पुणे शहर आणि त्याच्या
आसपासच्या परिसरात आज अनेक ऐतिहासिक, वैशिष्ट्यपूर्ण इमारती आहेत. पुणे रेल्वेस्थानकाची सध्याची मुख्य इमारत त्यांच्यापैकीच एक. या प्रशस्त इमारतीचं उद्घाटन
मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते 27 जुलै 1925 रोजी
झालं होतं. या 27 जुलैला या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावरून वाढत
असलेल्या वाहतुकीची गरज विचारात घेऊन 1920 च्या दशकात पुणे रेल्वे स्थानकाचा
पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलं होतं, त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे स्थानकाची
नवी इमारत उभारली गेली होती. त्या आधी तिथं मध्यभागी मुख्य प्रवेशद्वार असलेली
काळ्या पाषाणातील एक मजली कौलारू इमारत होती.
नवीन इमारत उभारत असताना
तत्कालीन जी. आय. पी. कंपनीच्या विविध प्रशासकीय विभागांच्या कार्यालयांसाठी इतर
इमारतीही या मुख्य इमारतीच्या आसपास नव्यानं उभारल्या गेल्या.
स्वातंत्र्यपूर्वकाळात पुणे आणि त्याच्या आसपासचा परिसर थेट ब्रिटिश सरकारच्या
अधिपत्याखाली होता. त्यामुळं रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीच्या आरेखनावर
स्थानिक आणि पाश्चात्य वास्तुशैलींची छाप दिसते. पांढऱ्या रंगातील या इमारतीला
असलेलं लाल कौलांचं उतरतं छत या इमारतीच्या सौंदर्यात भर घालते. असं छत भारतीय
वास्तुशैलीशी साधर्म्य सांगते. या उतरत्या छतामध्येच झरोके केलेले आहेत. ही इमारत
दोन मजली असून तिच्या संपूर्ण दर्शनी बाजूला तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर
प्रशस्त व्हरांडा केलेला आहे. पहिल्या मजल्यावर अनेक प्रशस्त कक्ष असून त्यांचा
वापर पूर्वी पुणे स्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या उच्चपदस्थ ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या
विश्रांतीसाठी केला जात होता. सध्या त्या कक्षांचा वापर यात्री निवासासारख्या
सुविधांसाठी केला जात आहे. इमारतीच्या मूळ स्वरुपाला कोठेही धक्का न लावता
काळानुरुप अनेक आधुनिक सुविधाही या इमारतीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मुख्य प्रवेशद्वारातून
पहिल्या क्रमांकाच्या फलाटावर जाताना जुन्या पद्धतीचे एक लोखंडी गेटही बसवण्यात
आले होते. पहिल्या क्रमांकाच्या फलाटावर असलेल्या काँक्रिटच्या आच्छादनाला झरोके
केलेले आहेत. पूर्वी ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकारी येणार असलेल्या रेल्वेगाड्या या फलाटावरच
येत असत. म्हणून त्यांचे ऊन-पावसापासून संरक्षण करण्यासाठी ही व्यवस्था केलेली
होती.
पुणे रेल्वे स्थानकाच्या
या ऐतिहासिक इमारतीचे जतन करून अन्य स्टेशन परिसराचा पुनर्विकास केला जाणार आहे.
त्याचबरोबर या रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीला युनेस्कोच्या जागतिक वारसा
स्थळांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत.
#IndianRailways #Railway #PuneRailwayStation #railway-station #historical-monuments-in-pune
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा