‘फ्रीजेस’बरोबर अनुभवूया ऑलिंपिक

आयफेल टॉवर आणि सेन नदी (फोटो-केदार होनप)

Bienvenue á Paris म्हणजेच पॅरिसमध्ये आपलं स्वागत आहे, असं पॅरिस ऑलिंपिकचा शुभंकर फ्रीजेस म्हणत आहे. पॅरिसमध्ये 33व्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा पार पडत आहेत. या ऑलिंपिकचं औपचारिक उदघाटन 26 जुलैला होणार असलं तरी फुटबॉल, रग्बी सेव्हन्स, तिरंदाजी आणि हँडबॉलचे सामने दोन दिवस आधीच सुरू होणार आहेत. त्यासाठी तिथं येणाऱ्या प्रत्येक क्रीडापटू, क्रीडाप्रेमी आणि पर्यटकाचं स्वागत फ्रीजेस करत आहे. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामध्ये भारताचे 117 क्रीडापटू सहभागी होणार आहेत. 2020 च्या टोकियोमधल्या ऑलिंपिकमध्ये क्रीडापटूंनी 7 पदकं जिंकली होती, जी भारतानं एकाच ऑलिंपिकमध्ये जिंकलेली सर्वाधिक पदकं ठरली होती. तशाच कामगिरीची भारतीय क्रीडापटूंकडून यंदाही पुनरावृत्ती व्हावी, अशी आशा भारतीयांना आहे.

पॅरिस शहर 1900, 1924 नंतर आता तिसऱ्यांदा ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करत आहे. शंभर वर्षांनी आयोजनाचा मान मिळाल्यामुळे पॅरिसमधील या स्पर्धा भव्य व्हाव्यात आणि त्यांच्या यशस्वी आयोजनातून आपला इतिहास, संस्कृती, प्रगती इत्यादींची जगाला नव्याने ओळख व्हावी यासाठी फ्रांस प्रयत्नशील आहे. म्हणूनच यंदाच्या स्पर्धांचं उद्घाटन अनोख्या पद्धतीने होणार आहे. परंपरेनुसार ऑलिंपिकच्या उद्घाटनाचा समारंभ ऑलिंपिक स्टेडियममध्ये पार पडत असतो. पण यावेळचा उद्घाटन समारंभाचं ठिकाण पॅरिसमधून वाहणारी सेन नदी असणार आहे. छोट्या नावांमध्ये बसून ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेले वेगवेगळ्या देशांचे क्रीडापटू उपस्थितांना अभिवादन करत जाणार आहेत. साधारण सहा किलोमीटर लांबीच्या या जलमार्गात पॅरिसमधली महत्वाची ऐतिहासिक ठिकाणं लागतील.

    ऑलिंपिक स्पर्धांचे शुभंकर (Mascot) म्हणून आजपर्यंत संबंधित देशातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांची निवड केली जात असे. यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकच्या शुभंकरासाठी मात्र प्राण्याऐवजी एका वेगळ्या वस्तूची निवड करण्यात आलेली आहे. ती वस्तू आहे फ्रीजियन (Phrygian) टोपी. ही टोपी फ्रेंच प्रजासत्ताकाच्या अनेक महत्वाच्या प्रतिकांपैकी एक आहे. फ्रीजियन टोपी फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून फ्रेंच जनतेकडून वापरली जात होती. त्यामुळे या टोपीला फ्रेंच इतिहासात महत्वाचे स्थान लाभले आहे. आजही ती टोपी फ्रांसमध्ये राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाची मानली जाते. त्या टोपीवरून साकारलेल्या या शुभंकरांचं नाव फ्रीजेस (Phryges) असं ठेवण्यात आलं आहे. या फ्रीजेसचं ध्येय आहे, खेळाला प्रोत्साहन आणि मूर्त स्वरुप देणं. या शुभंकराची रंगसंगती फ्रेंच राष्ट्रध्वजातील रंगांशी जुळणारी केलेली आहे.

    पॅरिस 2024 चे बोधचिन्ह वैशिष्ट्यपूर्ण आहे. तीन वेगवेगळ्या प्रतीकांचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. ऑलिंपिकचे सुवर्ण पदक, ऑलिंपिकची ज्योत आणिमारियानची (Marianne) प्रतिमा यांचा मेळ घालून हे बोधचिन्ह साकारलेलं आहे. मारियान ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे प्रतीक असून ती फ्रेंच प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धांमध्ये जगभरातील महिला क्रीडापटूंनी मुक्तपणे सहभागी व्हावे हासुद्धा संदेश या बोधचिन्हाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या बोधचिन्हाला पॅरिसमध्ये 1900 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला क्रीडापटूंचाही संदर्भ देण्यात आलेला आहे.

    पॅरिस 2024 ची पदकंही वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत. या पदकांच्या आरेखनात फ्रांस आणि पॅरिसची ओळख असलेल्या आयफेल टॉवरचा समावेश करण्यात आलेला आहे. 500 ग्रॅमपेक्षा थोड्या जास्त वजनाची ही पदकं असून षटकोन, तेज आणि रत्न या पदकांच्या आरेखनामागील प्रमुख प्रेरणा आहेत. त्यातील षटकोन फ्रांसच्या भौगोलिक आकाराचे प्रतिनिधित्व करतो. त्या षटकोनाच्या मध्यभागी पॅरिस ऑलिंपिकचे बोधचिन्ह कोरण्यात आलेलं आहे. षटकोनाच्या भोवतीने कोरलेल्या किरणांसमान रेषा स्पर्धेतील क्रीडापटूंच्या चमकादार कामगिरीचं प्रतिनिधित्व करत आहे. हा षटकोन पदकाच्या मध्यभागी बसवण्यासाठी सहा छोटे खिळे बसवलेले आहेत. ते खिळे आयफेल टॉवरच्या पोलादापासून बनवण्यात आलेले आहेत. पदकाच्या दुसऱ्या बाजूला विजयाची ग्रीक देवता, थेन्समधील ऑलिंपिया स्टेडियम, आयफेल टॉवर, ऑलिंपिकचे बोधचिन्ह आणि 33वे ऑलिंपिक पॅरिस 2024 कोरण्यात आलेले आहेत. पदकाच्या रिबिनीवर आयफेल टॉवरप्रमाणे नक्षीप्रमाणे केलेली आहे. 

पॅरिस 2024 ऑलिंपिक स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे ‘Games wide open’. संपूर्ण जगाने ऑलिंपिकच्या काळात पॅरिसला यावे आणि नव्या भावनांचा एकत्रितपणे अनुभव घ्यावा अशा अर्थाचं हे ब्रीदवाक्य आहे. परस्परांमधील भेदाभेद नष्ट करून खुल्या मनाने एकत्र येण्याचे आवाहन या ब्रीदवाक्यातून करण्यात आले आहे.

ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन हा प्रत्येक आयोजक देशाच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचा विषय असतो. त्यामुळे या स्पर्धांमधील प्रत्येक बाब अनोखी, आपल्या देशाची मान उंचावणारी आणि उत्कृष्ट कशी असेल याकडे अतिशय बारकाईनं लक्ष पुरवलं जातं. मग ती शुभंकराची किंवा बोधचिन्हाची निवड असो वा स्टेडियमची बांधणी किंवा ऑलिंपिक क्रीडानगरीतील सोयीसुविधा. अशाच प्रयत्नांतून पॅरिस ऑलिंपिकसाठीची मशालही वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यात आली आहे. तिचं आरेखन मॅथ्यू लेहान्यू यांनी केलेलं आहे. पॅरिस 2024 ऑलिंपिक स्पर्धांच्या समानता, जल आणि शांतता या संकल्पनांचा आधार घेऊन ही मशाल तयार करण्यात आली आहे. मशालीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि त्यावरील आरेखन पॅरिसमधून वाहणाऱ्या सेन नदीच्या प्रवाही पाण्याचं प्रतिनिधित्व करत आहे. ही मशाल पुनर्निर्मित पोलादापासून बनवण्यात आलेली असून ती सुमारे दोन फूट उंच आणि दीड किलो वजनाची आहे. अर्सेलोमित्तल कंपनीने या मशालीची निर्मिती केलेली आहे.

पॅरिस ऑलिंपिकची ज्योत थेन्समध्ये एप्रिलमध्ये समारंभपूर्वक पारंपारिक पद्धतीने प्रज्वलित करण्यात आली होती. तिची संपूर्ण ग्रीसमधून दौड पूर्ण झाल्यावर ती भूमध्य सागर मार्गे 9 मेला फ्रांसच्या मार्से बंदरात पोहचली. त्या ज्योतीद्वारे प्रज्वलित करण्यात आलेल्या मशालीची सध्या फ्रांसच्या विविध प्रांतांमधून तसंच फ्रांसच्या जगभरात विखुरलेल्या पाच प्रदेशांमधूनही दौड सुरू आहे. ऑलिंपिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले अकरा हजार क्रीडापटू फ्रांसमधील या दौडीमध्ये मशालवाहक असणार आहेत, ज्यात भारताला ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडाप्रकारातील पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्राचाही समावेश आहे. ऑलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे 26 जुलैला या मशालीने ऑलिंपिकची मुख्य ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. यंदा ही ज्योत नेहमीप्रमाणं ऑलिंपिक स्टेडियममध्ये नसून अन्यत्र असणार आहे. ती कुठं असणार आहे याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे.

यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेत बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा होत आहेत. या ऑलिंपिकमध्ये लिंगसमानतेला बरंच महत्व देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकसाठी पहिल्यांदाच एकच शुभंकर आणि बोधचिन्ह असणार आहे. ऑलिंपिकच्या उद्घाटनात यावेळी क्रीडापटूंची मोठी पथकं येणार नाहीत. त्याचवेळी देशादेशांमधील राजकारणाचा आणि त्यातील विरोधाभासाचा सर्वाधिक प्रभाव ऑलिंपिकवर दिसत आहे. पॅरिस ऑलिंपिकचं उद्घाटन अनोख्या पद्धतीनं होणार आहेच, शिवाय 32 क्रीडाप्रकारांचे सुमारे 700 सामने आणि 329 पदकांसाठीचे सामने होणार आहेत, जे आजपर्यंतचे सर्वाधिक ठरणार आहेत. यावेळी स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाईंबिंग, ब्रेकींग आणि सर्फिंग यांना ऑलिंपिकमध्ये अतिरिक्त क्रीडाप्रकार म्हणून स्थान दिलेलं आहे. या स्पर्धेत रशियाचं आजवरचं सर्वात छोटं म्हणजे 16 जणांचं पथक सहभागी होत आहे. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा