भारताच्या मध्यबिंदूवरचं रेल्वे स्थानक


       नागपूर म्हणजे भारताचा मध्य. स्वातंत्र्यपूर्व काळात ही मध्य प्रांताची राजधानी होती. स्वातंत्र्यानंतर झालेल्या नागपूर करारानं या शहराला महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मान मिळाला. देशाचे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण जाणारे लोहमार्ग जिथं एकत्र येतात ते इथलं रेल्वे स्थानक. या रेल्वे स्थानकाच्या सुंदर इमारतीला आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत.

नागपूरमध्ये लोहमार्ग वाहतूक सुरू झाली 20 फेब्रुवारी 1867 मध्ये. त्यानंतर 1889 मध्ये तेव्हाच्या Great Indian Peninsula Railway आणि Bengal-Nagpur Railway या रेल्वे कंपन्यांमध्ये नागपूरमध्ये जंक्शन उभारण्यासंबंधीचा करार झाला होता. त्या आधीपासून या स्थानकावरचा वाहतुकीचा ताण खूप वाढत चालला होता आणि आता तो आणखी वाढणार होता. म्हणूनच नागपूर जंक्शनच्या विस्तारासाठी नव्या ठिकाणी स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आधीच्या स्थानकाच्या पश्चिमेकडे साधारण एक किलोमीटरवर नव्या स्थानकासाठीची जागा निश्चित करण्यात आली आणि तेच सध्याचं नागपूर जंक्शन.

नागपूर जंक्शनची तांबूस रंगाच्या वालुकाश्मामधली इमारत अतिशय देखणी आहे. या इमारतीच्या उभारणीसाठीची 30 एकर जमीन खैरागडच्या राजाने सरकारला 1 रुपयाला विकली होती. त्यानंतर या स्थानकाच्या नव्या प्रशस्त इमारतीच्या उभारणीला 1906 मध्ये सुरुवात झाली. पुढं या इमारतीचं काम संथगतीनंच सुरू राहिलं.

नागपूर रेल्वे स्थानकाच्या नव्या इमारतीचं आरेखन वास्तुरचनाकार सी. बी. रेड याने केलं होतं. या इमारतीच्या आरेखनात पाश्चात्य आणि भारतीय वास्तुशैलींचा संगम झालेला आहे. या इमारतीसाठीचा तांबूस वालुकाश्म साओनेर, पटखाखेरी आणि बोरगाव इथून आणला गेला होता. या आयताकृती इमारतीच्या दर्शनी बाजूला तळमजल्यावर कमानदार प्रवेशव्दारं आणि पहिल्या मजल्यावरच्या व्हरांड्याला बाहेरून उंच आयताकृती चौकट आणि त्यामध्ये कमानदार खिडक्या करण्यात आलेल्या आहेत. इमारतीच्या मागील म्हणजे फलाटांच्या बाजूलाही अशाच खिडक्या केलेल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तांबूस दगडात घडवलेला मांडव उभारलेला आहे. याला आतील बाजूला कमानी केलेल्या असून बाह्य बाजूला स्तंभाचा आधार तयार केलेला आहे. या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला सभामंडप असून तिथं जुन्या पद्धतीची झुंबरं लावलेली आहेत. अशा या सुंदर इमारतीचं उद्घाटन 15 जानेवारी 1925 ला मध्य प्रांताचे गव्हर्नर सर फ्रँक स्लायच्या हस्ते झालं.

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बरेच विश्रांतीकक्ष आणि प्रशस्त व्हरांडा आहे. या विश्रांतीकश्रांचा वापर स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश अधिकारी करत असत. नागपूरमध्ये गाडी बदलून पुढील प्रवासासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांची दरम्यानच्या काळात इथं राहण्याची सोय करण्यात आली होती. त्यापैकी काही कक्ष आज रेल्वे प्रवाशांना एक दिवसाच्या मुक्कामासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. इतर कक्षांमध्ये रेल्वेची काही कार्यालये आहेत. या दुमजली इमारतीला एक गच्चीही आहे.

पूर्वी रेल्वेगाड्यांना 8-10 डबेच जोडले जात असत. त्यामुळं इथल्या फलाटांची लांबीही त्यावेळी त्या प्रमाणातच होती. पण आज या रेल्वे स्थानकात 24 डब्यांच्या गाड्याही येत आहेत. म्हणून काही वर्षांपूर्वी इथल्या फलाटांची लांबी बरीच वाढवण्यात आलेली आहे. या स्थानकात आता 8 फलाट झाले आहेत. 1925 मध्ये तेव्हाच्या 4 फलाटांना जोडणारे दगडी पादचारी उड्डाणपूल आजही वापरात आहेत. आता या स्थानकात अत्याधुनिक सिग्नलिंग, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड सारख्या अनेक नवनव्या सुविधा बसवण्यात आल्या आहेत आणि आणखी नवनवीन यंत्रणाही बसवण्यात येत आहेत. अलीकडंच या स्थानकात प्रवाशांच्या चालण्याचा वीज निर्मितीसाठी वापर करणारी यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. प्रवासी जेव्हा स्थानकात येतात, तेव्हा त्यांच्या पायाने फरशीखाली बसवलेली यंत्रणा कार्यान्वित होऊन तिच्यातून वीज निर्मिती केली जात आहे.

देशाच्या चार दिशांना जोडणारे लोहमार्ग नागपूरमध्ये या स्थानकात एकत्र येतात. त्यामुळं हे रेल्वे स्थानक सर्व दिशांचं मिलन केंद्र बनलं आहे. सुरुवातीला फक्त वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या रेल्वेगाड्या इथून जात असत. आता त्यांची जागा अत्याधुनिक विजेच्या इंजिनांनी घेतली आहे. पण वाफेच्या इंजिनाचं नागपूरच्या रेल्वे विकासातील स्थान लक्षात घेऊन एक जुनं वाफेचं इंजिन स्थानकाच्या समोर अलीकडेपर्यंत ठेवण्यात आलं होतं. मात्र सध्या या स्थानकाच्या आधुनिकीकरणाचं काम सुरू असल्यामुळं ते तिथून हलवण्यात आलेलं आहे.

टिप्पण्या

  1. या लेखानुळे नागपूर स्टेशनविषयी छान माहिती मिळाली. बऱ्याच वेळा नागपूर स्टेशनवर जाणे होत असते, पण या स्टेशनबाबतची फारशी माहितीच नव्हती.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा