जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाईची यांचा महत्वपूर्ण भारत दौरा नुकताच पार पडला. त्या दौऱ्यासाठी ताकाईची भारतात आलेल्या असताना त्यांचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात परंपरेनुसार समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले होते. भारताने अशा स्वागताची परंपरा जपलेली असली तरी त्यामध्ये अलिकडे करण्यात आलेल्या काही बदलांमुळे तो समारंभ अनोखा ठरू लागला आहे.
भारताच्या
राजकीय दौऱ्यावर आलेल्या महत्वाच्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाचे किंवा सरकार
प्रमुखाचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत करण्याची परंपरा
आहे. त्या दिमाखदार समारंभात भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानही उपस्थित असतात. हा
समारंभ म्हणजे संबंधित देशाच्या प्रमुखाला भारताने दिलेला मान असतो. तसेच हा
समारंभ त्या नेत्याच्या भारत दौऱ्याची औपचारिक सुरुवात मानली जाते. म्हणूनच त्या समारंभानंतरच
दोन्ही देशांमधील द्वीपक्षीय वाटाघाटींना सुरुवात होत असते. स्वातंत्र्यापासून
चालत आलेल्या या स्वागत समारंभाच्या परंपरेला 2026 मध्ये नवे रुप देण्यात आलेले
आहे. त्यामुळेच हा समारंभ इतर देशांमधील अशाच समारंभांपेक्षा वेगळा ठरत आहे.
नवी
दिल्लीत आलेल्या संबंधित देशाच्या प्रमुखाचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आगमन
झाल्यावर नेहमीप्रमाणेच भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान त्यांचे स्वागत करतात. हे
सर्व नेते भेटतात, तिथून जवळच असलेल्या विशिष्ट दीर्घेमध्ये त्या खास समारंभासाठी आलेले
केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, भारत दौऱ्यावर आलेल्या विदेशी नेत्याबरोबरचे सर्व
शिष्टमंडळ आणि इतर अधिकारीही उपस्थित असतात. त्या बैठक व्यवस्थेमसोरच समारंभासाठीच्या
खास पोशाखात ‘राष्ट्रपती
अंगरक्षक’ दलाचे प्रमुख, उपप्रमुख, ‘राष्ट्रपती अंगरक्षक’ दलाचा ध्वजवाहक, दोन ‘चंदेरी
तुतारी’वाहक आणि काही घोडेस्वार अंगरक्षक उभे
असतात. ‘राष्ट्रपती अंगरक्षक’ दलातील अन्य घोडेस्वार तेरा-तेराच्या दोन
गटांमध्ये मुख्य प्रांगणाच्या दोन्ही बाजूंनाही उभे राहतात.
संचलनाच्यावेळी भूदलाचे बँडपथक ‘कदम कदम बढ़ाए जा’ ही
धून वाजवत संचलन करत असते. या सगळ्या पथकांच्या पाठोपाठ प्रांगणात उपस्थित असलेले ‘राष्ट्रपती अंगरक्षक’ दलाचे घोडेस्वार तेरा-तेराच्या दोन गटांनी सलामी मंचासमोरून विशिष्ट
चालीने जातात. संचलन करणाऱ्या आणि घोडेस्वारांच्या तुकड्यांकडून प्रांगणात एक रिंगण
पूर्ण केले जाते. त्यानंतर सर्व तुकड्या पुन्हा आपल्या आधीच्या जागी येऊन उभे राहिल्या
की मानवंदनेचा कार्यक्रम संपन्न होतो. एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाऐवजी सरकारप्रमुखाचा भारत दौरा असेल,
तर त्याला असा गार्ड ऑफ ऑनर देण्याची पद्धत जरा वेगळी आहे. तशावेळी तिन्ही
सैन्यदलांच्या तुकड्यांमध्ये प्रत्येकी 50 ऐवजी 33 जवान/अधिकारी सहभागी असतात.
त्याचबरोबर राष्ट्रपती अंगरक्षकांकडून घातले जाणारे रिंगणही त्यावेळी होत नाही. भारतभेटीवर
आलेल्या राष्ट्रप्रमुखाला राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आल्यावर दिली जाणारी 21
तोफांची सलामीही सरकारप्रमुखाच्यावेळी दिली जात नाही.
सैन्यदलांकडून
मानवंदना स्वीकारल्यानंतर दोन्ही राष्ट्रपमुख विशिष्ट दीर्घेमध्ये येऊन तिथे
उपस्थित असलेल्या आपापल्या बाजूच्या विशिष्ट व्यक्तींची ओळख एकमेकांना करून देतात
आणि स्वागतासाठीचा हा खास समारंभ संपतो.
पूर्वी भारतातील अशा स्वागत समारंभाची पद्धत अन्य देशांप्रमाणेच होती. त्यामध्ये सन्मान गार्ड (गार्ड ऑफ ऑनर) समारंभासाठी राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांच्या समोर तिन्ही दलांचे जवान दोन सलग ओळींमध्ये उभे राहत असत. भारत दौऱ्यावर आलेला नेता एकटाच सलामी मंचावर आल्यावर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत होत असे. त्यानंतर सन्मान गार्डच्या संयुक्त पथकाचे नेतृत्व करणारा अधिकारी सन्मानाने राष्ट्रप्रमुखाला ओळीने उभ्या असलेल्या जवानांच्या तुकड्यांचे निरीक्षण करण्यासाठी घेऊन जात असे आणि तो निरीक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्याबरोबर चालत जात असे. त्यावेळी सन्मान गार्ड पथकाचे संयुक्त नेतृत्व करण्याची संधी तिन्ही दलांना आळीपाळीने मिळत असे. पण आता त्रिदलीय सन्मान गार्डचे जवान तशा प्रकारे सरळ रेषेत उभे राहण्याची आणि तिन्ही दलांकडे या सन्मान गार्डचे नेतृत्व येण्याचीही परंपरा नव्या बदलांमध्ये बंद झाली आहे. मात्र या नव्या बदलांमुळे भारतातील विदेशी नेत्याच्या स्वागतासाठीचा खास समारंभ अधिक दिमाखदार आणि अनोखा झाला आहे.
(Photo-PIB)
👍
उत्तर द्याहटवा