"सिंहगड" (भाग-2)


"सिंहगड" (भाग-1) (avateebhavatee.blogspot.com)

ठाण्यापासून निघालेली सिंहगड विशेष ठाण्याची खाडी, पुढचा पार्सिक बोगदा आणि त्याच्या पुढचे दिवा जंक्शन पटापट ओलांडून कल्याण जंक्शनला 18:54 ला पोहोचली. तरीही ती 7 मिनिटं उशिराने धावत होती. तिथेही गाडीत थोडीफार गर्दी चढली. सिंहगड विशेष कल्याणला 5 क्रमांकाच्या फलाटावर शिरत असतानाच पलीकडे सात क्रमांकावर कोल्हापूरहून आलेली कोयना विशेष येत होती, तिच्या नेहमीच्याच WDP-4D लोकोबरोबर. त्याचवेळी कोयनेच्या डब्यांची क्रमवारी आता बदलल्याचेही आढळले. काही दिवसांपूर्वीच मी कोल्हापूरहून येताना ही क्रमवारी वेगळी होती.

18:56 ला सिंहगडने कल्याण जंक्शन सोडले. मी आता गाडीत काही खायला येतंय का याची वाट पाहत होतो. दिवसभर मुंबईत बरंच फिरल्यामुळे आता भूक लागू लागली होती. पण रेल्वेच्या नेहमीच्या चहा-नाश्त्याच्याऐवजी, लोनावला चिक्की, 100 में तीनवाले आणि बाकीचेच फेरीवाले येत होते. तिकिट तपासनीसही येऊन सगळ्यांच्या आसनक्रमांकांची खातरजमा करून गेला. सिंहगड विशेषने आता बऱ्यापैकी वेग घेतला होता. आता रेल्वेचा चहावालाही गाडीत फिरू लागला होता. पण आधी काही तरी खावं असं वाटत होतं. गाडीत काही आले नाही, तर कर्जतला वडापावचा पर्याय उपलब्ध होताच. विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ओलांडत सिंहगड वेगाने पुढे पुढे जात होती आणि 19:10 वाजता शेजारच्या अप लाईनवरून 06340 नागरकोईल-छत्रपती शिवाजी महाराज (ट) विशेष एक्स्प्रेस गुत्तीच्या WDP-4D लोकोबरोबर धडाडत कल्याणकडे गेली. तिच्याच पाठोपाठ अवघ्या दोन मिनिटांनी वांगणीच्या अलिकडे कर्जतकडून आलेली लोकल शेजारून खडखडाट करत निघून गेली.

आता शेलू जाऊन 19:20 ला नेरळ जंक्शन ओलांडले आणि एकदाचा कटलेटवाला आला. त्याच्याकडून गरमागरम कटलेट घेतले. कटलेटबरोबर मिळालेले केचपचे सॅशे जरा सावधपणे फोडून कटलेटचा आस्वाद घेऊ लागलो. पाचच मिनिटांनी भिवपुरी रोड ओलांडले. माझ्या हातातील कटलेट संपत आलेले असतानाच 19:33 ला कर्जत जंक्शन आले. सिंहगड विशेष हळुवारपणे पहिल्या फलाटावर जात हाती, तेव्हा शेजारी निळा-पांढरा-लाल रंगातील कल्याणच्या WAG-7 कार्यअश्वांची जोडी आमची वाट पाहत असलेली दिसली. हे दोघेच आता सिंहगडला लोणावळ्यापर्यंतचे घाटामधले मोठे चढ चढण्यासाठी मदत करणार होते.

कर्जतमध्ये गाडी फलाटाला स्पर्श करताच तिथल्या वडापाववाल्यांचा वडापाव वडापाव असा सुरू झालेला दणदणात ऐकू येऊ लागला. गाडी थांबली, तेव्हा तर अक्षरश: कानठळ्या बसत होत्या. महागाईने कर्जतमधल्या वडापावालाही प्रभावित केलेले पाहिले, तो आता 30 रुपये झालाय. तरीही गाडीमधल्या बऱ्याच जणांनी वडापाव घेतलाच. काही गर्दी इथे उतरली, तर थोडी नवी गर्दी गाडीत चढली. हे सुरू असतानाच मागे कल्याणच्या त्या WAG-7 कार्यअश्वांची जोडी (banker) सिंहगडशी संलग्न करण्याची प्रक्रिया सुरू होती. आज ही प्रक्रिया बरीच लवकर आटोपली होती. त्यामुळे अवघ्या चारच मिनिटांत सिंहगड विशेषने कर्जत सोडले आणि डाऊन दिशेने पुढचा प्रवास सुरू करत घाट चढण्यासाठी सुरुवात करत होती. कर्जतमधून बाहेर पडताना अप यार्डात बीसीएन वाघिण्यांची एक मालगाडी WDG-4D आणि WDG-4 या कार्यअश्वांसह स्टार्टर सिग्नल ऑफ होण्याची वाट पाहत उभी होती. पलीकडे डाऊन यार्डात कल्याणचे दोघे WCAG-1 स्वतंत्रपणे उभे होते. त्याचवेळी लोणावळ्याहून आलेले कल्याणचे तीन रंगी WAG-7 चे त्रिकूट मुख्य लाईनवर कर्जतमध्ये आत शिरण्यासाठी सिग्नल मिळण्याची वाट उभे होते. असेच एक त्रिकूट अप यार्डात लोणावळ्याहून आलेल्या बीसीएन वाघिण्यांच्या गाडीपासून वेगळे करण्यात आलेले होते.

कर्जतमधली ही गाड्यांची गर्दी मागे ठेवून सिंहगड पळसधरीला आली होती तोच पुढच्या लोको पायलटने विशिष्ट हॉर्न वाजवून बँकरमधल्या घाट लोको पायलटला वेग वाढवण्यासाठी संकेत दिला. त्यानंतर अर्ध्याच मिनिटात सिंहगड वेगाने धावू लागली. इकडे गाडीत आता सामोसेवालाही फेऱ्या मारू लागला होता. त्याच्या बरोबरीने बाकीचे फेरीवालेही अजून इकडेतिकडे फेऱ्या मारतच होते. अंधारात घाट पाहात मी चङाचा आस्वाद घेतला. माझ्या डब्यातील बऱ्याच जणांच्या सहप्रवाशांबरोबरच्या गप्पांचा वेग काहीसा मंदावलेला होता. तरुणाई तर मोबाईलमध्येच व्यग्र होती. दरम्यान, 19:55 ला ठाकूरवाडीजवळ बँकरची एक जोडी मधल्या लाईनवरून कर्जतकडे निघून गेली. त्यानंतर खंडाळ्याच्या आधी 06210 बेंगळुरू अजमेर विशेष एक्सप्रेस WDP-4D च्या सारथ्याखाली मधल्या लाईनवरून कर्जतकडे गेली. त्यानंतर खंडाळ्याच्या आधीच्या मोठ्या बोगद्यातून बाहेर आलो आणि एकदम हुश्शं वाटलं, कारण हवेतला कोरडेपणा एकदम जाणवला.

घाटातून जात असताना वळणांवर रुळांना चाकांच्या कडा घासून होणारा आवाज आज जास्तच ऐकू येत होता. 20:11 ला सिंहगड लोणावळ्यात एक नंबरवर दाखल झाली. इथे गाडीतील थोडी गर्दी कमी झाली. तोपर्यंत मागचे बँकर सिंहगडपासून वेगळे करून झाले असले तरी आज सिंहगड जरा जास्तच लोणावळ्यात विसावली होती. 20:20 ला सिंहगड विशेष लोणावळ्यातून निघाली. आता हवेत जाणवू लागलेला गारवा आल्हाददायक वाटत होता आणि गाडीतील प्रवाशांच्या गप्पाही बऱ्याच कमी होत होत्या. लोणावळ्यातून बाहेर पडत असताना TXR यार्डात दोन WDG-4 कार्यअश्वांसह उभ्या असलेल्या बीटीपीएन वाघिण्यांच्या टँकर गाडीची तेथील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जात होती. त्यामुळे तिला कर्जतकडे निघण्यासाठी अजून काही वेळ लागणार होता. आता तर सिंहगड खूपच वेगाने धावू लागली होती. वाटेत पुणे-लोणावळा लोकल, बीसीएन वाघिण्यांच्या दोन मालगाड्या आम्हाला क्रॉस झाल्या. घोरावाडीला अहिंसा एक्सप्रेस आणि देहू रोडला आणखी एक लोकल क्रॉस झाल्या. पुढे आकुर्डी मात्र सिंहगडने अतिशय सावकाशपणे ओलांडले आणि 20:55 ला तशीच हळुहळू चिंचवडला जाऊन थांबली. इथे तर गाडी बऱ्यापैकी रिकामी झाली.

आता गाडीत फक्त चिक्कीवाल्यांच्याच फेऱ्या सुरू होत्या आणि शिल्लक माल मगाच्यापेक्षा कमी किंमतीत खपवायचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला होता. पिंपरीला अर्धा मिनिटच थांबून गाडी पुढच्या थांब्याच्या दिशेने, खडकीकडे निघाली. खडकीत गाडी थांबल्यावर मोजकेच प्रवासी गाडीतून उतरले. त्यावेळी एक मॅडम माझ्या समोरच्या खिडकीजवळ येऊन बसल्या आणि हिंदीतून पुटपुटल्या की, क्या गाड़ी है, सब जगह रुक रही है। अखेर 21:22 ला सिंहगड विशेषने शिवाजीनगर गाठले, बऱ्याच गर्दीबरोबर मीही तिथे उतरलो आणि अनेक वर्षांनंतर मी केलेला सिंहगडचा प्रवास संपला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा