अखेर प्रश्न मार्गी लागतोय..

Boeing 767
(Photo: Kedar Honap) 
  भारतीय हवाईदलासाठी इंधनवाहू विमानं खरेदी करण्याची प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे. त्यासंबंधीचा 1.1 अब्ज अमेरिकन डॉलरचा एक करार नुकताच भारताची हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि इस्रायलची इस्रायल एअरोस्पेस इंटस्ट्रिज (IAI) यांच्यात झाल्याचे वृत्त Defence News India वर प्रकाशित झालं होतं. 

   भारतीय हवाईदलाचं कार्यक्षेत्र संपूर्ण उत्तर हिंदी महासागरावर विस्तारलेलं आहे. अशा विस्तृत कार्यक्षेत्रावर सतत टेहळणी करण्यासाठी आणि प्रभाव ठेवण्यासाठी हवाईदलाच्या लढाऊ आणि मालवाहू विमानांना त्यांच्या हवाईतळांपासून दूरपर्यंत जावं लागत आहे. त्यांच्यात असलेल्या मर्यादित इंधन साठ्यामुळं त्या विमानांना इंधन भरण्यासाठी पुन्हा हवाईतळावर यावं लागतं. पण अशामुळं विमानांच्या प्रभावक्षेत्रावर मर्यादा येऊ शकतात. त्याचवेळी भारतीय हवाईदलाची विमानं गेल्या अनेक वर्षांपासून दूरवरच्या देशांमध्ये सरावांसाठी जात असतात. त्यावेळीही इंधनाच्या मर्यादेमुळं त्यांना वाटेतील मित्र देशांच्या हवाईतळांवर थांबे घ्यावे लागू शकतात. त्यातून मार्ग काढून हवाईदलाच्या विमानांना जास्तीतजास्त काळ हवेत राहता यावं किंवा दूरच्या देशात जाताना वाटेत थांबे घ्यावे लागू नयेत या हेतूंनी भारतानं रशियाकडून 2003 मध्ये सहा IL-78MKI टॅंकर विमानं विकत घेतली होती. सध्या भारतीय हवाईदलात ती कार्यरत असली तरी ती आता जुनी झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर सहा इंधनवाहू (Mid-air refueller) विमानं विकत घेण्याला अलिकडेच मंजुरी दिली गेली आहे. 

       आयएल- एमकेआयच्या सामिलीकरणानंतर अशा आणखी 6 टँकर विमानांची मागणी 2007 मध्ये हवाईदलानं केली होती. त्यानंतर 2009 आणि 2013 मध्ये टॅंकर विमानांच्या खरेदीसाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेत निवड झालेल्या A-330 MRTT विमानांची निवड झाली होती. मात्र त्यांची किंमत प्रचंड असल्यामुळं ती प्रक्रिया प्रत्येकवेळी थांबवण्यात आली होती.
    एकूणच हवाईदलासाठी शक्तिवर्धक (Force Multiplier) ठरणाऱ्या इंधनवाहू विमानांची किंमत तशी जास्तच असते. पण नवीन टँकर विमानं मिळण्यातील दिरंगाई आणि सध्या हवाईदलाकडे असलेल्या आयएल-78 विमानांची कमी झालेली उपलब्धता यांच्यामुळं हवाईदलाच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होत आहे. मग यातून मार्ग काढण्यासाठी अखेर असा निर्णय घेतला गेला आहे की, अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून वापरून झालेली (second-hand) 767-200 प्रकारची सहा प्रवासी विमानं विकत घ्यायची आणि इस्रायलच्या आयएआय कंपनीच्या मदतीनं त्यांचं भारतीय हवाईदलासाठी बहुउद्देशीय इंधनवाहू विमानांमध्ये रुपांतर करायचं. या पद्धतीमुळं हवाईदलाला हवी असलेली टँकर विमानं थेट नवीन टँकर विमानं खरेदी करण्यापेक्षा कमी किंमतीत मिळणार आहेत. यातील पहिले विमान 2029 पर्यंत भारतीय हवाईदलाला मिळण्याची शक्यता आहे.

 




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा