पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex)
यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले
कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची
कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी
पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत. 14 वेळा ही
स्पर्धा जिंकणारा स्पॅनिश टेनिसपटू राफाएल नादाल 2024 च्या स्पर्धेत पहिल्या
फेरीतच बाहेर पडला आहे.
टेनिस हा फ्रान्समधील एक लोकप्रिय
क्रीडाप्रकार आहे. फ्रेंचांच्या मते, टेनिसची जननीच फ्रान्स आहे. सुरुवातीला हा
खेळ मातीच्या कोर्टवरच खेळला जात असे. फ्रेंच राजघराण्यात हा क्रीडाप्रकार
लोकप्रिय असल्यामुळं त्या खेळाला राजेशाही स्वरुप मिळालं. यामुळेच फ्रेंच खुल्या स्पर्धाही (French Open Championship) क्ले कोर्टवर खेळवल्या जात असल्याचे सांगितले जाते.
फ्रेंच राजधानी पॅरीसमध्ये 1891 पासून राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे
आयोजन केले जाऊ लागले होते. 1925 पासून या स्पर्धा रेसिंग क्लब दी फ्रान्स (Racing
Club de France) आणि स्टाडे
फ्रान्काईस (Stade François) या दोन ठिकाणी भरवल्या जाऊ लागल्या. त्याच
वर्षापासून या स्पर्धांमध्ये अन्य देशांमधील हौशी खेळाडूंनाही प्रवेश दिला जाऊ लागला.
परिणामी या स्पर्धेच्या नावात French International असा बदल केला गेला. इथे लक्षात घेण्यासारखी विशेष
बाब म्हणजे त्यावेळी या स्पर्धा हिरवळीवर होत असत.
फ्रांसने 1927मध्ये अमेरिकेविरुद्धची डेव्हीस चषक स्पर्धा जिंकली
होती. त्यानंतर पुढील वर्षीही याच दोन संघांदरम्यान आणखी एक स्पर्धा खेळवण्याचा
निर्णय घेण्यात आला होता. अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धांसाठी उपलब्ध असलेलं क्रीडांगण
अपुरं पडू लागल्यामुळं एक नवं जास्त क्षमतेचं क्रीडांगण उभारण्याचा विचार सुरू
झाला. त्यासाठी स्टाडे फ्रान्काईसने Porte d ’Auteuil येथील तीन एकर जमीन फ्रेंच टेनिस महासंघाला
दिली. या ठिकाणीच आज फ्रेंच खुली स्पर्धा पार पडत असून ते संपूर्ण संकुल रोलँ
गॅरोस म्हणून ओळखले जात आहे. हे क्रीडासंकुल फ्रेंच राजधानीच्या वायव्येला स्थित
आहे. तांबड्या मातीच्या या नव्या स्टेडियममधील कोर्टवर 1928मध्ये फ्रेंच
इंटरनॅशनलच्या पहिल्यांदा स्पर्धा पार पडल्या होत्या. तेव्हापासून क्ले कोर्ट ही
फ्रेंच खुल्या स्पर्धेची खास ओळख बनलेली आहे. तांबड्या मातीतील कोर्ट आणि त्याच्या
भोवतीने गडद हिरव्या रंगातील आसनव्यवस्था अशा आकर्षक रंगसंगतीमुळे ही कोर्ट्स खरोखरच
विलासी दिसतात.
रोलँ गॅरोस या फ्रेंच वैमानिकाने 23 सप्टेंबर 1913 ला भूमध्य
सागरावरून पहिल्यांदा विनाथांबा उड्डाण करून विश्वविक्रम केला होता. पहिल्या
महायुद्धात त्याने आपल्या विमानावर मशीनगन बसवून मोठे शौर्य गाजवले; पण त्याचबरोबर जगातील पहिला लढाऊ
वैमानिक होण्याचा मानही त्यानं मिळवला. पुढे महायुद्धात त्याला जर्मनांनी पकडले
होते. त्यांच्या कैदेतून त्यानं यशस्वीपणे पलायन केलं होतं. त्याच्या त्या
कामगिरीला सलाम करण्यासाठी पॅरीसमधील या नव्या टेनिस संकुलाचे नामकरण रोलँ गॅरोस
असे करण्यात आले.
नव्या टेनिस संकुलात एक मुख्य, मध्यवर्ती कोर्ट (सेंटर कोर्ट) उभारले
गेले. पुढे या संकुलात 1968 मध्ये पार पडलेली स्पर्धा पहिली ग्रँड स्लॅम खुली
स्पर्धा ठरली, जिच्यामध्ये व्यावसायिक तसेच हौशी खेळाडूही सहभागी होऊ लागले.
काळानुरुप रोलँ गॅरोसमध्ये नवनवीन बाबींचा समावेश केला जात राहिला
आहे. 2000 मध्ये नुतनीकरणानंतर रोलँ गॅरोसच्या मध्यवर्ती कोर्टाचे फिलीप चॅट्रिएर
असे नामकरण करण्यात आले. फ्रेंच टेनिस फेडरेशनचे माजी अध्यक्ष फिलीप चॅट्रिएर
यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 1988पासून टेनिसचा उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुन्हा
समावेश झाला होता. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचे नाव या
कोर्टाला देण्यात आले. 2003पासून या संकुलात टेनिस संग्रहालय आणि टेनिस ग्रंथालयही
सुरू झाले आहे. फ्रेंच टेनिस स्पर्धेचा संपूर्ण इतिहास तिथं मांडण्यात आला आहे.
आज या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या बरीच वाढली आहे.
त्यामुळे 2009मध्ये फ्रेंच टेनिस फेडरेशनने रोलँ गॅरोसच्या विस्तारीकरणाची योजना
आखली होती. त्याची जबाबदारी मार्क मिम्रान या वास्तुरचनाकाराकडे सोपवण्यात आली
होती. मात्र युरोपात त्यावेळी आलेल्या आर्थिक संकटाचा परिणाम या विस्तारीकरणाच्या
कामावरही झाला. विस्तारीकरणाच्या त्या प्रकल्पावरून बरेच वाद झाले होते. त्यातून
मार्ग निघत नसल्याचं पाहून अखेर हे संपूर्ण संकुलच पॅरीसच्या बाहेर हलवण्याचा
निर्णय फ्रेंच टेनिस फेडरेशनने जाहीर केला होता. पण रोलँ गॅरोसचे ऐतिहासिक महत्व
लक्षात घेऊन फ्रेंच खुल्या स्पर्धा आहे, त्याच जागी घेऊन या संकुलाचे विस्तारीकरण करण्यावर
एकमत झाले.
रोलँ गॅरोस संकुल 13.5 एकर परिसरात वसलेले आहे. त्याचे केंद्र असलेले फिलीप
चॅट्रिएर कोर्ट 2018 मध्ये पूर्ण पाडण्यात आले आणि 2019 पर्यंत त्याची पुन:उभारणी पूर्ण झाली. त्यावेळी या
स्टेडियममधील आसनव्यवस्था अधिक तीव्र उताराची करण्यात आली. पुढे 2020 मध्ये यो
स्टेडियमवर सरकते छत आणि फ्लड लाईट बसवले गेले. याआधीही या कोर्टचे नुतनीकरण
करण्यात आले होतेच. मुख्य स्टेडियमच्या बाजूला 1994 मध्ये कोर्ट-ए उभारले गेले. त्याचे
पुढे सुझाने लेंगीन असे नामकरण करण्यात आले. सुरुवातीला रोलँ गॅरोसचे नुतनीकरण
2018 पर्यंत पूर्ण करण्याची योजना होती, मात्र विविध कारणांनी त्यामध्ये विलंब होत
गेला. आज या संकुलात एकूण 20 कोर्ट्स आहेत.
फ्रेंच ओपन म्हटले की आठवतो तो राफाएल नादाल, क्ले कोर्टाचा सम्राट! तब्बल 14 वेळा ही स्पर्धा जिंकणारा
नादाल. त्याने केलेला हा विक्रम अद्वितीयच. म्हणूनच रोलँ गॅरोस संकुलात राफाचा स्टेनलेस
स्टीलचा पुतळा आता उभारला गेला आहे. यंदाच्या स्पर्धेतून नादाल झाला असला तरी
त्यानं उपस्थितांना भावूक होऊन आवाहन केलं आहे की, फ्रेंच स्पर्धेतून मी बाहेर
पडलो असलो तरी दोन महिन्यांनी होणाऱ्या पॅरीस उन्हाळी ऑलिंपिकमध्ये (Paris 2024) मी याच कोर्टवर
खेळायला येणार आहे. त्यावेळी आपण सर्वांनी नक्की यावं.
फार सुंदर माहिती.
उत्तर द्याहटवानदाल फ्रेंच ओपनमधून लगेच बाहेर पडल्याबद्दल वाईट वाटते, पण त्याचा ऑलिंपिकमधील सहभाग पाहायला नक्की आवडेल.
उत्तर द्याहटवा