![]() |
माझगाव गोदीत बांधल्या जात असलेल्या युद्धनौकेचं जलावतरण |
मुंबईतील माझगावमधील गोदीला मे 2024 मध्ये
250 वर्षे पूर्ण झाली आहेत. या गोदीत भारतीय नौदलासाठी आजवर अनेक युद्धनौका आणि
पाणबुड्या बांधल्या गेल्या आहेत. नौदलाच्या आधुनिकीकरणात आणि शस्त्रास्त्र
निर्मितीच्या स्वदेशीकरणात या गोदीनं मोलाचं योगदान दिलेलं आहे.
मुंबईत फोर्टच्या भागात असलेल्या बाँबे
डॉकयार्डवरचा कामाचा ताण हलका करण्यासाठी जवळपासच्याच ठिकाणी आणखी एक गोदी
उभारण्याचा निर्णय 1769 मध्ये घेण्यात आला होता. 200 टन वजनापर्यंतची जहाजं बांधण्यासाठी
त्या गोदीची उभारणी केली जाणार होती. त्यानंतर मे 1774 मध्ये माझगावची गोदी सुरू
झाली. त्यावेळी इथं एक छोटीशी सुकी गोदी बांधण्यात आली होती. या गोदीत
जहाजबांधणीचं काम सुरू झालं असलं तरी भारतातील रॉयल नेव्हीच्या विविध शाखांसाठी
बांधली जाणारी महत्वाची जहाजं बाँबे डॉक्समध्येच बांधली जात राहिली. पुढं 1934
मध्ये माझगाव डॉकयार्ड एक खासगी लिमिटेड कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर 1960 मध्ये
भारत सरकारनं तिचं अधिग्रहण केलं. या गोदीत बांधण्यात आलेली पहिली लढाऊनौका (Frigate) भा. नौ. पो. निलगिरी (INS
Nilgiri) 1972 मध्ये भारतीय
नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. 1984 मध्ये माझगाव गोदीत पाणबुडी बांधणीसाठीही गोदी
सुरू करण्यात आली आणि त्यानंतर स्वदेशातच बांधलेल्या पहिल्या पाणबुडीचं – भा. नौ.
पो. शल्कीचं नौदलात सामिलीकरण केलं गेलं.
![]() |
माझगाव गोदीत बांधली जात असलेली पाणबुडी |
1735 मध्ये Bombay Dock ची स्थापना झाल्यावर लोवजी नुसेरवानजी वाडिया यांना मुंबईमध्ये गोद्या
आणि जहाजबांधणीचं कंत्राट 1736 मध्ये मिळालं. पुढं वाडिया यांच्या अनेक पिढ्यांचा
जहाजबांधणी हाच व्यवसाय राहिला होता. लोवजी वाडिया त्यांनीच 1750 मध्ये मुंबईत
आशियातील आधुनिक काळातील सर्वांत जुनी आणि पहिली सुकी गोदी बांधली होती. पुढं 1750
ते 1765 पर्यंत त्यांनी त्यात अप्पर, मिडल आणि लोअर अशा तीन समांतर गोद्यांची
बांधणी केली होती. 1810 मध्ये बाँबे डॉकयार्डमध्ये बांधली गेलेली HMS Mindon ही युद्धनौका
सागापासून बांधली गेली होती. भारतीय गोदीत बांधून Royal Navy त सामील झालेली ती पहिली युद्धनौका ठरली होती. बाँबे
डॉकयार्डमध्ये बांधण्यात आलेली HMS Trincomalee ही युद्धनौका वाडिया यांच्या जहाजबांधणीतील कौशल्याचं
प्रतीक ठरली होती. 1817 मध्ये बांधली गेलेली ही युद्धनौका सध्या ब्रिटनमध्ये असून
आज ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जुनं कार्यरत असलेलं जहाज ठरलं आहे.
मुंबईच्या गोदीमध्ये (Bombay Dockyard) अनेक ऐतिहासिक इमारती उभ्या आहेत. त्यातील जुने
जकात कार्यालय, क्लॉक टॉवर आणि गोदीचे लायन गेट या अगदी सुरुवातीच्या काळात उभारले
गेले होते. फोर्ट भागातील शहीद भगतसिंग मार्गावरील ग्रेट वेस्टर्न हॉटेलमध्ये
पूर्वी रॉयल नेव्हीचे मुंबईतील मुख्यालय Admiralty House स्थित होते.
![]() |
भारतीय नौदलसाठी विकसित केली जात असलेली मिडगेट पाणबुडी |
बाँबे डॉकयार्ड कालांतरानं नौदलाचा पूर्ण तळ म्हणून रुपांतरित होत
गेला आणि तेथील जहाजबांधणीचं काम हळुहळू माझगाव डॉकयार्डकडे गेलं. माझगाव गोदीत आज
भारतीय नौदलासाठी विशाखापट्टणम वर्गातील आधुनिक युद्धनौका आणि फ्रेंच बनावटीच्या
अत्याधुनिक स्कॉर्पिन पाणबुड्या बांधल्या जात आहेत. 2023 मध्ये माझगाव गोदीत
विमानवाहू जहाजाच्या दुरुस्ती-देखभालीसाठी मोठी सुकी गोदी सुरू करण्यात आली आहे. अगदी
अलीकडे भारतीय नौदलासाठी माझगाव गोदीनं मिडगेट पाणबुडी (Midget Submarine) बांधलेली आहे. तिचं अनावरण माझगाव
गोदीच्या 250 वर्षपूर्तीच्यावेळी करण्यात आलं आहे. भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि
पाणबुड्या बांधण्याबरोबरच माझगाव गोदी व्यापारी कंपन्यांसाठीची जहाजं आणि इतर
साधनांचीही निर्मिती करत आहे.
(सर्व फोटो-पीआयबी)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा