आजपर्यंत माझा पुणे-मुंबई-पुणे
प्रवास सकाळी पुण्याहून निघून रात्री परत येणं असाच होत राहिला होता. त्यामुळं
दख्खनची राणी, प्रगती आणि सिंहगड या गाड्यांमधूनच प्रवास होत होता. कधी तरी
इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कनचाही प्रवास करावा अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती.
पण या गाड्या पुण्याहून संध्याकाळी असल्यामुळं त्यांचा पर्याय निवडता येत नव्हता. शेवटी
तो योग आलाच. मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण
केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो.
इंद्रायणीचा रेक पुणे-सोलापूर इंटरसिटीला
वापरला जातो. सोलापूरहून इंटरसिटी अजून आलेली नव्हती, म्हणून तोपर्यंत पुणे
जंक्शनवरचं वातावरण अनुभवत राहिलो. शेजारच्या 5 नंबरवर पुण्याच्या WDP-4D इंजिनासह सोलापूरला जाणारी 12157 हुतात्मा
उभी होती. तो अश्व मस्तच दिसत होता. तिच्या पलीकडे 12135 पुणे-नागपूर एक्सप्रेस होती.
तिचं सारथ्य मालगाड्यांसाठीच्या WAG-9 या कार्यअश्वाकडं होतं. दरम्यानच्या काळात इंद्रायणी आल्यावर आपल्याला
आरक्षण असूनही आपल्याला आपली गाडीत जागा सहज मिळेल का असा विचार घोळत राहिला होता.
आपल्या जागेवर बसताना तिथं आधीपासूनच ठाण मांडून बसलेल्यांना विनंती करत राहावं
लागेल का, असंही वाटत होतं. कारण सोलापूर इंटरसिटी सुरू झाली होती, तेव्हा त्या
गाडीनं (12169) सोलापूरला जातानाचा अनुभव आठवत होता. त्यानंतर काही वर्षे या गाडीत
आपली आरक्षित जागा मिळवण्यासाठी रोजच आरक्षित तिकीटधारकांना कशी भांडाभांडी करावी
लागते, त्या संबंधीच्या बातम्याही मागे वाचल्या होत्या.
पुण्यात आल्यावर 12170 इंटरसिटीची 22106 इंद्रायणी
झाली आणि त्याचवेळी लोको पायलट, त्याचा असिस्टंट आणि गार्ड बदलले गेल्यावर ठीक
18.35 ला इंद्रायणी पुण्याहून निघाली. त्याचवेळी शेजारच्या 3 नंबरवरून आझाद हिंदही
हावड्याकडे निघाली आणि एकाचवेळी इंद्रायणी आणि ती विरुद्ध दिशेने जाऊ लागल्या. पहिल्यांदाच
संध्याकाळी पुण्याहून मुंबईला जात असल्यामुळं बाहेरचं वातावरण वेगळंच वाटत होतं.
नेहमीपेक्षा उलट्या वेळा होत्या म्हणूनच असं वाटत होतं. गाडी सुटल्याबरोबर
रेल्वेच्या चहावाल्याच्या फेऱ्या सुरू झाल्या. संगम पुल ओलांडून शिवाजीनगर आल्यावर
इंद्रायणी हळुहळू पुढं जात होती. शिवाजीनगरला लावलेला वेगमर्यादा समाप्तीचा फलक
आल्यावर मग तिनं एकदम वेग घेतला. तोपर्यंत रेल्वेचा नाश्तावाला फेऱ्या मारायला
लागला – साबुदाणा वडा, कटलेट, ऑमलेट हे नाश्त्यात पर्याय उपलब्ध होते.
खडकीच्या आधी इंद्रायणीचा वेग पुन्हा कमी
झाला, म्हटलं खडकीत मालगाडी मेन लाईनवर असणार. ते खरंच झालं. खडकीत कर्जतच्या
दिशेनं जाणाऱ्या BCN वाघिण्यांच्या
मालगाडीला इंद्रायणीसाठी रोखून धरलेलं होतं. दरम्यानच्या काळात लोणावळा चिक्की, कानातलं-गळ्यातलं
वगैरेवगैरे विकणाऱ्या फेरीवाल्यांचाही कलकलाट सुरू झाला होता. खडकीनंतर मात्र
इंद्रायणीनं चांगलाच वेग घेतला आणि ती मालगाड्यांना ओलांडत पुढंपुढं निघाली.
त्याचवेळी पुण्याकडे जाणाऱ्या मालगाड्या, एक्सप्रेस, लोकल्सना इंद्रायणीला क्रॉस
होत होत्या. तळेगाव ओलांडत असताना रेल्वेचा एक पुस्तकवाला पुस्तकांचा गठ्ठा घेऊन
येऊन गेला. वाचनाची आवड लोकांमध्ये वाढावी आणि ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना प्रवासात
काही तरी वाचायला मिळावं या हेतूंनी ही सेवा काही वर्षांपूर्वी इंद्रायणीत सुरू
करण्यात आली आहे. इंद्रायणीमधलं हे फिरतं वाचनालय आहे.
पुढच्या 6 मिनिटांतच शेजारच्या डाऊन
लाईनवरून प्रगती धडाधडत पुण्याकडे निघून गेली. लोणावळ्याच्या TXR यार्डात तीन मालगाड्या कर्जतच्या
दिशेनं जाण्यासाठी परवानगी मिळण्याची वाट पाहत उभ्या होत्या, तर दोन डिझेल आणि तीन
इलेक्ट्रिक इंजिनं लावलेली एक मालगाडी कर्जतकडे जाण्यासाठी पुढं-पुढं सरकत होती. 19.31
ला लोणावळ्यात इंद्रायणी येत असताना शेजारून दख्खनची राणी बाहेर पडत होती. तिनं
अगदी पटकन घेतलेल्या वेगाचा क्षण अनुभवण्यासारखाच होता.
नागनाथ केबिनकडून दिसणारे खोपोलीकडचे दिवे
घाट उतरत असताना जांभरुंगच्या
जवळ रेल्वेचा सामोसावाला आला, पण माझ्याबरोबरच्यांनी कर्जतमध्ये वडापाव खायचं
ठरवलं असल्यामुळं गाडीत आम्ही काही घेतलं नव्हतं. माझ्याबरोबरच्या एकाला सामोसा
खायची इच्छा होती, पण बराच वेळ तो आला नाही म्हणून त्यानं आमच्यासारखंच कर्जतमध्ये
वडापाव खाण्याचं ठरवलं होतं. त्यामुळं सामोसावाल्याला बघितल्यावर तो म्हणाला, “इतका वेळ वाट पाहून कर्जतमध्ये
वडापाव खायचं ठरवलं आणि आता कर्जत जवळ आल्यावर हा आला आहे.” लोणावळ्यातच एक संत्रेवाली इंद्रायणीत चढली
होती, अगदी नवीकोरी जरीची साडी नेसलेली, गळ्यात-कानात सोन्याचे दागिने आणि अगदी
टापटीप. “आरेंज घ्या
आरेंज”, असा आवाज देत
ती गाडीतून फिरू लागली होती.
आता घाट संपला होता आणि कर्जत आलं होतं. लोखंडाची
भलीमोठी रिळं घेऊन जाणारी WDG-4 इंजिनं
असलेली एक मालगाडी पुढच्या प्रवासासाठी परवानगी मिळण्याची वाट पाहत कर्जतच्या अप
यार्डामध्ये उभी होती. त्याचवेळी डाऊन यार्डात एक मालगाडी घाट चढण्यासाठीची
पूर्वतयारी करत होती. ठीक 20.22 ला इंद्रायणी कर्जतमध्ये पोहचली आणि आमची वडापावची
प्रतीक्षाही संपली. बराच वेळ वाट पाहून मिळालेला गरमागरम वडापाव खूपच भन्नाट लागत
होता. कर्जतला गाडीमधले बरेच प्रवासी उतरल्यावर शेजारी उभ्या असलेल्या सीएसएमटी
लोकलमधली गर्दी वाढलेली दिसली. आमच्या समोरची आसनं तर पूर्ण मोकळी झाली. त्यामुळं इतका
वेळ आमच्या मागच्या बाजूला कुठं तरी बसलेल्या एका काकूंनी कल्याणपर्यंतचा प्रवास त्या
मोकळ्या सीट्सवर आरामात झोपून केला.
कर्जतमधून बाहेर पडत असताना 12163 लोकमान्य
टिळक टर्मिनस-एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस कर्जतमध्ये शिरत होती. तिचे
बँकर्सही तयारीत होतेच. कर्जतपासून इंद्रायणीचा वेग चांगलाच वाढला होता. या वेगाचा,
डाऊन लाईनवरून क्रॉस होत असलेल्या गाड्यांचा अनुभव घेत वडापावनंतरचा आमचा चहाही
झाला होता. त्यानंतर भिवपुरी रोड थोडं हळुहळूच ओलांडलं. नेरळ जंक्शन आणि वांगणीला
दोन मालगाड्यांना बाजूला ठेवून इंद्रायणीला पुढं सोडण्यात आलं. नेरळनंतर
इंद्रायणीचा वेग चांगलाच वाढला होता. त्याचवेळी दीड-दोन मिनिटांच्या अंतरानं
शेजारच्या डाऊन लाईनवरून लोकल्स, मेल/एक्स्प्रेस, मालगाड्या अगदी वेगानं क्रॉस होत
होत्या. पुढं बदलापूरला फलाटाच्या अलीकडच्या लूप लाईनवर वेगवेगळ्या प्रकारचे मोकळे
प्रवासी डबे एकत्र उभे होते.
ठाण्यात उभी असलेली मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस
सीएसएमटीच्या फलाटावर विसावत असलेली इंद्रायणी. डावीकडे ऐतिहासिक मुंबई-हावडा मेल. |
उत्कृष्ट
उत्तर द्याहटवाप्रवासवर्णन छान झाले आहे.
उत्तर द्याहटवा