(भाग-1 https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/1.html)
दरम्यान, आमच्या शेजारीच असलेल्या अप लाईनवरून
मेल/एक्सप्रेस आणि मालगाड्या कल्याणच्या दिशेने थोड्या थोड्या वेळाने जात होत्या. खेरवाडीला
संध्याकाळी 6:48 वाजता तपकिरी रंगातील कल्याणच्या WCAM-2 इंजिनासह
संक्रेल गुड्स टर्मिनलकडून आलेली आणि छत्रपती शिवाजी महाराज (ट) कडे निघालेली
पार्सल विशेष एक्सप्रेस क्रॉस झाली. COVID-19 च्या पहिल्या
लाटेत सुरू झालेल्या अशाच अनेक पार्सल एक्सप्रेसमुळे अत्यावश्यक वस्तूंचा देशाच्या
विविध भागांमध्ये पुरवठा अबाधितपणे सुरू राहिला होता. जेवण यायला अजून वेळ असल्यामुळे
डब्यातल्या बऱ्याच प्रवाशांनी आपल्याबरोबर आणलेले हलके पदार्थ खायला सुरुवात केली
होती. माझ्या पुढे एक कंपार्टमेंट सोडून बसलेल्यांचा पुन्हा एकदा फलाहार सुरू
होता. 19:05 वाजता लासलगाव आले. स्टेशन ओलांडत असताना तिथे
आणखी एक एक्सप्रेस गाडी लूप लाईनवर उभी करून आमच्या ‘राजधानी’ला मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. ती होती लोकमान्य टिळक (ट)हून
पाटण्याला निघालेली एक्सप्रेस. लासलगाव स्टेशनमधून ‘राजधानी’ बाहेर पडत असतानाच WAG-7 कार्यअश्वांची एक जोडी
गाडीविनाच नाशिक रोडकडे निघून गेली.
OBHK कर्मचाऱ्याकडून डब्यात केली जाणारी साफसफाई |
दरम्यान, गाडीत असलेला OBHK वाला डब्यात
साफसफाई करून गेला. आता ‘राजधानी’चा
वेग चांगल्याप्रकारे जाणवू लागला होता. इकडे गाडीत पॅंट्री कर्मचाऱ्यांची रात्रीचे
जेवण देण्यासाठीची गडबड सुरू झाली होती. Hot Buffet Car मधून
वेगवेगळे पदार्थ डब्यातील मिनी पँट्रीत येऊ लागले होते. ठीक 19:19 ला ‘राजधानी’ने मनमाड
जंक्शन ओलांडलं. बापरे, काय वेग होता मनमाड ओलांडताना! हा
वेग गाडीतून जाणवतो, त्यापेक्षा बाहेरून जास्तच भासतो. आज ‘राजधानी’ला उशीर झाला असल्यामुळे तिला वेळ भरून काढायचा होता. म्हणून ती जास्त
वेगाने निघाली होती. मागे एकदा पुणे-भुसावळ एक्सप्रेसने मी निघालो होतो, तेव्हा या
‘राजधानी’साठी आमची गाडी तिथे रोखून
धरलेली होती. त्यावेळी ‘राजधानी’ मनमाड
जंक्शन कशी ओलांडते हे अनुभवले होते.
रात्री 8:01 वाजता आमची ‘राजधानी एक्सप्रेस’ आणि WAP-7 इंजिनासह धावणारी दानापूर-पुणे एक्सप्रेस एकाचवेळी चाळीसगाव जंक्शन ओलांडून आपापल्या गंतव्याच्या दिशेने निघून गेल्या. दानापूर-पुणे एक्सप्रेससाठी कंटेनर घेऊन जाणारी बीसीएन वाघिण्यांची मालगाडी WAG-9 इंजिनासह तिथे लूप लाईनवर उभी करून ठेवण्यात आली होती. पुढच्या 10 मिनिटांतच जेवण दिले जाऊ लागले.
रात्रीचे जेवण |
जळगाव जंक्शनवर थांबलेली आमची राजधानी. (फोटो - केदार होनप, माझा सहप्रवासी) |
आईसक्रीम खाऊन होत असतानाच जळगाव जंक्शन आले. तो
होता ‘राजधानी’चा तिसरा थांबा. तिथे गाडीचे चालक, गार्ड, तपासनीस, गाडीतील पोलिस सगळे
बदलले गेले. ‘राजधानी’ जळगावमध्ये
येताच पलीकडच्या दोन नंबरच्या फलाटावरून भुसावळ-सुरत एक्सप्रेस सुटली. ‘राजधानी’ आत येण्याचीच ती वाट पाहत उभी होती. जळगावमधला
3 मिनिटांचा थांबा आटपून ‘राजधानी’
पुढच्या प्रवासाला निघाली. आता जळगाव आणि भुसावळदरम्यान तिहेरी मार्ग सुरू झाला
होता. जळगावात आलेलेही आपल्या सीटवर स्थानापन्न झाल्यावर डब्यातलं वातावरण झोपाळू होऊ
लागलं होतं. दरम्यान, 21:13 वाजता पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस
शेजारून झुमझुमझुम करत निघून गेली. पुढच्या दोनच मिनिटांत भुसावळ जंक्शन ओलांडले. तिथे
लोकमान्य टिळक (ट)हून बरौनी जंक्शनकडे जाणाऱ्या विशेष एक्सप्रेसला ओलांडून ‘राजधानी’ पुढे निघाली. त्याचवेळी फलाट 5 वर गोरखपूर-लोकमान्य
टिळक (ट) एक्सप्रेस उभी असलेली दिसली, तर भुसावळच्या बाहेर पडत असताना मधल्या
सिग्नलला नागपूर जंक्शन-पुणे जंक्शन हमसफर एक्सप्रेस फलाटाकडे जाण्याची परवानगी
मिळण्याची वाट बघत उभी होती. पुढे वाटेत अनेक मालगाड्या, मेमू, सेवाग्राम
एक्सप्रेस अशा गाड्या आम्हाला क्रॉस होत गेल्या. आता मुंबईपासून गाडीत ऐकवले जात
असलेल्या गाण्यांच्या धूनही बंद झाल्या होत्या.
महिला प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे हर्दा स्थानकात गाडी थांबवण्यात आली. |
जळगाव जंक्शनपर्यंत उशिरा धावत असलेल्या ‘राजधानी’नं आता चांगलाच वेग पकडला होता. ती तिच्या नियोजित वेळेच्या साधारण 20
मिनिटं आधीच मधली स्थानकं पार करू लागली होती. दरम्यान, डब्यात सगळे झोपलेले
असल्यामुळे शांतता पसरलेली होती आणि त्यात वेगानं धावत असलेल्या ‘राजधानी’च्या ‘टापां’चा ऐकू येणारा आवाज मस्त वाटत होता. मध्यरात्री 12:13
ला बनापूर आणि त्यानंतर 12:24 ला खुटवांसा स्थानकं ओलांडताना
‘राजधानी’ला लूप लाईनवर जावं लागलं.
कारण तिथे मुख्य मार्गावर इटारसी जंक्शनच्या दिशेनेच जाणाऱ्या मालगाड्यांना रोखून
ठेवण्यात आले होते. पुढे 12:41 ला इटारसी जंक्शन ओलांडले. गाडीत
अधूनमधून आरपीएफचे जवान गस्त घालत होतेच. पँट्री कर्मचाऱ्यांचीही आता झोपायले होते.
इटारसीत BOXNHS वाघिण्यांची मालगाडी भारतीय रेल्वेवरील
सर्वात अत्याधुनिक आणि शक्तिशाली WAG-12 कार्यअश्वासह पुढच्या
प्रवासाची तयारी करत होती. त्याचवेळी BOXN वाघिण्यांची
मालगाडी WAG-9 कार्यअश्वासह विश्रांती घेत होती. इटारसीतून
बाहेर पडत असतानाच ह. निजामुद्दिनहून चेन्नई सेंट्रलला निघालेली राजधानी आम्हाला
क्रॉस झाली.
नर्मदापुरम (होशंगाबाद) नंतर बुदनी ओलांडत असताना
ह. निजामुद्दिनहून सिकंदराबाद जंक्शनला निघालेली दुरोंतो एक्सप्रेस झुमझुमझुम करत
क्रॉस झाली. भोपाळ जंक्शनला पोहचेपर्यंत अनेक गाड्या आमच्या राजधानीला क्रॉस होत
होत्या किंवा त्यांना आमची ‘राजधानी’ ओलांडून पुढे जात होती.
मधल्या स्थानकांच्या स्टेशन मास्टरकडून आमच्या ‘राजधानी’ला दिली जात असलेली परवानगी आणि त्यासाठी त्याने हातात धरलेला लुकलुकणारा
हिरवा दिवा बघताना मस्त वाटत होतं. असं दृश्य मला कायमच रोमांचक वाटत आलेलं आहे.
मध्यरात्री 1:34 ला 22222 हजरत निजामुद्दिन-छत्रपती शिवाजी महाराज (ट) ‘राजधानी’ क्रॉस झाली. त्यानंतर 1:50 ला रानी कमलापती (हबीबगंज) स्थानक ओलांडून पुढच्या तीनच मिनिटांत आमची ‘राजधानी’ भोपाळ जंक्शनवर दाखल झाली. त्यावेळी शेजारच्या फलाटावर 12433 चेन्नई सेंट्रल-ह. निजामुद्दिन राजधानी एक्सप्रेस उभी होती.
(क्रमश:)
आपण स्वतः प्रवास करत आहे असे वाटते
उत्तर द्याहटवाइतके समरस होतोय वाचताना.
सुंदर वर्णन व राजधानी सारखेच वेगवान. गाडीतच बसलोय गाडीचा स्पीड आनुभवत आम्ही केलेले भारतभरचे प्रवास आठवले
हटवाधन्यवाद!
हटवाखूपच छान वर्णन.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!!
हटवा