ओळख जर्मन भाषेशी

 

 

       मी सहावीत शिकत असताना जर्मनी देशाची मला पहिल्यांदा माहिती झाली होती. अगदी तेव्हापासूनच आपण ही भाषा पूर्ण शिकावी असं मला खूप वाटू लागलं होतं. तसं वाटण्यासाठी कारणीभूत ठरलं होतं त्यावेळी एका मराठी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होणारं ओळख जर्मन भाषेची हे सदर. विद्या भट यांचं ते सदर 1990 मध्ये दर रविवारच्या पुरवणीमध्ये मुलांच्या पानावर प्रकाशित होत होतं. त्या सदरामुळं जर्मन भाषा शिकावी असं अजूनच वाटू लागलं होतं. प्रत्यक्षात जर्मन शिकण्याची सुरुवात होईपर्यंत मी त्या सदरामध्ये दिलेली जर्मन वाक्ये पाठ करून बोलण्याचाही प्रयत्न चालू ठेवला होता. त्या सदराची कात्रणं आजही माझ्या संग्रहात आहेत.

       जर्मन शिकण्याची इच्छा असली तरी त्यावेळी कोल्हापुरात परकीय भाषा शिकणाची सोय नव्हती. त्यामुळं पुढची काही वर्षे तशीच निघून गेली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माझी परकीय भाषा शिकण्याची सुरुवात 1999 मध्ये झाली होती. त्यावर्षी मी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात जर्मन भाषेच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. त्या अभ्यासक्रमाची एप्रिल 2000 मध्ये झालेली परीक्षा मी पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो होतो. त्यासाठी मला शिवाजी विद्यापीठाकडून मेरीट सर्टिफिकेटही प्राप्त झालं होतं. विद्यापीठ स्तरावर मला मिळालेलं ते पहिलंवहिलं बक्षीस होतं. आता त्या घटनेला सव्वीस वर्षे झाली आहेत. पुढच्या काळात जर्मन भाषेच्या अभ्यासक्रमाचे पुढचे टप्पेही मी पूर्ण केले.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा