सहा दशकांच्या सेवेची अखेर!


      भारतीय हवाईदलाच्या स्थापनेला 93 वर्षे पूर्ण होत असतानाच त्यात नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या मिग-21 लढाऊ विमानाला भावपूर्ण निरोप दिला गेला आहे. 26 सप्टेंबर 2025 ला चंदिगडच्या हवाईदल स्थानकावर पार पडलेल्या समारंभात या विमानांनी शेवटचं Operational उड्डाण केलं. त्यावेळी एका विमानाचं सारथ्य हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी केलं होतं. अखेरचं उड्डाण करून उतरल्यावर मिग-21 ला water cannon salute देण्यात आला.

      मिग-21 ला 1963 मध्ये चंदिगडच्याच हवाईतळावर भारतीय हवाईदलात सामील करण्यात आलं होतं. भारतीय हवाईदलाचं ते पहिलं स्वनातीत म्हणजेच सुपरसॉनिक विमान होतं. त्यानंतर तब्बल 62 वर्ष हे विमान हवाईदलात कार्यरत राहिलं होतं. या सहा दशकांमध्ये मिग-21 चं वेळोवेळी आधुनिकीकरण करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यामध्ये भारतीय हवाईदलाच्या गरजांनुरुप बदल करून वेगवेगळ्या आवृत्त्या सामील केल्या गेल्या. सामिलीकरणानंतर मिग-21 भारतीय हवाईदलाचा लढाऊ शक्तीचा कणा राहिलं होतं.

      1971 मधल्या भारत-पाक युद्धात या विमानांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर कारगिल संघर्षातही या मिग-21 चा महत्वाचा सहभाग होता. पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ती घुसखोरी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या मिग-21 विमानानंच रोखली होती. एकूणच भारतीय हवाईसीमांचं संरक्षण करण्यात मिग-21 नं मोठी जबाबदारी पार पाडली होती.

      गेल्या काही वर्षांमध्ये होत गेलेल्या सततच्या अपघातांमुळं मिग-21 विमानांना बदनाम व्हावं लागलं होतं. त्यामागं काही कारणंही होती. पण त्यामुळं त्यांनी आजपर्यंत भारताच्या हवाई संरक्षणात बजावलेली भूमिका अजिबात कमी लेखता येणार नाही.

      8 ऑक्टोबर 1932 ला पहिल्या पिढीच्या वेस्टलँड वापिटी विमानापासून भारतीय हवाईदलानं आपला प्रवास सुरू केला होता. आता त्यात पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांना सामील करण्यात येणार आहे.


#IndianAirForce #Mig-21 #VayuSena #AirForce

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा