अमेरिकेत 5 नोव्हेंबर 2024 ला राष्ट्रपतिपदासाठी मतदान
होत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार तसेच विद्यमान उपराष्ट्रपती कमला हॅरीस
आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार तसेच माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्यामध्ये प्रमुख
लढत होत आहे. अमेरिकेच्या इतिहासातील अतिशय अटीतटीची निवडणूक ठरत असून निवडणूकपूर्व
सर्वेक्षणांमध्ये दोन्ही प्रमुख उमेदवारांना 49 टक्के मतदारांची पसंती मिळत आहे.
अमेरिकेची
प्रशासकीय संरचना
अमेरिका 50 घटकराज्यांमध्ये विभागला गेला
आहे. यापैकी अलास्का आणि हवाई वगळता बाकी 48 घटकराज्ये मुख्यभूमीवर स्थित आहेत.
डेलावेअर हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये (United States of America) मध्ये
दाखल झालेले पहिले, हवाई हे पन्नासावे घटकराज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने
अलास्का हे सर्वात मोठे आणि ऱ्होड आयलंड हे सर्वात छोटे घटकराज्य आहे. तसेच
कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वात अधिक लोकसंख्येचे आणि व्योमिंग हे सर्वात कमी
लोकसंख्येचे घटकराज्य आहे.
अमेरिकेची राज्यव्यवस्था संघराज्यीय
पद्धतीची आहे. भारतातील घटकराज्यांच्या विभागणीपेक्षा ही पद्धत वेगळी आहे.
अमेरिकेत राष्ट्रीय स्तरावर संघराज्यीय राज्यघटना असून प्रत्येक घटकराज्याची
स्वतंत्र राज्यघटनाही आहे. अमेरिकन नागरिक हे संघराज्याचे आणि घटकराज्याचे असे
दुहेरी नागरिक असतात.
अमेरिकन प्रशासन व्यवस्था संघराज्यीय,
राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळ्यांवर विभाजित झालेली आहे. संघराज्यीय (राष्ट्रीय)
प्रशासनाच्या विधिमंडळ (काँग्रेस), कार्यकारी मंडळ (राष्ट्रपती आणि त्याचे
मंत्रिमंडळ) आणि न्यायमंडळ अशी त्रिस्तरीय रचना सत्तेचा समतोल राखण्यासाठी करण्यात
आलेली आहे.
अमेरिकन काँग्रेस ही अमेरिकेची केंद्रीय
कायदेसंस्था आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझन्टेटिव्हज् (कनिष्ठ
सभागृह) आणि सिनेट (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत. प्रत्येक घटकराज्याचे 2
सिनेटर असे 100 सिनेटर असतात. त्यांची मुदत 6 वर्षांची असते. दर 2 वर्षांनी यातील
एक तृतीयांश सदस्यांची मुदत संपते आणि त्या जागांसाठी मतदान होते. अमेरिकन
उपराष्ट्रपती Senate
चे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हाऊसमध्ये दर दोन वर्षांनी प्रत्येक
डिस्ट्रीक्टमधून एक या प्रमाणात 435 सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जातात. तसेच House of Representatives मधील 6 सदस्य केंद्रशासित प्रदेशांमधून
नेमणुकीद्वारे सभागृहात पाठवले जातात. मात्र नेमणुकीद्वारे आलेल्या सदस्यांना
मतदानाचा अधिकार नसतो.
प्रत्येक घटकराज्याच्या प्रमुखपदी
गव्हर्नरची निवड केली जाते. अमेरिकेतील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे संयुक्तपणे
अप्रत्यक्षरित्या जनतेकडून निवडले जातात. त्यांच्या निवडणुकीमध्ये निर्वाचन मंडळाची (Electoral
College) महत्वाची भूमिका असते. अमेरिकेच्या राष्ट्रपती आणि
उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो. अमेरिकमध्ये एका व्यक्तीला केवळ
दोनवेळाच राष्ट्रपतिपदी निवडले जाऊ शकते.
अमेरिकेतील
राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया
अमेरिकेत राष्ट्रपती होण्यासाठी संबंधित
व्यक्तीकडे खालील पात्रता असावी लागते.
·
राज्यघटनेनुसार,
1) उमेदरवार जन्माने अमेरिकन नागरिक असावा. (natural-born U. S. citizen)
2) उमेदवाराने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
3) उमेदवाराचे किमान 14 वर्षे अमेरिकेत वास्तव्य असावे.
अमेरिकेत बहुपक्षीय पद्धती आहे. तिथे साम्यवादी पक्षापासून अत्यंत
उजव्या विचाराच्या पक्षांपर्यंत सर्व प्रकारचे पक्ष आणि संघटना आहेत. मात्र Republican आणि Democrat या पक्षांचेच वर्चस्व तेथील राजकारणात असल्यामुळे तेथील राज्यपद्धती
द्विपक्षीय असल्याचे चित्र भासते.
अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाचा उमेदवार
त्यांच्या-त्यांच्या पक्षांच्या अंतर्गत निवडणुकीतून निवडले जातात. अमेरिकेतील
उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आपापल्या पक्षातून उमेदवार म्हणून
निवडून यावे लागते. पक्ष प्रतिनिधी आणि काही घटकराज्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक
यासाठी मतदान करतात. सर्व घटकराज्यांमधील मतदानानंतर ज्या उमेदवाराला संपूर्ण
देशातून जास्त मते (Delegates) मिळतात, त्या उमेदवाराला
संबंधित पक्षातर्फे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळते. या संपूर्ण
प्रक्रियेला प्रायमरीज (Primaries) आणि कॉकसेस (Caucuses)
असे म्हटले जाते. अंतिम दोन उमेदवारांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या
पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी मुख्य निवडणूक होऊन राष्ट्रपती
निवडला जातो.
अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाची निवडणूक
अप्रत्यक्ष पद्धतीची मानली जाते. याचे कारण सर्वसामान्य जनता थेट किंवा
प्रत्यक्षपणे राष्ट्रपतीला मत देत नाही, तर राष्ट्रपतीची निवड ही निर्वाचन
मंडळाच्या (Electoral
College) माध्यमातून केली जाते. अमेरिकन राष्ट्रपतीची निवड
करण्याशिवाय इतर कोणत्याही राजकीय कारभारात या निर्वाचन मंडळाला सहभाग घेता येत
नाही.
राष्ट्रपती
निवडणुकीतील निर्वाचन मंडळ
अमेरिकेतील प्रत्येक घटकराज्यातील सिनेटरची
संख्या (2), लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या प्रतिनिधी (Representatives) ची
संख्या (435) आणि District of Columbia या केंद्रशासित
प्रदेशातील 3 प्रमाणे एकूण 538 सदस्य निर्वाचन मंडळामध्ये असतात. नागरिक निर्वाचन
मंडळातील सदस्यांसाठी थेट मतदान करतात. त्यामध्ये विजयी झालेले सदस्य, ज्यांना
निर्वाचक म्हटले जाते, राष्ट्रपतिपदासाठी मतदान करतात.
राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्यासाठी
एखाद्या उमेदवाराला फक्त सर्वाधिक मतं मिळून भागत नाही, तर
ती मतं कोणत्या राज्यातून मिळालेली आहेत हे देखील इलेक्टोरल कॉलेज पद्धतीमुळे
महत्त्वाचं ठरतं.
अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणूक अप्रत्यक्ष असली, तरी गेल्या काही
वर्षांमध्ये या निवडणुकीला काही प्रमाणात प्रत्यक्ष निवडणुकीचे स्वरुप आले आहे.
याचे कारण म्हणजे निर्वाचक पदासाठीचे उमेदवार राष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवाराचा
चेहरा पुढे करूनच मते मागत असतात. त्यामुळे हे निर्वाचक पुढे कोणत्या
राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला मत देतील याचा विचार करूनच नागरिक आपले मत नोंदवत
असतात.
Winner
takes All नियम
राष्ट्रपतिपदाचा जो उमेदवार घटकराज्यातील नागरिकांची सर्वाधिक मते
मिळवण्यात यशस्वी होतो, त्याच्या पारड्यात त्या घटकराज्यातील सर्व निर्वाचकांची
मते टाकली जातात. यालाच Winner takes All नियम म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या घटकराज्यामध्ये राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराला सर्वाधिक
मतदान झाले असेल, त्या घटकराज्यातील सर्व निर्वाचक मते सर्वाधिक मते मिळालेल्या संबंधित
उमेदवाराला जातात. अमेरिकेतील मेन आणि नेब्रास्का ही दोन घटकराज्ये वगळता इतर
घटकराज्यांमध्ये Winner takes All नियम लागू होतो.
निवडून आलेले एकूण 538 निर्वाचक डिसेंबर
महिन्याच्या दुसऱ्या बुधवारनंतर येणारा पहिला सोमवार या दिवशी राष्ट्रपतिपदाच्या
उमेदवाराला मतदान करतात. 538 पैकी 270 निर्वाचक मते मिळवणारा उमेदवार
राष्ट्रपतिपदी निवडला जातो. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार हे निर्वाचक
राष्ट्रपतिपदाच्या कोणत्याही उमेदवाराला आपले मत देऊ शकतात. मात्र, संकेतानुसार
आपण ज्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी निवडले गेलो आहोत, त्यालाच ते मत देतात.
मतदारासाठी आवश्यक पात्रता
·
मतदार
अमेरिकन नागरिक असावा.
·
त्याने
वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
·
अनेक
राज्यांमध्ये मत देण्यापूर्वी मतदारांना स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठीची कागदपत्रे
दाखवावी लागतात.
· मतदाराने मतदारयादीत नाव नोंदवताना संबंधित घटकराज्याच्या नियमांची पूर्तता केलेली असावी.
(Photo-PIB)
प्रगत देश आणि निवडणूक प्रक्रिया इतकी किलिष्ठ ??
उत्तर द्याहटवाअमेरिकेची राष्ट्रपती निवडणूक पध्दती किचकट वाटण्याचं एक कारण मला वाटते ते म्हणजे त्या निवडणुकीची प्रक्रिया वर्ष-सव्वा वर्ष चालते.
उत्तर द्याहटवा