6 ऑगस्ट 1945, सकाळी सव्वाआठ वाजता....

     6 ऑगस्ट 1945 ला सकाळी ठीक सव्वाआठ वाजता जपानमधल्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेनं अण्वस्त्र डागले गेले. जगाच्या इतिहासामधला अण्वस्त्राचा युद्धात झालेला तो पहिलाच प्रसंग होता. जगाच्या भविष्यावर परिणाम करणाऱ्या त्या घटनेला यावेळी 80 वर्ष पूर्ण झाली आहेत.

जर्मनीच्या शरणागतीनंतर 9 मे 1945 ला युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला असला तरी आशियात ते महायुद्ध अजून संपलेलं नव्हतं. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानला लवकरात लवकर शरणागती पत्करायला लावणं हे अमेरिकेला आपल्या राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रहितांच्या दृष्टीनंही अतिशय महत्वाचं वाटत होतं. म्हणूनच जपानच्या आघाडीवरही युद्धसमाप्तीसाठी प्रयत्न वाढवण्यात आले. जपानला शरणागती स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याच्या दृष्टीने अमेरिकेने गुप्त मॅनहॅटन प्रकल्प हाती घेतला होता. त्याच्या पहिल्या टप्प्यात 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात त्रिनिटीया जगातील पहिल्या अण्वस्त्राची चाचणी घेतली. ती चाचणी यशस्वी झाल्यावर या नव्या अस्त्राच्या मदतीनं जपानला आपल्या अटींवर शरणागती पत्करायला लावण्यासाठी मित्र देशांच्या हालचाली सुरू झाल्या. 6 ऑगस्टला पहाटे प्रशांत महासागरामधल्या तिनियान (या बेटावरच्या अमेरिकेच्या हवाईतळासंबंधीच्या माझ्या ब्लॉग लेखाची लिंक) बेटावरच्या हवाईतळावरून अमेरिकेच्या इनोला गे नावाच्या (बी-29 सुपरफोर्ट्रेस) बाँबर विमानानं अण्वस्त्रासह हिरोशिमाच्या दिशेनं उड्डाण केलं आणि सकाळी ठीक सव्वाआठला त्यावर अण्वस्त्र डागलं. त्यानंतर त्याच तळावरून 9 ऑगस्टला आणखी एक अण्वस्त्र घेऊन गेलेल्या Bockscar बी-29 विमानानं जपानच्या नागासाकी शहरावरही अण्वस्त्र डागलं. मॅनहॅटन प्रकल्पात तयार करण्यात आलेली ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्र होती. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 ला जपाननं विनाअट शरणागती पत्करली.

हिरोशिमावरील अण्वस्त्र हल्ल्यात सुमारे 1,40,000 हजार आणि नागासाकीवरच्या हल्ल्यात सुमारे 70,000 लोकांचा बळी गेला होता. दोन्ही शहरे तर बेचिराख झाली. त्या हल्ल्यांमधल्या बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्या हल्ल्याची आठवण जगाच्या कायम स्मरणात राहावी यासाठी आणि अण्वस्त्रांपासून जग मुक्त करण्याच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी दरवर्षी 6 ऑगस्टला हिरोशिमा दिन आणि 9 ऑगस्टला नागासाकी दिन पाळला जाऊ लागला.

अणुहल्ल्याच्या जखमा जपानसाठी कधीच न विसरता येणाऱ्या आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस मित्रदेशांबरोबर स्वीकाराव्या लागलेल्या शरणागतीच्या संधीमध्ये जपानला अनेक अशा अटी स्वीकाराव्या लागल्या आहेत, ज्यामुळे जपान एक सार्वभौम, लोकशाही राष्ट्र म्हणून उदयाला आले असले तरी त्याच्या सार्वभौमत्वाला काही बाबतीत मर्यादा आल्या आहेत. त्या अटींची छाप जपानच्या राज्यघटनेवरही पडलेली दिसते. त्याचवेळी महायुद्धामुळं कोसळलेलं राहणीमान आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासारखी प्रचंड आव्हानं जपानसमोर उभी राहिली होती. पण पुन्हा उभे राहण्याची उर्मी आणि त्यासाठी कितीही श्रम करण्याची चिकाटी अशा विविध गुणांमुळे जपानने राखेतून भरारी घेण्यास सुरुवात केली. 1960 पासून राबवल्या गेलेल्या आर्थिक धोरणांमुळं जपानची अर्थव्यवस्था पुढील तीन दशकात एक विकसित अर्थव्यवस्था बनली.

हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुहल्ल्यांनंतर कोठेही युद्धामध्ये अण्वस्त्रांचा वापर करण्यात आलेला नाही. त्या हल्ल्यांमुळं या नव्या अस्त्राची परिणामकारकता जगाच्या लक्षात आली. म्हणूनच लगेच अशी अस्त्रे स्वत:जवळ बाळगण्यासाठी जगभरातील बड्या देशांचे प्रयत्न सुरू झाले आणि काही काळातच त्यांच्यामध्ये अण्वस्त्र स्पर्धासुद्धा सुरू झाली. त्यापाठोपाठ दुसरीकडे या अस्त्रांची महासंहारकता पाहून त्यांना जगभरातून विरोधही सुरू झाला. या दोन्ही गोष्टी साधारणत: एकाचवेळी सुरू झाल्या होत्या. अण्वस्त्रांना विरोध करणाऱ्या देशांमध्ये अर्थातच जपान आघाडीवर राहिला आहे. जगात होत असलेल्या अण्वस्त्रप्रसारालाही त्याने कठोर विरोध केलेला आहे. अशी अस्त्रे विकसित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या देशांवर त्याने कठोर निर्बंधही लादले आहेत, अगदी भारतावरही! नवी दिल्ली आणि टोकियो यांच्यातील संबंध कायमच घनिष्ठ राहिलेले आहेत. पण पोखरणमध्ये अणुचाचण्या केल्यावर भारतावर निर्बंध लादण्यात जपानने मागेपुढे पाहिलेले नाही.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा