जुन्या आठवणी ताज्या झाल्या...


 

रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी नुकताच भारताचा दौरा केला. त्या दौऱ्याच्यावेळी पुतीन यांच्या हस्ते आरटी-इंडियाया टी.व्ही. वाहिनीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यानंतर पूर्वीच्या रेडिओ व्हॉईस ऑफ रशियासंबंधीच्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

राजिओ गोलस रसिईम्हणजेच रेडिओ व्हॉईस ऑफ रशियाशी माझा संबंध २००१ मध्ये आला होता. त्यावेळी या नभोवाणी केंद्राचे हिंदी भाषेतील कार्यक्रम मी नियमित ऐकत होतो. त्याचबरोबर त्या केंद्रानं आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्येही नियमितपणे मी भाग घेत असे. त्या केंद्राशी हिंदी आणि कधीकधी रशियन भाषेतूनही माझा नियमित पत्रव्यवहारही सुरू असे. माझ्या पत्रांना प्रत्येकवेळी प्रतिसाद दिला जात होता. प्रतिसादामध्ये पत्रोत्तराबरोबरच रेडिओची कार्यक्रमपत्रिका, काही भेटकार्ड-भेटवस्तूही पाठवल्या जात असत.

‘व्हॉईस ऑफ रशिया’चे कार्यक्रम मी ऐकण्यास सुरुवात केली, त्याच्या काहीच दिवस अगोदर अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ ला दहशतवादी हल्ले झाले होते. अशा प्रकारच्या महत्वाच्या घटनांच्यावेळी त्याचं सर्वांगीण विश्लेषण ‘व्हॉईस ऑफ रशिया’कडून केलं जाई आणि तेही समतोल पद्धतीनं, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता आणि भडक भाषा न वापरता!

मी पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना माझं रशियन भाषेचं शिक्षणही सुरू होतं. या दोन्हींमध्ये मला व्हॉईस ऑफ रशिया केंद्रामुळं मदत होत राहिली.

भारतासाठी ‘व्हॉईस ऑफ रशिया’चे कार्यक्रम हिंदी, बंगाली आणि उर्दू भाषांमधून प्रसारित होत असले तरी रशियन आणि इंग्रजी भाषेतील प्रसारणसुद्धा भारतात ऐकता येत होतं. १९९२ पर्यंत या केंद्रावरून मराठीसह १६ भारतीय भाषांमधून कार्यक्रम प्रसारित होत असत. रोज संध्याकाळी ठीक साडेसहाला वाजणारी या नभोवाणी केंद्राची सिग्नेचर ट्यून आणि त्यानंतरची उद्घोषणा, ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ आजही कानात घुमत आहे. या केंद्राच्या उद्घोषकांच्या बोलण्यातून रशियन जनतेमध्ये भारताबद्दल असलेली आपुलकीची भावना स्पष्टपणे जाणवत असे. हे जगातील पहिलं आंतरराष्ट्रीय रेडिओ केंद्र होतं आणि बंद होण्याच्यावेळी जगातील तिसरं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय नभोवाणी केंद्र होतं.

‘व्हॉईस ऑफ रशिया’ भारतातील आपल्या श्रोत्यांचं नियमितपणे संमेलन आयोजित करत असे. नवी दिल्लीतील रशियन विज्ञान आणि संस्कृती केंद्रात ते संमेलन भरवलं जात असे. त्याच्या उद्घाटनाला भारतातील रशियन राजदूत येत असत. अशाच एका संमेलनाला २०१० मध्ये मी हजेरी लावली होती. तिथं मराठी उत्तमपणे बोलणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ रशिया’च्या उद्घोषिका श्रीमती लेबेदेवा यांच्याशी माझा थोडा मराठीतून, थोडा रशियनमधून आणि हिंदीतून संवाद झाला. त्या संमेलनाच्या उद्घाटनाला ‘भारतमित्र’ म्हणून ओळखले जाणारे भारतातील तत्कालीन रशियन राजदूत अलिक्सांदर एम. कदाकिन उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा