आकर्षक सीएसएमटीत फेरफटका

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

       मध्यंतरी मुंबईला जाणं झालं. जाताना येताना दख्खनच्या राणीचं आरक्षण केलं होतं. सकाळी मुंबईत पोहचल्यावर तीनपर्यंत तिथली कामं आटोपली. अजून दख्खनच्या राणीला वेळ असल्यामुळे विचार केला की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) ऐतिहासिक इमारतीची वारसा फेरफटका (Heritage Tour) मारून यावे. एरवी CSMT चा काही भाग आपल्या दर्शनास पडत असतो. पण या फेरफटक्यात आपल्याला CSMT वेगळ्या रुपात पाहायला मिळते. यंदाच्या रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने अशा या ऐतिहासिक CSMT च्या इमारतीत मारलेला फेरफटका.

16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर आणि ठाणेदरम्यान 33 किलोमीटरच्या लोहमार्गावर आशियातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली होती. भारतात लोहमार्ग वाहतुकीची सुरुवात करणाऱ्या त्या ऐतिहासिक घटनेचे 173वे वर्ष येत्या 16 एप्रिलला सुरू होत आहे. या काळात देशात झालेल्या अनेक स्थित्यंतरांची भारतीय रेल्वे साक्षीदार राहिली आहे. तसेच रेल्वेने राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या विकासातही अतूल्य योगदान दिलेले आहे. भारतीय रेल्वेच्या या ऐतिहासिक वाटचालीला सुरुवात झाली होती, त्या बोरीबंदर स्थानकाच्या जागी 1888 मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उभे राहिले. जगातील आकर्षक रेल्वेस्थानक ठरलेल्या या स्थानकाच्या इमारतीला युनेस्कोनं जुलै 2004 मध्ये जागतिक वारसा स्थळ घोषित केलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) ऐतिहासिक आणि आकर्षक इमारतीचे सौंदर्य सर्वसामान्यांना पाहता यावे यासाठी 2016 पासून इथे गायडेड टूरचे आयोजन करण्यात येते. एरवी जाता-येता या इमारतीचा काही भागच आपल्या नजरेस पडत असतो. पण या फेरफटक्यात आपल्याला ही इमारत वेगळ्या रुपात पाहायला मिळते. पूर्वी इमातीच्या मुख्य दर्शनी बाजूकडून आत गेल्यावर संग्रहालयाची तिकीट खिडकी होती. पण आता या गायडेड टूरसाठी आधी ऑनलाईन बुकींग करून शुल्क भरावे लागते. तसेच या टूरसाठी आलेल्या प्रत्येकानं आपल्या ओळखीच्या पुराव्याची प्रत सादर करावी लागते. संग्रहालय पाहण्यासाठी तिकीटाचा दर आहे प्रत्येकी 500/- फक्त. विद्यार्थ्यांसाठी तिकिटदर आहे 120 रुपये. पण या वारशाची, तेथील सुंदर कलेची प्रत्यक्ष माहिती करून घ्यायची असेल, तर हे दर द्यायला हरकत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज (ट) म्हणजेच पूर्वीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसच्या इमारतीचे बांधकाम 1878 ते 1888 दरम्यान झाले. एफ. डब्ल्यू. स्टिव्हंस याने या इमारतीचे आरेखन केले आहे. व्हिक्टोरियन गॉथिक रिव्हायव्हल वास्तुशैलीत उभारलेल्या या इमारतीमध्ये अनेक वैशिष्ट्यांचा समावेश करून ती अधिक आकर्षक कशी दिसेल याकडे लक्ष दिले गेले. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उभारल्या जात असलेल्या या इमारतीला एक स्मारक म्हणून सादर करण्याकडे लक्ष दिले गेले होते. पूर्वी Great Indian Peninsula Railway (G.I.P.R) कंपनीचे आणि आता मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय या इमारतीत आहे. त्यावेळची ही आशियातील सर्वात मोठी इमारत ठरणार होती. 

तिकीटांची तपासणी आणि इतर औपतारिकता पूर्ण झाल्यावर या आकर्षक इमारतीची सहल सुरू होते. गायडेड टूरमध्ये इमारतीच्या अंतर्गत भागातील आकर्षक कलाकुसर आपल्याला अगदी जवळून पाहता येते. तळमजल्यावर असलेल्या संग्रहालयात सर्वात आधी आपण प्रवेश करतो. तिथे व्हरांड्यात ठेवलेले बार्शी लाईट रेल्वेवर वापरल्या जाणाऱ्या वाफेच्या इंजिनाचे मॉडेल स्वत:कडे आपले लक्ष वेधून घेते. 
     या संग्रहालय कक्षात जी.आय.पी. रेल्वेवर वापरली जाणारी विविध प्रकारची यंत्रे, उपकरणे, हत्यारे, जुनी छायाचित्रे, इंजिने आणि डब्यांची मॉडेल्स ठेवलेली आहेत. Block Instruments, Morse Machine, Line Relay machines इत्यादींचा त्यात समावेश आहे. तसेच 1849 ते 1950 या काळातील जी.आय.पी. रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध संस्थानांच्या रेल्वेची बोधचिन्हे एका फलकावर दाखवण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वेवर टपाल विभागाने काढलेली टपाल तिकिटांची माहितीही दिलेली आहे. एका बाजूला स्वातंत्र्यलढ्यातील रेल्वेच्या सहभागाविषयीची माहिती सचित्र मांडण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी आणि रेल्वे यांच्याशी संबंधित छायाचित्रांचा समावेश आहे. कक्षाच्या मध्यभागी विविध प्रकारच्या रेल्वेची उपकरणे आणि साधनांबरोबरच इतर माहिती फलकही लावलेले आहेत.
     
     संग्रहालयातून बाहेर पडल्यावर आपण जातो इमारतीतील भोजनकक्षात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश अधिकारी आणि मान्यवर व्यक्तींच्या भोजनावळींसाठी या कक्षाची निर्मिती करण्यात आली होती.
  

भोजनकक्षानंतर पुढे या इमारतीच्या मुख्य घुमटाखाली आपण येतो. नेहमी बाहेरून पाहिलेला हा घुमट आतून वेगळाच आणि आकर्षक दिसतो. इथूनच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मुख्य जिना आहे. या जिन्याला दगडात घडवलेला आकर्षक कठडा आहे. या जिन्यावरून पहिल्या मजल्यावर गेल्यावर तिथल्या गॅलरीतून आपल्याला स्टार चेंबर दाखवला जातो. 

Star Chamber
या स्टार चेंबरमध्येच आता अनारक्षित तिकीट खिडक्या सुरू आहेत. या सर्व फेरफटक्यामध्ये आपण इमारतीच्या प्रशस्त आणि आकर्षक व्हरांड्यांमधून जात असतो. त्यावेळी व्हरांड्याच्या आजूबाजूने असलेली कलाकुसर आणि अधूनमधून दिसणारी तिथं ठेवलेली वाफेच्या इंजिनांची मॉडेल्स आपला फेरफटका अधिक रोमांचकारी बनवतात.

या टूरचा शेवट इमारतीच्या मुख्य प्रांगणात होतो. याच प्रांगणाला लागूनच इमारतीचे मुख्य लोखंडी फाटक आहे.

टिप्पण्या