![]() |
तिनियान बेट |
प्रशांत महासागरात आपला नवीन हवाईतळ सुरू
करण्याची अमेरिकेने योजना तयार केली आहे. पश्चिम प्रशांत महासागरात असणारा हा
हवाईतळ अमेरिकेच्या हिंद-प्रशांत क्षेत्रातील राष्ट्रहितांच्या संरक्षणासाठी पूरक
ठरणार आहे. या संबंधीचं वृत्त अलीकडेच प्रकाशित झाले होते. त्यानंतर लगेचच चीनने
अमेरिकेच्या या योजनेवर टीका केली आहे.
अमेरिकेच्या अधिपत्त्याखाली असलेल्या प्रशांत
महासागरातील उत्तर मारियाना द्वीपांच्या समूहातील (Commonwealth of Northern Mariana Islands)
तिनियान हे एक छोटसं बेट आहे. या द्वीपसमूहाच्या जवळ असलेल्या ग्वाम (Guam) बेटावर अमेरिकेचे महत्वाचे नाविक
आणि हवाईतळ आधीपासूनच कार्यरत आहेत. अमेरिकेच्या या क्षेत्रातील राष्ट्रहितांचं
संरक्षण करण्यात ते महत्वाची भूमिका बजावत आलेले आहेत. पण अलीकडील काळात चीनची सतत
वाढत असलेली शक्ती आणि त्याच्या प्रभावाचा प्रशांत महासागरात होत असलेला विस्तार,
या पार्श्वभूमीवर अमेरिकेला या क्षेत्रात आणखी एका हवाईतळाची आवश्यकता भासू लागली
आहे. अमेरिकेच्या सुरक्षेला मिळत असलेलं आव्हान हेही त्यामागे कारण आहे. म्हणून
नव्या परिस्थितीचा विचार करून अमेरिकेनं तिनियान बेटावर अत्याधुनिक हवाईतळ सुरू
करण्याचा निर्णय घेतला आहे.
तिनियान (Tinian) बेट उत्तर मारियाना द्वीपसमूहातील तीन मोठ्या
बेटांपैकी एक आहे. अवघ्या 100 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या बेटाची लोकसंख्या सुमारे
3000 आहे. अमेरिकेच्या हवाई बेटांपासून 6000 किलोमीटर पश्चिमेला आणि ग्वामच्या
उत्तरेला 200 किलोमीटर अंतरावर हे बेट स्थित आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1
ऑगस्ट 1944 ला अमेरिकेनं हे बेट जपानकडून जिंकून घेतलं. त्यानंतर या बेटाच्या
उत्तर टोकावर तातडीनं एक हवाईतळ विकसित करण्यात आला, ज्यामुळे जपानच्या मुख्य
भूमीवर बाँबफेक करण्यासाठी विमानांना धाडणं शक्य झालं होतं. हा तळ आधी जपाननं
बांधला होता, तेव्हा तो उशी पॉईंट म्हणून ओळखला जात होता. पण अमेरिकेच्या ताब्यात
आल्यावर या तळाचं महत्व लक्षात घेऊन अमेरिकेनं त्याची पुन:बांधणी करून त्याचं नामांतर North Field असं केलं होतं. त्यावेळी तो जगातला
सर्वात मोठा हवाईतळ म्हणून गणला जात होता. तिनियान जिंकल्यानंतर 10 च दिवसांमध्ये
ग्वाम बेट अमेरिकेनं जपानकडून जिंकून घेतलं. त्यानंतरच्या काळात ग्वाममध्येही हवाई
आणि नाविकतळ उभारण्यात आले असले तरी तिनियानच्या तळाचं सामरिकदृष्ट्या महत्व कायम
राहिलं होतं. त्यानंतर महायुद्ध संपेपर्यंत जपानच्या मुख्यभूमीवर बाँबहल्ले
करण्यासाठी तत्कालीन अमेरिकन भूदल हवाईदलाची (United States Army Air
Forces) B-29 Superfortress विमानं तिनियानवरच्या त्या तळावरूनच
उड्डाण करत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात या विमानांनी
तिनियानच्या तळावरून उड्डाण करत हिरोशिमा आणि नागासाकीवर अण्वस्त्रे डागली होती.
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर वर्षभरात
तिनियानचा हवाईतळ बंद करण्यात आला होता. पण आता बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत
सामरिक गरज म्हणून त्या तळाचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात त्या
तळाच्या धावपट्ट्या आणि अन्य भागांवर वाढलेलं जंगल साफ केलं जात असून पुढे नवी
बांधकामही तिथं केली जाणार आहेत. यासाठी सुमारे 78 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधीही
देण्यात आला आहे. यावेळी तिनियान आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही विकास करण्यात येणार
आहे. तिनियानच्या विकासामुळं सध्या अमेरिकेच्या ग्वाम तळावर येत ताणही कमी करता येणं
शक्य होणार आहे.
चीनची
प्रतिक्रिया
तिनियानच्या तळाचं अमेरिकेकडून पुनरुज्जीवन
करण्यात येत असल्याचं वृत्त प्रकाशित होताच चीनच्या संरक्षण मंत्रालयानं त्यावर
प्रतिक्रिया दिली आहे की, अमेरिकेच्या या हालचालींवर चीन बारीक नजर ठेवून आहे आणि
चीन आपले सागरी हक्क, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी कठोर पावलं
उचलेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा