अलीकडेच सिंहगड एक्सप्रेसनं प्रवास करण्याचा
योग आला. बऱ्याच वर्षांनंतर माझा सिंहगडचा प्रवास होत होता. कोविड-19 मुळे बंद
झालेली सिंहगडची सेवा पुन्हा सुरू होऊन चारच दिवस झालेले होते. पुन्हा
प्रवाशांच्या सेवेत दाखल होताना सिंहगड नव्याकोऱ्या डब्यांसह अवतरलेली दिसली. पण अजूनही
भारतीय रेल्वेवरच्या रेल्वेगाड्यांना “विशेष” श्रेणीअंतर्गतच चालवले
जात होते. या काळात डाऊन सिंहगडची वेळ बदलली गेली होती.
पुण्याला येण्यासाठी मी डाऊन सिंहगड पकडण्यासाठी संध्याकाळी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) पोहचलो. गाडीला अजून बराच वेळ होता आणि आगाऊ
आरक्षण केलेले होतेच. त्यामुळे सिंहगडच्या नियोजित फलाटावर जाण्यासाठी मला तरी
काहीच घाई नव्हती. अजून दख्खनची राणीसुद्धा फलाटावर आलेली नव्हती. मग सिंहगड येणं
तर दूरच होतं. मी 8 नंबरवर पोहचल्यानंतर काही वेळाने म्हणजे 16:25 वाजले असताना दख्खनची राणी विशेष फलाट 9 वर येऊ लागली होती. कल्याणचा
पिवळाधमक WDS-6S हा कार्यअश्व (इंजिन/लोको) तिला ओढून आणत
होता. जरा जास्तच आवाज करत होता तो कार्यअश्व. सिंहगडच्या डाऊन दिशेच्या वेळापत्रकात
आता बदल करण्यात आला असल्यामुळे ती सुटण्यासाठी अजून बराच वेळ होता. म्हणून मला
वाटलं की, तिला दख्खनची राणी सुटल्यावर आणलं जाईल बहुतेक.
दख्खनची राणी 9 नंबरवर प्रवाशांची वाट पाहत उभी
राहिली आणि काही क्षणांमध्ये कल्याणचा चॉकलेटी रंगाचा WCAM-2 हा कार्यअश्व ट्रिप
शेडकडून राणीचे सारथ्य स्वीकारण्यासाठी आलाही. त्याचवेळी सिंहगडच्या कार्यअश्वाची
साद पलीकडून ऐकू येऊ लागली होती. इकडे प्रवाशांची दख्खनच्या राणीत बसण्यासाठीची
पळापळ सुरूही झाली होती. कारण त्यांना तो आवाज आपल्याच गाडीचा वाटत होता. त्या
प्रवाशांमध्ये काही जण शांत प्रवृत्तीचेही दिसत होते. आरक्षण असल्यामुळे आणि गाडी
सुटण्यासाठी उगाच कशाला पळापळ करायची या विचाराने ते निवांत होते.
कल्याणच्या त्या अश्वाची दख्खनच्या राणीशी जोडणी
सुरू झालेली होतीच, तोपर्यंत सिंहगड विशेष शेजारच्या 8 नंबर ढकलत आणली जात होती.
सिंहगड विशेष फलाटावर येत असताना तिचे नवेकोरे आकाशी रंगाचे एलएचबी डबे नजर वेधून
घेऊ लागले. मला वाटलं की, कल्याणचे WDS-6S लोकोच त्याला ढकलत असेल. पण गाडी थांबत असताना
कल्याणचाच डब्ल्यूएपी-7 कार्यअश्व सिंहगडला जोडलेला दिसला. आज थेट मुख्य लोकोच सिंहगड
विशेषचे शंटिंग करत होता. गाडी फलाटावर थांबली आणि तिथे इंजिनाजवळ असलेल्या
कर्मचाऱ्यांनी लोको पायलट-मेलला लोको बंद करायला सांगितले. कारण या लोकोत Head
on Generation (HOG) यंत्रणा बसवलेली होती आणि त्या यंत्रणेची
गाडीशी जुळणी करायची होती. HOG यंत्रणेमुळे गाडीतील दिवे,
पंखे, पँट्री आणि वातानुकूलन यंत्रणांसाठी जनरेटरमधून विद्युत पुरवठा न करता थेट
लोकोमधून करणे शक्य होते. लोको पायलट लोको बंद करून खाली उतरला आणि त्या
कर्मचाऱ्यांजवळ आला. तो त्यांना विचारत होता की, तुम्ही गाडी पिट लाईनवर असतानाच
हे काम का पूर्ण करून घेत नाही. लोको तिकडेच जोडत असल्यामुळे तुम्हाला हे काम
करण्यासाठी पुरेसा वेळ असतो की. पुन्हा लोको स्वीच-ऑफ करत बसावं लागणार नाही इथे
आल्यावर. त्यावर ते कर्मचारी त्याला सांगत होते की, तिकडचे साहेब म्हणतात की, गाडी
प्लॅटफॉर्मवर लावल्यावर हे काम करत जा. हा संवाद सुरू असतानाच ते कर्मचारी गाडीच्या
पहिल्या सामान ब्रेक एवं जनरेटर यानच्या दोन आयव्हीसी केबल लोकोशी संलग्न करू
लागले होते. अतिशय वजनदार असलेल्या त्या केबल कसरत करत लोकोशी संलग्न केल्या
गेल्या आणि त्यानंतर HOG coupler ची गाडी
आणि लोकोशी जोडणी केली गेली. त्यानंतर लोको पायलटने पुढच्या केबिनमध्ये जाऊन लोको
पुन्हा सुरू केले. आता लोकोमधली HOG यंत्रणा कार्यान्वित
झाली आणि त्याचा विशिष्ट आवाज ऐकू येऊ लागला.
इकडे हे सगळं सुरू असतानाच दख्खनच्या राणीची वेळ
झाल्यामुळे ठीक 17:10 वाजता ती पुण्याच्या दिशेने निघाली. आज सिंहगडने प्रवास करण्याचा निर्णय
घेऊन तिचे आरक्षण केलेले असल्यामुळे शेजारच्या 9 क्रमांकाच्या फलाटावरून जाणाऱ्या
दख्खनच्या राणीला बायबाय केले. सिंहगड सुटायला अजून बराच वेळ होता. त्यामुळे
फलाटाच्या शेवटीच अजून थोडा वेळ रेंगाळलो होतो. आता आमच्या लोको पायलटकडे पॉईंस्टमनने
ब्रेक पॉवर बुक आणले. लोको पायलटने त्यात ब्रेक पॉवरची नोंदणी करून सही केली आणि
त्या पॉईंस्टमनने त्याची एक प्रत लोको पायलटकडे परत केली. त्यावर गार्डने आधीच नोंदणी
आणि सही केलेली होतीच. त्याच वेळी लोको पायलटने आपल्याकडील तक्त्यात Engine
Kilometre आणि Train Engine Hour चीही नोंद
केली. असिस्टंट लोको पायलट खाली उतरून कार्यअश्वाच्या तब्येतीची पुन्हा एकदा खातरजमा
करून घेत असताना लोको पायलटने आपल्यासमोर working time table उघडून आपल्याला ते सतत दिसत राहील अशा पद्धतीने ठेवले.
छत्रपती शिवाजी महाराज (ट)च्या फलाट क्र.-8 वर उभी असलेली सिंहगड विशेष. |
दरम्यान, दख्खनच्या राणीनं दिवा जंक्शन गाठलेलं
होतं. आता सिंहगड विशेष सुटण्याची वेळ होत आली होती. मी आता माझ्या सीटवर जाऊन
बसलो होतो. तोवर CSMT
च्या असिस्टंट स्टेशन मास्टरने सेक्शन कंट्रोलरकडून सिंहगड विशेष सोडण्यासाठीची
परवानगी घेतली होती. त्यामुळे घड्याळात 17:49 होऊन गेल्यावर फलाट
क्रमांक 8 चा स्टार्टर सिग्नल पिवळा झाला. त्याचा संकेत मागे गार्डलाही मिळत
होता. ठीक 17:50 वाजता सिंहगड विशेषने दीर्घ गर्जनेसह पुण्याच्या
दिशेने कूच केले. पूर्वी यावेळी CSMT वरून कोल्हापूरला
जाणारी सह्याद्री सुटत होती. पण लॉकडाऊननंतर ती गाडी पुन्हा सुरू न करता तिच्या
जागी सिंहगड एक्सप्रेस सोडली जात आहे.
आज सिंहगड विशेष सुटली, तेव्हा बऱ्यापैकी मोकळी
होती. हळुहळू वेग घेत सिंहगड 18:04 ला दादरमध्ये पोहोचली. गाडी थांबल्याबरोबर थोडीफार
गर्दी आत चढली. सगळे आपापल्या जागेवर विसावत असतानाच तिथला दोन मिनिटांचा मुक्काम
आवरून सिंहगड पुढे निघाली. सिंहगड अत्याधुनिक एलएचबी डब्यांची झालेली असली तरी या
डब्यांमधील एक दोष जाणवू लागला होता. तो म्हणजे jerks! गाडीचा
वेग कमी होताना हे jerks जाणवत होते. आता देशातील कोविड-19
ची परिस्थिती सुधारू लागली होती. त्यामुळे मुंबईत रेल्वेगाड्यांची वाहतूक वाढू
लागली होती. कुर्ल्यानंतर 28 किलोमीटरपासून ठाण्यापर्यंतच्या फास्ट मार्गावर वेगमर्यादा
असल्यामुळे सिंहगड हळुहळू धावत गेली आणि 18:33 ला ठाण्यात
जाऊन उभी राहिली. त्याआधी आठ मिनिटांपूर्वी पुण्याहून आलेली 01008 डेक्कन विशेष अप
फास्टवरून दादरकडे निघून गेली होती. ठाण्यातही गाडीत थोडी गर्दी चढली.
(क्रमश:)
Masta khupppp
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवामस्त
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवा