ताफा निरीक्षणाची ऐतिहासिक परंपरा


 

       येत्या 18 फेब्रुवारीला भारतीय नौदल आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण आयोजित करत आहे. बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम इथं हा भव्य सोहळा पार पडत आहे. भारतीय नौदलानं यावेळच्या आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षणच्या निमित्तानं मिलन-26 सराव आणि विविध देशांच्या नौदलप्रमुखांच्या इंडियन ओशन नेव्हल सिंपोझिअमचंही (IONS) आयोजन केलं आहे. हे सर्व कार्यक्रम 15 ते 25 फेब्रुवारीदरम्यान आयोजित केले जात आहेत. यामध्ये 72 देशांच्या नौदलांचा सहभाग असून त्यापैकी 21 देशांच्या युद्धनौका आणि अन्य जहाजं ताफा निरीक्षणात प्रत्यक्ष सहभागी होत आहेत.

भारतीय नौदलाकडून दर 5 वर्षांनी राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण (President’s Fleet Review) आयोजित केलं जात असतं. त्यावेळी भारतीय नौदलाच्या तयारीचा, ताकदीचा आणि भारताच्या अन्य सागरी साधनसामग्रीचा आढावा राष्ट्रपती घेत असतात. त्यावेळी राष्ट्रपती त्यांच्यासाठी नेमलेल्या खास युद्धनौकेवर स्वत: स्वार होऊन समुद्रात ओळीनं नांगरलेल्या जहाजं, युद्धनौका, पाणबुड्यांची पाहणी करतात. त्याचवेळी तटरक्षक दलाच्या नौका, भारताच्या मालवाहू जहाजांचा तसंच सागरी संशोधन करणाऱ्या जहाजांचाही त्यात सहभाग असतो. या निरीक्षणाच्यावेळी सहभागी झालेली सगळी जहाजं, युद्धनौका, पाणबुड्या नाविक क्षेत्रातील विविध प्रकारच्या छोट्या झेंड्यांनी सजवलेली असतात. या निरीक्षणात नौदलाच्या हवाई शक्तीचंही प्रदर्शन घडवलं जातं. राष्ट्रपतींची खास युद्धनौका समोरून जात असताना प्रत्येक युद्धनौकेवर ओळीनं उभे असलेले अधिकारी आणि नौसनिक राष्ट्रपतींचा जयजयकार करतात.

राष्ट्रप्रमुखाकडून नाविक ताफ्याचा आढावा घेण्याच्या या औपचारिक सोहळ्याला नौदलामध्ये अतिशय सन्मानाचं स्थान असतं. काही वेळा या निरीक्षण सोहळ्यामध्ये मित्र देशांच्या नौदलांनाही आमंत्रित केलं जातं. त्यावेळी त्याला राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षणाऐवजी आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण संबोधलं जातं. यंदाचं ताफा निरीक्षण भारतीय नौदलाचं तेरावं ताफा निरीक्षण असून ते आंतरराष्ट्रीय स्वरुपाचं असणार आहे. भारतात याआधी 2001 (मुंबई) आणि 2016 (विशाखापट्टणम) मध्ये आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण आयोजित केली गेली आहेत.

देशाच्या प्रमुखाकडून आपल्या नौदलाच्या तयारीचा आढावा घेण्याची प्रथा सतराव्या शतकात युरोपात होती, तशीच ती भारतातही होती. कोकण किनाऱ्यावर युरोपीय सत्तांच्या नाविक हालचाली वाढलेल्या असताना मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनीही आपल्या ताफ्याच्या तयारीचा आढावा घेतल्याचे उल्लेख आहेत.

#paragpurohitblog





टिप्पण्या

  1. पराग, लेख माहितीपूर्ण आहे. अभिनंदन!👍

    उत्तर द्याहटवा
  2. एक नविनच प्रथा प्रथमच समजली.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान लेख

    उत्तर द्याहटवा
  4. लेख खूपच छान माहिती पूर्ण आहे .

    उत्तर द्याहटवा
  5. छान माहिती सांगितली आहे

    उत्तर द्याहटवा
  6. 👍👍😊
    एवढ्या मोठ्या कार्यक्रमाबद्दल वर्तमानपत्रात / मीडियामध्ये काही आलेलं दिसलं नाही. 🤔

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा