भारतात अडकून पडलेलं F-35B परतलं...

F-35A

 

               ब्रिटनच्या रॉयल नेव्हीचं F-35B Lightening II हे पाचव्या पिढीचं अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमान त्यात उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडांमुळं गेल्या एक महिन्याहून अधिक काळ थिरुवनंतपुरमच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडलं होतं. ब्रिटिश तंत्रज्ञांना ते बिघाड दूर करण्यात यश आलं आणि त्यानंतर 22 जुलैला त्या विमानानं ऑस्ट्रेलियामधल्या डार्विनच्या दिशेनं उड्डाण केलं. दरम्यान, जगातलं सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान अशी ख्याती मिरवणाऱ्या या विमानाला समाज माध्यमांमधून ट्रोल व्हावं लागलं.

      रॉयल नेव्हीचा HMS Prince of Wales या विमानवाहू जहाजाचा ताफा 14 जूनला अरबी समुद्रातून सिंगापूरच्या दिशेनं जात होता. त्यावेळी त्या जहाजावरून नियमित गस्तीसाठी उड्डाण केलेल्या F-35B विमानानं केरळजवळच्या खराब हवामानाच्या क्षेत्रात केला. त्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं आणि इंधनही कमी असल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं. म्हणून त्यानं जवळच्या थिरुवनंतपुरमच्या विमानतळावर आपत्कालीन संदेश पाठवून विमान उतरवण्याची परवानगी मागितली आणि त्याला ती देण्यात आली. 14 जूनला रात्री साडेनऊच्या सुमारास हे विमान थिरुवनंतरपुरमला उतरलं. त्याची तपासणी केल्यावर त्याच्या हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड झाल्याचं लक्षात आलं. परिणामी त्याला पुन्हा उड्डाण करून HMS Prince of Wales कडं जाणं अशक्य होऊन बसलं. ही हायड्रॉलिक यंत्रणा विमानाच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करते आणि विमानाचं सुरळीत संचालन करण्यासाठी अतिशय महत्वाची असते.

      थिरुवनंतरपुरमच्या विमानतळावर पाचव्या पिढीच्या विमानातील दोष दूर करण्यात यश येत नव्हतं. त्यातच त्या F-35B वर अतिशय संवेदनशील यंत्रणांमुळं बसवलेल्या असल्यामुळं भारतात त्याला खोलून ते दुरुस्त करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळं त्या विमानाला रॉयल एअर फोर्सच्या मालवाहू विमानातून मायदेशी नेण्याच्या पर्यायाचाही विचार केला जात होता. पण शेवटी 6 जुलैला ब्रिटिश तज्ज्ञांचं एक पथक थिरुवनंतरपुरमला पोहचल्यावर या विमानाला विमानतळावरच्या एअर इंडियाच्या एका हँगरमध्ये नेलं गेलं. तोपर्यंत उघड्यावरच असलेल्या या विमानाच्या आसपास कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. कोणालाही त्याच्या आसपासही जाऊ दिलं जात नव्हतं. ते विमान असलेल्या त्या हँगरला एखाद्या किल्ल्यामध्ये परावर्तित केलं गेलं होतं. भारतीय अधिकारी, सुरक्षा दलाच्या जवानांनाही हँगरमध्ये प्रवेश दिला गेला नाही.

      अमेरिकन बनावटीच्या F-35 विमानांची ओळख जगातील सर्वात अत्याधुनिक आणि सर्वात महागडं लढाऊ विमान अशी आहे. या एका विमानाची किंमत 11 अब्ज डॉलर्स इतकी आहे. F-35 विमानाच्या विकास प्रकल्पावर त्यासाठी येत असलेल्या खर्चावरून आधीपासूनच टीका होत होती. विमान पूर्ण विकसित झाल्यावर त्याच्या कार्यक्षमतेवरूनही नंतरच्या काळात टीका होऊ लागली. अमेरिकेच्या Congressional Budget Office च्या ताज्या अहवालातही याबाबत टिप्पणी केली गेली आहे. त्या अहवालातील निरीक्षणानुसार या विमानाचा प्रकल्प इतका महागडा ठरला असूनही F-35 ची कार्यक्षमता त्या मानानं कमीच आढळत आहे. या विमानांची उपलब्धता 52 ते 55 % राहत आहे. या अहवालाच्या मते, अमेरिकन हवाई दलातील इतर लढाऊ विमानांच्या तुलनेत F-35 कमी वेळ उड्डाण करत आहेत. या विमानाच्या टीकाकारांच्या मते, F-35 च्या विकासाच्यावेळी अमेरिकन हवाई दलाने विमानात हव्या असलेल्या अपेक्षित वैशिष्ट्यांची भलीमोठी यादी दिली होती. ती सगळी वैशिष्ट्ये विमानात समाविष्ट करताना विमानाच्या आरेखनावर परिणाम झालेला आहे. त्यातूनच या विमानाची यंत्रणा अतिशय किचकट बनत गेली आहे. एकीकडे F-35 विमानाचा प्रकल्प अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडा संरक्षण प्रकल्प ठरला असतानाच त्याच्या देखभाली-दुरुस्तीवरही प्रचंड खर्च येत आहे.

      ब्रिटनच्या National Audit Office च्या अहवालानुसार, रॉयल एअर फोर्स आणि रॉयल नेव्हीकडं F-35 विमानांसाठीचे वैमानिक, तंत्रज्ञ आणि विमानाच्या सुट्या भागांचीही बरीच कमतरता आहे. त्याचा विपरीत परिणाम F-35 च्या संचालन आणि देखभालीवर होत आहे. त्याचा परिणाम म्हणूनच रॉयल नेव्हीच्या F-35B भारतात इतके दिवस अडकून पडावं लागलं.

थिरुवनंतरपुरम विमानतळावरील त्या विमानाच्या इतक्या दिवसांचं पार्किंग शुल्क आणि रॉयल नेव्हीच्या कर्मचाऱ्यांना पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधांपोटी भारताला जवळजवळ 9 लाख रुपये मिळाले आहेत.

      पाचव्या पिढीचं अत्याधुनिक स्टेल्थ पहिलं F-35A हे लढाऊ विमान अमेरिकेच्या हवाई दलात 31 जुलै 2015 ला सामील करण्यात आलं होतं. सध्या अमेरिकेबरोबरच एकूण 12 देश F-35 विमानांचं संचालन करत आहेत. नुकताच ब्रिटन (12) आणि जर्मनीनं (15) F-35 विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अजून आठ देश या विमानाचे नवे ग्राहक रांगेत आहेत. भारतानं ही विमानं खरेदी करावीत यासाठी अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी आग्रह धरला आहेच.

टिप्पण्या

  1. या लेखामधून आपल्याला माहिती नसलेल्या बऱ्याच गोष्टींचा उलघडा झालेला आहे. त्याबाबत लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा