटणारच होती. तिचे चालक स्टार्टर सिग्नल मिळण्याची वाट पाहत आपल्या आसनावर बसलेले दिसले. आमची राजधानी भोपाळ जं.च्या बाहेर पडत असताना तिसऱ्या लाईनवर 12191 श्रीधाम एक्सप्रेस तिच्या WAP-7 इंजिनासह फलाटाकडे जाण्यासाठी मधल्या सिग्नलला वाट पाहत उभी होती. भोपाळ जं. ते बिना जं. हा मार्ग काही वर्षांपूर्वी तीनपदरी झालेला आहे.

      भोपाळनंतर पाचच मिनिटांनी मोटारगाड्या वाहून नेणारी WAG-9 इंजिन जोडलेली मालगाडी भोपाळच्या दिशेने गेली. आता आमच्या राजधानीनं पुन्हा एकदा मस्त वेग पकडला होता. पुढच्या दोन मिनिटांनी तिसऱ्या लाईनवर भोपाळच्या दिशेने जाणारी 12668 चंदिगड जं.-मदुराई जं. एक्सप्रेस पुढचा मार्ग मोकळा होण्याची वाट पाहत उभी होती. तिच्या मागोमागंच दोन WAG-5 इंजिनं जोडलेली BOXNHS वाघिण्यांची मालगाडी जात होती. अशीच वाहतूक त्यानंतरही सतत सुरू राहिली होती.

      आता घड्याळाचे काटे पहाटेचे 3:27 वाजल्याचे दर्शवत होते. आमची राजधानी बिना जंक्शन क्रॉस करत असतानाच स्टार्टर सिग्नलजवळ नवी दिल्लीहून आलेली आणि थिरुवनंतरपुरम सेंट्रलकडे निघालेली 12626 केरळ एक्सप्रेस WAP-7 कार्यअश्वाच्या मागोमाग फलाटाकडे जात होती. तिला एक उच्च क्षमतेचा पार्सल यानही जोडलेला होता. आता इथून पुढे तिहेरी मार्ग संपून पुन्हा दुपदरी मार्ग सुरू झाला होता. पण बिना जंक्शननंतर पाच-सहा मिनिटं राजधानी हळुहळू धावत राहिली. त्याचवेळी 12156 ह. निझामुद्दिन-रानी कमलापती (हबीबगंज) एक्सप्रेस आम्हाला क्रॉस झाली. त्यानंतर पुढे अगासोद जंक्शनचा होम सिग्नल लाल असल्यामुळे त्याच्या अलीकडे आमची राजधानी एक मिनिटासाठी थांबली. मग मात्र करोंदा, मोहसा, धोरा, जाखललौन अशी स्थानकं राजधानी धडाधड ओलांडत गेली आणि त्या दरम्यान अनेक मेल-एक्सप्रेस आणि मालगाड्याही आम्हाला क्रॉस होत होत्या. इकडे गाडीत अजून शांतताच होती, कारण सगळ्यांची गाढ झोप सुरू होती, कोणाचं घोरणं सुरू होतं, तर कोणी तरी मधूनच चुळबुळ करत होतं.

      आता पहाटेचे ठीक 5 वाजले होते आणि आमची राजधानी नियोजितवेळेच्या आधीच वीरांगना लक्ष्मीबाई म्हणजेच झाशी जंक्शनवर दाखल झाली होती. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्हा मध्येच मध्य प्रदेशात घुसलेला आहे. आमच्यानंतर पाचच मिनिटांनी 12433 चेन्नई सेंट्रल-ह. निझामुद्दिन राजधानीही शेजारच्या फलाटावर आली. भोपाळहून ती आमच्या मागोमागच निघाली होती. वीरांगना लक्ष्मीबाई स्थानकावर आमच्या राजधानीचे चालक, गार्ड, तपासनीस बदलले गेले. ती अदलाबदल आटोपून राजधानी 5:11 ला पुढे निघाली. त्यानंतर पुन्हा मध्य प्रदेशात प्रवेश करून दहाच मिनिटांनी राजधानी दतियाजवळ आल्यावर तेथील प्रसिद्ध राजवाडा त्यावर केलेल्या आकर्षक रोषणाईमुळे दूरवरूनच लक्ष्य वेधून घेत होता. राजधानी 5:42 ला दब्रा स्थानक ओलांडत असतानाच तिथे लूप लाईनवर उभी करून ठेवलेल्या पेट्रोलच्या मालगाडीला झाशीच्या दिशेने जाण्यासाठी परवानगी मिळाली होती. त्यामुळे ती मालगाडी दोन WAG-5 कार्यअश्वांसह सापासारखी सरसर करत मुख्य लाईनवर येत होती. त्याचवेळी ह. निझामुद्दिनकडे निघालेली 12192 श्रीधाम एक्सप्रेस आमच्या राजधानीसाठी तिथे लूप लाईनवर रोखून धरलेली होती.

      आता गाडीत पँट्रीवाल्यांची हळुहळू हालचाल सुरू होत होती, तशीच काहींची झोपही हळुहळू उघडू लागली होती. तिकडे खिडकीच्या बाहेर आता उजाडायला सुरुवात झाली होती. सकाळी 6:10 ग्वाल्हेर जंक्शनवर राजधानी येऊन थांबली, तेव्हा चंबळ एक्सप्रेस फलाटावर लावली जात होती. आता बऱ्यापैकी बाहेर उजाडलं होतं. ग्वाल्हेरमधून 6:13 वाजता निघाल्यावर पुढे तीनच मिनिटांनी राजधानी पुन्हा 3 मिनिटं एकाच जागी थांबून राहिली. कारण आमच्या पुढे असलेली मालगाडी पुढच्या बिरलानगर जंक्शनमध्ये आत शिरत होती. ती मालगाडी मला 6:22 ला बिरलानगर जंक्शन ओलांडत असताना डावीकडच्या लूप लाईनवर दिसली आणि त्याचवेळी उजवीकडच्या मार्गावरून पोलादाची रिळं घेऊन जाणारी मालगाडी ग्वाल्हेरकडे गेली. तपकिरी रंगाचे एक WAG-5 इंजिन तिला घेऊन जात होते. राजधानीच्या प्रवासामधला शेवटचा थांबा आग्रा कँट जंक्शन यायला थोडा वेळ होता. पण आता सकाळचा चहा दिला जात होता. त्यात चहाच्या किटबरोबरच मारीची दोन बिस्किटं होती. चहासाठी गरम पाणी थर्मासमधून दिलं गेलं. 

    चहा पितापिताच बाहेरचं दृश्य पाहताना चंबळ नदीच्या खोऱ्यात आपण असल्यासारखं जाणवत होतं. चंबळच्या खोऱ्यामधल्या त्या चित्रविचित्र आकाराच्या टिपिकल वाळुकामय टेकड्या दिसत होत्या. त्याबरोबर तिसऱ्या मार्गाचे कामही सुरू असल्याचं दिसत होतं. दरम्यान, जशा काही गाड्या आमच्या शेजारून ग्वाल्हेरकडे जात होत्या, तशाच आग्रा, मथुरा, दिल्लीकडे निघालेल्या काही गाड्यांना लूप लाईनवर रोखून धरून आमच्यासाठी मार्ग मोकळा करून दिला जात होता. अशाच प्रकारे पावणेसात वाजता सिकरौदामध्ये BOXN वाघिण्यांची मालगाडी आमच्या राजधानीसाठी रोखून धरलेली होती. WDG-4 इंजिनाबरोबर ती आग्ऱ्याच्या दिशेने निघाली होती. या संपूर्ण प्रवासात मला दिसलेलं हे पहिलं डिझेल-इलेक्ट्रिक इंजिन होतं. त्यानंतर 6:49 ला हतमपूरमध्ये नांदेडहून अमृतसरला निघालेल्या 12715 सचखंड एक्सप्रेसलाही तसंच लूप लाईनवर रोखून धरलं गेलं होतं.

  'राजधानी'नं चंबळ नदी ओलांडली आणि राजस्थानात   
प्रवेश केला.
      चहा झाल्यावर दहाच मिनिटांनी नाश्ताही दिला जाऊ लागला; पण आम्हाला दिला नाही. त्यावेळी पँट्रीवाला आम्हाला विचारून गेला की, कुठे उरणार आहात. मी निजामुद्दिन सांगितल्यावर म्हणाला, आग्ऱ्याला उतरणाऱ्या प्रवाशांना आधी नाश्ता देत आहोत, तुम्हाला आग्ऱ्यानंतर देऊ. त्यानंतर आम्ही खिडकीतून बाहेर बघत राहिलो. 6:55 ला दूध दुरंतो ही विशेष दूधवाहू वाघिण्यांची गाडी WAG-9 इंजिनाबरोबर रेणिगुंट्याकडे निघून गेली. COVID-19 च्या लाटेत देशातील दूधपुरवठा सुरू करण्यासाठी अशा दूध दुरंतो सुरू केल्या गेल्या होत्या. त्यापैकीच दिल्ली ते आंध्र प्रदेशातील रेणिगुंटादरम्यान धावणारी ही एक गाडी आहे. आमच्या राजधानीचा आता थोडा कमी झाला होता. त्यातच राजधानीनं चंबळ नदी ओलांडून मध्य प्रदेशातून राजस्थानात प्रवेश केला. राजस्थानातील धौलपूर जिल्ह्याचा चिंचोळा भाग इथे मध्येच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशादरम्यान घुसलेला आहे. धोलपूरनंतर गंगेचं मैदान सुरू झालं आणि राजधानीनं पुन्हा उत्तर प्रदेशात प्रवेश केला.

  आग्रा कँटनंतर आमच्या 'राजधानी'ला क्रॉस होत असलेली
 आग्रा फोर्टकडून आलेली एक्सप्रेस.
      आता 7:32 ला राजधानीनं आग्रा कँट जंक्शन गाठलं होतं. इथं आमचा डबा 80 टक्के मोकळा झाला. आमच्या शेजारी बसलेलेही सगळे तिथे उतरणार असल्यामुळे त्यांनी अर्धातास आधीपासूनच सामान दाराजवळ नेऊन मांडायला सुरुवात केली होती. आता मला प्रतीक्षा होती 12002 नवी दिल्ली-रानी कमलापती (हबीबगंज) शताब्दी एक्सप्रेस क्रॉस होण्याची. ही देशातील सर्वात पहिली आणि सर्वात वेगवान शताब्दी आहे. 7:48 वाजता रुनकुता क्रॉस करत असताना फिरोजपूर कँटपासून छत्रपती शिवाजी महाराज (ट)कडे निघालेली ऐतिहासिक पंजाब मेल लूप लाईनवर उभी करून ठेवलेली दिसली. शताब्दीसाठी तिला बाजूला उभे करून ठेवण्यात आले होते. पुढच्या दोनच मिनिटांमध्ये शताब्दी WAP-5 इंजिनासोबत तिच्या पूर्ण फॉर्ममध्ये, ताशी 150 कि.मी. वेगाने आग्रा कँटकडे गेली. 

                      आग्ऱ्यानंतर आलेला नाश्ता.                     
त्याचवेळी आमचा नाश्ता आला – ब्रेड-कटलेट, बटर, सॉस, फ्रूटी आणि चहाचं किट. गरमागरम नाश्त्याचा आस्वाद घेऊन होत असतानाच राजधानी मथुरा जंक्शनमध्ये शिरत होती. 8:14 ला मथुरा जंक्शन ओलांडत असताना आमच्यासाठी तिथे वांद्ऱ्याहून अमृतसरला निघालेली 12925 पश्चिम एक्सप्रेस रोखून धरलेली होती. तिच्या आधीच काही मिनिटं तिथून 12953 मुंबई सेंट्रल-ह. निझामुद्दिन ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी एक्सप्रेस पुढे निघून गेली होती.

      आता मथुऱ्यापासून चारपदरी मार्ग सुरू झाला होता. पण पुढे ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी असल्यामुळे आमच्या राजधानीचा वेग मधूनमधून कमी होत होता. त्यातच मध्येमध्ये जिथे Road under Bridge चं काम सुरू होतं, तिथेही ताशी 20 कि.मी. इतक्या कमी वेगानं जावं लागत होतं. आता आमच्या नाश्त्यानंतरच्या चहासाठी थर्मासमधून गरम पाणी आले. पण मी चहा घेण्याचं थोडं थांबलो होतो. कारण गतिमान एक्सप्रेस बघायची होती. 8:28 ला शेजारून 12280 नवी दिल्ली-वीरांगना लक्ष्मीबाई जं. ताज एक्सप्रेस क्रॉस झाली. तिच्यानंतर 12 मिनिटांनी गतिमान एक्सप्रेस क्रॉस झाली. ताशी 160 कि.मी. वेगानं धावणारी ही गाडी WAP-5 इंजिनासह काही सेकंदातच शेजारून निघून गेली. त्यानंतर अशा अनेक मेल/एक्सप्रेस आणि मालगाड्यांना क्रॉस करत किंवा ओलांडत आमची राजधानी हजरत निझामुद्दिनच्या दिशेने निघाली होती आणि आम्ही चहा घ्यायला सुरुवात केली. आता पलवल-दिल्लीदरम्यान धावणाऱ्या मेमूही दिसू लागल्या होत्या. इकडे गाडीत हळुहळू सगळ्यांची आवराआवर सुरू झाली होती.

      9:31 ला तुघलकाबाद ओलांडत असताना दिल्लीकडून आलेली एक मेमू फलाटावर विसावत होती. त्यामुळे तिच्या मागे असलेली हिरव्यागार रंगातील WAG-9 इंजिनाची BOST वाघिण्यांची मालगाडी होम सिग्नलला वाट पाहत उभी होती, तर दुसरी मालगाडी तुघलकाबादहून बाहेर पडण्यासाठी स्टार्टर सिग्नल मिळण्याची वाट बघत पलीकडच्या तिसऱ्या मार्गावर उभी होती. तुघलकाबादनंतर राजधानी थांबत-थांबत पुढे जाऊ लागली. अखेर 9:46 ला मधल्या सिग्नलजवळ आमची राजधानी मिनिटभर थांबली, कारण पुढेच असलेली ऑगस्ट क्रांती तेजस एक्सप्रेस. त्यानंतरही हळुहळू पुढे सरकत शेवटी आमची राजधानी 5 मिनिटं उशिरा हजरत निझामुद्दिनच्या 2 नंबरच्या फलाटावर जाऊन थांबली आणि आम्ही अगदी समाधानानं गाडीतून उतरलो. अशा प्रकारे चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामधून, चार रेल्वे विभागातून, 1537 किलोमीटरचे अंतर कापत, अनेक नद्या ओलांडत आणि विविध भौगोलिक प्रदेश पार करत पूर्ण केलेला एकूण प्रवास मस्तच झाला!

हजरत निझामुद्दिन स्थानकावर पोहचलेली 22221 CSMT NZM Rajdhani Express
(समाप्त)

माझ्या राजधानीच्या प्रवासात ऐतिहासिक पंजाब मेल आणि हबीबगंज (भोपाळ) शताब्दी क्रॉस झाली त्याचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहा.


टिप्पण्या

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. ‘राजधानी’चे तिन्ही भाग आता वाचले. मस्त आणि भरपूर माहिती देणारे झाले आहेत!
    - सतीश khidaki.blogspot.com

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा