मॉरिशसचं हिंदी महासागरामधलं स्थान
सामरिकदृष्ट्या महत्वाचं आहेच; पण
त्याचवेळी आगालेगा बेटाचं स्थान तर त्याहूनही अधिक सामरिकदृष्ट्या महत्वाचं ठरत
आहे. अशा बेटावर एक धावपट्टी आणि एक धक्का उभारण्यासंबंधीचा करार मार्च 2015 मध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस भेटीमध्ये करण्यात आला होता. त्यानुसार आता
आगालेगा बेटावर हवाई आणि सागरी वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या
आहेत. तसंच त्या कराराद्वारे या बेटावर आणखी 6 सामुहिक विकास प्रकल्प (Community Development Projects) उभारण्यात
येणार आहेत. पण या धक्क्याचं आणि धावपट्टीचं आता उद्घाटन झाल्यामुळं देशाच्या एका
टोकाला असलेल्या आगालेगा बेटाचा मुख्य बेटाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
नवी दिल्ली आणि पोर्ट लुईस यांच्यात अनेक
वर्षांपासून घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. दोन्ही देशांमधल्या संबंधांना
त्यांच्यातील ऐतिहासिक दुव्यांमळं बळकटी आलेली आहे. मॉरिशसची 70% लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. त्यामुळं
दोन्ही बाजूंच्या सामान्य लोकांमध्येही घनिष्ठ संबंध प्रस्थापित झालेले आहेत.
दोन्ही देशांमधल्या संबंधांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांचा भक्कम आधार
मिळालेला असून त्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचंही महत्त्व अनन्यसाधारण आहे.
भारतानं मॉरिशसच्या विकासात कायमच सढळपणे मदत केली आहे. भारताला पोर्ट लुईसच्या Partner
of Preference चा दर्जा
मिळालेला आहे. त्यामुळं अनेक वर्षांपासून भारत नागरी विकासकामं, पायाभूत सुविधांचा
विकास, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये
मोठ्या प्रमाणात मॉरिशसला मदत करत आहे. मॉरिशसची इंधनाची संपूर्ण गरज भारत भागवत
आहे. मॉरिशस स्वत:ला
दक्षिण हिंदी महासागरामधलं पेट्रोलियम हब म्हणून विकसित करू इच्छीत आहे.
त्यासाठीही भारत त्याला सहकार्य करत आहे.
भारतानं अलीकडच्या काळात मॉरिशसला 1,000
दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं सहाय्य दिलेलं आहे. मेट्रो रेल्वेची उभारणी, सामाजिक
निवासस्थानं, कान-नाक-घशाचं रुग्णालय, नागरी सेवा महाविद्यालय, क्रीडा संकुलं अशा
पायाभूत सुविधांच्या उभारणीतही भारत मॉरिशसला मदत करत आले आहे.
![]() |
पोर्ट लुईसला पोहचलेली भारतीय नौदलाची 'शार्दुल' |
(फोटो-पीआयबी)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा