‘राष्ट्रपती विशेष’ रेल्वेगाडी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या Presidential Suite मध्ये


      राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 सप्टेंबरला एका विशेष रेल्वेगाडीतून दिल्ली-मथुरा-दिल्ली असा प्रवास केला. राष्ट्रपतींनी रेल्वेगाडीतून प्रवास करणं बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झालेलं होतं, पण अलिकडच्या काळात राष्ट्रपती कधीकधी रेल्वेगाडीतून प्रवास करत असतानाचं चित्र पुन्हा पाहायला मिळू लागलं आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, रामनाथ कोविंद आणि आता द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळात रेल्वेगाडीतून प्रवास केला आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी या आधी जून 2023 मध्ये भुवनेश्वरहून त्यांच्या मूळगावापर्यंत - रायरंगपूरपर्यंत रेल्वेगाडीतून प्रवास केला होता. त्याआधी 25 जून 2021 ला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दिल्लीहून कानपूरजवळच्या परौंख या आपल्या मूळगावी जाण्यासाठी 438 किलोमीटरचा रेल्वे प्रवास केला होता. अलिकडील काळात भारताच्या राष्ट्रपतींनी केलेला तो सर्वाधिक लांबचा रेल्वे प्रवास ठरला होता.

राष्ट्रपती मुर्मू यांची राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडी दिल्लीमधल्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सकाळी 8:10 ला सुटली होती. या राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडीला आलिशान महाराजा एक्सप्रेसचे 12 डबे आणि अन्य 4 डबे जोडण्यात आले होते. त्यामध्ये 1 Presidential Suite राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी राखीव होता. त्याचबरोबर या गाडीला 2 Luxury Suites, 2 भोजनयान डबे, 2 आलिशान विश्रामालये असलेले डबे (lounge), 1 स्वयंपाकघर डबा, 1 खास डबा राष्ट्रपतींच्या कर्मचाऱ्यांसाठी, राष्ट्रपतींच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 3 खास डबे (Suite) आणि 2 जनरेटर डबे जोडण्यात आलेले होते. राष्ट्रपतींसोबत जात असलेल्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसाठी 2 सामान्य वातानुकुलित डबेही या गाडीला जोडले होते. या रेल्वेगाडीला दोन अत्याधुनिक डब्ल्यूएपी-7 इंजिनं जोडण्यात आली होती.

राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडी भारतीय रेल्वेची अतिसुरक्षित आणि समारंभी रेल्वेगाडी मानली जाते. त्यामुळं राष्ट्रपती मुर्मू यांच्या राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडीचं संचालन अशा रेल्वेगाडीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष नियमावलीनुसार करण्यात आलं. या प्रवासादरम्यान संपूर्ण लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंना कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडीच्या सुरक्षित प्रवासासाठी तिच्या पुढं काही अंतरावर एका डब्याची पायलट ट्रेन धावत होती. राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडीला मोकळा मार्ग देण्यासाठी या मार्गावरून धावत असलेल्या इतर सर्व रेल्वेगाड्यांना बऱ्याच आधीपासून बाजूला उभे करून ठेवण्यात आलं होतं.

      137 किलोमीटरचं अंतर 1 तास 50 मिनिटांत पूर्ण करत राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडी सकाळी 10 वाजता मथुऱ्याला पोहचली. त्यानंतर दिवसभरात मथुऱ्यातील कार्यक्रम आटपल्यावर संध्याकाळी राष्ट्रपतींनी दिल्लीपर्यंत पुन्हा याच रेल्वेगाडीने प्रवास केला. या प्रवासादरम्यान राष्ट्रपतींबरोबर असलेल्या विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खानपानाची व्यवस्था Restaurant Cars मध्ये करण्यात आली होती.

Old Presidential Saloon built in 1956

भारताच्या राष्ट्रपतींसाठी रेल्वेचे स्वतंत्र आलिशान डबे 1956 मध्ये तयार करण्यात आले होते. पण त्या डब्यांचं आयुर्मान संपलं असल्यामुळं 2008 मध्ये ते सेवेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपतींसाठी अत्याधुनिक रेल्वे डबे बांधण्याचा प्रस्ताव 2017 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती कोविंद यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. त्या दोन डब्यांसाठी सुमारे 8 कोटी रुपये खर्च येणार होता. त्यामुळं इतके खर्चिक डबे बांधण्याऐवजी देशातल्या आलिशान पर्यटक गाड्यांचेच डबे राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्यावेळी राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा