![]() |
भा. नौ. पो. अरिघात INS Arighaat |
अरिघात या स्वदेशी बनावटीच्या दुसऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रवाहू
अणुपाणबुडीचं (SSBN) 29 ऑगस्ट 2024 ला भारतीय नौदलात सामिलीकरण झालं. सामिलीकरणानंतर
त्यासंबंधीचं एक अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आलं असलं तरी त्यामध्ये फारसं
काही विस्तारानं सांगितलं गेलेलं नाही. त्या समारंभाविषयीची छायाचित्रेही देण्यात
आलेली नाहीत. या अणुपाणबुड्यांचा प्रकल्प देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं अतिशय
संवेदनशील असल्यामुळं त्याबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात आहे. म्हणूनच प्रसारमाध्यमांनाही
या सामिलीकरणाच्या समारंभापासून दूर ठेवण्यात आलं होतं. अरिघातच्या सामिलीकरणाचा
हा समारंभ नौदलाच्या परंपरेनुसारच पार पडला असणार.
एखादी पाणबुडी नौदलात सामील होते, त्यावेळी
एक अतिशय शिस्तबद्ध समारंभ आयोजित केला जात असतो. एखाद्या युद्धनौकेचं, पाणबुडीचं
किंवा विमानाचं सामिलीकरण हा नौदलाच्या दृष्टीनं मानाचा समारंभ असतो. पाणबुडी
सामील होत असलेल्या नाविकतळावर समारंभाच्या ठिकाणी एक मोठा मंच उभारला जातो. जी
पाणबुडी सामील होणार असते, ती या मंचाच्या जवळच असलेल्या धक्क्यावर उभी करण्यात
आलेली असते. समारंभाच्या सुरुवातीला महत्वाच्या व्यक्तींचं आगमन होतं. सर्वात
शेवटी समारंभाचे मुख्य अतिथी – ज्यांच्या हस्ते ती पाणबुडी नौदलात अधिकृतपणे सामील
होत असते – त्यांचं आगमन होतं. अरिघातचं सामिलीकरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
यांच्या हस्ते झालं होतं. आगमनानंतर लगेचच मुख्य अतिथींना आगमनानंतर नौसैनिकांकडून
मानवंदना (Guard of Honour) दिला जातो.
मंचावर उपस्थित असलेले नौदल प्रमुख, ती
पाणबुडी ज्या गोदीमध्ये बांधण्यात आली आहे तिचे प्रमुख अशा महत्वाच्या व्यक्तींची
भाषणं झाल्यावर संबंधित पाणबुडीचा कमांडिंग ऑफिसर असलेल्या कॅप्टनकडून नौदल
प्रमुखांच्या स्वाक्षरीचे सामिलीकरणविषयक वॉरंट (Commissioning Warrant) उपस्थितांसमोर वाचून दाखवलं जातं. त्यानंतर
तो अधिकारी त्या पाणबुडीवर गेल्यावर तिथं राष्ट्रगीताच्या साथीनं पाणबुडीच्या
पुढच्या बाजूच्या राष्ट्रध्वज स्तंभावर (National Flag Staff) राष्ट्रध्वज आणि पाणबुडीच्या मागील बाजूच्या
स्तंभावर (Ensign Staff)
नौदलाचा ध्वज (Naval Ensign)
फडकवला जातो. त्याचवेळी पाणबुडीच्या दोन्ही टोकांकडून तिच्या Conning Tower
वरील मुख्य ध्वजस्तंभापर्यंत दोरीच्या
मदतीनं सागरी वाहतुकीमधील विविध संकेत पताका (Maritime Flags) फडकवल्या जातात. राष्ट्रगीत संपत असताना
राष्ट्रध्वज, नौदलाचा ध्वज आणि त्या सागरी पताका पूर्णपणे फडकवल्या जात असतानाच
पाणबुडीच्या सर्वात उंच जागी असलेला त्रिकोणी ध्वज (Pennant) फडकवला जातो. हा त्रिकोणी ध्वज आता पाणबुडीवर
ती सेवेत असेपर्यंत कायम फडकत राहणार असतो. पाणबुडीवर या त्रिकोणी ध्वजाच्या
अनावरणाच्या सोहळ्याला Breaking of Pennant असं म्हटलं जातं.
![]() |
पाणबुडीच्या नामफलकाचं अनावरण (फोटो-पीआयबी) |
आता ती पाणबुडी नौदलात अधिकृतपणे सामील
झालेली असते. त्यामुळं आता तिच्या नावाच्या आधी भारतीय नौसैनिक पोत अर्थात Indian
Naval Ship हे बिरुद अधिकृतपणे
जोडलं गेलेलं असतं. त्यानंतर मुख्य अतिथींचं भाषण झालं की, नौदल प्रमुख आणि अन्य
मान्यवरांबरोबर ते पाणबुडीवर जातात आणि तिथं त्यांच्या हस्ते पाणबुडीच्या मागच्या
बाजूच्या द्वारापाशी (Hatch) लावलेल्या
तिच्या नामफलकाचं अनावरण होतं. या अनावरणानंतर मुख्य अतिथी पाणबुडीत प्रवेश करून तिची
पाहणी करतात. या पाहणीनंतर ग्रुप फोटो सेशन होऊन हा समारंभ संपन्न होतो.
![]() |
(Photo-PIB) |
खूप छान माहिती
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट लेख
उत्तर द्याहटवा