मी हे पाहायला नक्की जाईन!

 

लोथलमधील प्राचीन वसाहतीचे अवशेष (फोटो-सुभाष पुरोहित)

भारताचा सागरी इतिहास प्रदीर्घ, दैदिप्यमान आणि तितकाच रोचकही आहे. सागरी इतिहास हा भारताच्या इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग राहिला आहे. तरीही सुमारे पाच हजार वर्षांचा हा इतिहास आपल्याकडं फारसा अभ्यासला जात नाही. त्याविषयीची माहितीही आपल्याकडे अनेकांना नसते. त्यामुळं आपल्या या प्राचीन आणि समृद्ध सागरी इतिहासाच्या वारशाची ओळख संपूर्ण जगाला व्हावी आणि त्यामधील संशोधनाला चालना मिळावी या हेतूंनी गुजरातमध्ये लोथल इथं भव्य राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय संकुल (National Maritime Heritage Museum Complex) साकारलं जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम या वर्षी ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

लोथलमध्ये उभारल्या जात असलेल्या
राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाचं संकल्पनाचित्र
(फोटो-पीआयबी)

लोथल ही इ.स.पूर्व 2400 वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतील एक वसाहत होती. तिथं एक प्रगत गोदी अस्तित्वात होती. त्यामुळं ते व्यापारीदृष्ट्या महत्वाचे शहर बनलं होतं. हे शहर इथल्या मणी उद्योगासाठी प्रसिद्ध होतं. इथं सापडलेल्या शिक्केसाधने आणि मातीच्या भांड्यांसारख्या अवशेषांमधून त्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आर्थिक वारशाची झलक दिसून येते. या सर्वांमुळं लोथलला हडप्पा संस्कृतीचं महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. भारताचा 4,500 वर्षांचा सागरी वारसा प्रदर्शित करण्यासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, लोथलमध्ये बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय लोथल येथे जागतिक दर्जाचे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) उभारत आहे.

एनएमएचसीचा बृहत आराखडा प्रसिद्ध वास्तुरचना फर्म मेसर्स आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टरने तयार केला आहे आणि टप्पा 1A चे बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडे सोपवण्यात आले आहे.

एनएमएचसी विविध टप्प्यांत विकसित करण्याची योजना आहे, ज्यामध्ये:

·         टप्पा 1A मध्ये 6 गॅलऱ्या असलेले एनएमएचसी संग्रहालय असेल, ज्यामध्ये भारतीय नौदल आणि तट रक्षक गॅलरी देखील समाविष्ट आहे. यात बाह्य नौदल सामग्री (INS निशंक, सी हॅरियर लढाऊ विमान, UH3 हेलिकॉप्टर इ.), लोथल शहराची प्रतिकृती, त्याभोवती खुली ऍक्वेटिक गॅलरी आणि जेट्टी वॉकवे यांचा समावेश असून अशा प्रकारची ती जगातली सर्वात मोठी गॅलरी बनवण्याची योजना आहे.

·         टप्पा 1B मध्ये आणखी 8 गॅलऱ्या असलेले एनएमएचसी संग्रहालय, जगातील सर्वात उंच ठरणारे नियोजित दीपगृह संग्रहालय, उद्यान संकुल, सुमारे 1500 कारसाठी कार पार्किंग सुविधा, फूड हॉल, मेडिकल सेंटर इ. असेल.

·         टप्पा 2 मध्ये किनारी राज्ये पॅव्हेलियन (संबंधित किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे विकसित केली जातील), हॉस्पिटॅलिटी झोन (सागरी थीम इको रिसॉर्ट आणि म्युझ्युओटेल्ससह), रिअल टाइम लोथल सिटी, मेरीटाइम संस्था आणि वसतिगृह आणि 4 संकल्पना आधारित पार्क (सागरी आणि नौदल थीम पार्क, हवामान बदल थीम पार्क, स्मारक पार्क आणि साहसी आणि मनोरंजन पार्क) असतील.

लोथलमधल्या या भव्यदिव्य संग्रहालयाचं काम आता वेगानं सुरू आहे. गेल्या वर्षी माझ्या वडिलांनी लोथलमधील या ऐतिहासिक ठिकाणाला भेट दिली होती. त्यांना तिथं ऐतिहासिक अवशेष प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मिळाला होता. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या तिथल्या अनुभवांनंतर मलाही लोथलला जायची इच्छा निर्माण झाली आहे आणि या संग्रहालयाचं उद्घाटन झाल्यावर त्याला भेट द्यायचीच, असं मी नक्की केलं आहे.

टिप्पण्या

  1. ज्यांना या बद्दल माहित नाही , त्यांना ही या लेखामुळे माहिती झाली.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. लेख वाचून त्यावर दिलेल्या टिप्पणीकरता धन्यवाद.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा