तुमच्यापैकी
अनेक जण गोव्याला जाऊन आले असतील, पण गोव्याला माझं काही जाणं होत नव्हतं. गोवा
जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं (Naval Air Arm) संग्रहालय
असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल
आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप
इच्छा होती. बरीच वर्ष अपुरी राहिलेली ती इच्छा पूर्ण करण्याचा अखेरीस निश्चय केला
आणि म्हटलं की, फक्त संग्रहालय पाहायला का असेना गोव्याला धावती भेट देऊन यायचंच.
गोव्याला जाण्यासाठी गोवा एक्सप्रेसचं
आरक्षण केलं. या गाडीचं आरक्षण मिळणं हे एक दिव्य असतं, पण नशीबानं मला त्यावेळी तिचं
आरक्षण मिळालं. मग माझ्या माहितीतले जे-जे गोव्याला अनेकदा जाऊन आलेले आहेत,
त्यांना मी या संग्रहालयापर्यंत, विमानतळापर्यंत कसं पोहचता येईल यासंबंधीची चौकशी
सुरू केली. पण कोणालाच त्याबद्दल ठोस काही सांगता येत नव्हतं. कारण त्यांनाच त्या संग्रहालयाबद्दल
काही माहीत नव्हतं. शेवटी मी ठरवलं, “आता आरक्षण केलेलं आहेच, तर आपणच तिथं गेल्यावर शोधून काढू या
संग्रहालयाकडे कसं जायचं ते.”
सकाळी सव्वासातला गोवा एक्सप्रेस वास्को द गामा स्टेशनवर पोहचली, तेव्हा शेजारच्या फलाटावर वास्को-कुळें पॅसेंजर उभी होतीच. म्हणून पळतपळत तिकीट खिडकी गाठली आणि दाभोळिमचं तिकीट काढून त्या पॅसेंजर गाडीत बसलो. काही मिनिटांतच गाडी निघाली. गोवा एक्सप्रेस दाभोळिमला थांबत नसल्यामुळं पुढं जाऊन परत मागं यावं लागलं होतं. वास्कोच्या पुढचंच स्टेशन आहे दाभोळिम. स्टेशनवर उतरल्यावर तिथं लावलेल्या पाटीवरून समजलं की, दाभोळिमचं मूळ नाव दाभोलळ्ळी आहे. या छोटेखानी स्टेशनवर उतरल्यावर पलीकडच्या बाजूला उंचावर विमानतळाची संरक्षक भिंत दिसत होतीच. हे स्टेशन इतकं छोटेखानी आहे की, यामध्ये एकच लोहमार्ग आहे आणि त्या मार्गाला लागूनच पलिकडे घरं आहेत. मग चालतच जीपीएसवर बघत बघत बोगमालो रोडवरून संग्रहालयाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो. हे अंतर साधारण अडीच किलोमीटर आहे. प्रवेशद्वाराशी पोहचल्यावर एक बस समोर आली आणि वास्को स्टेशनच्या बाहेरच्या मार्केटपासून इथंपर्यंत बसनंही येता येतं हे लक्षात आलं.
दाभोळिम विमानतळावर नौदलाच्या हवाई शाखेचं मुख्यालय आहे आणि तिथंच
नौदलाचं संग्रहालय आहे. नौदलाचा हवाईतळ असल्यामुळं कडक सुरक्षा व्यवस्था तिथं दिसू
लागली होतीच. मुख्य प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावर संग्रहालयाचं प्रवेशद्वार आहे.
त्याच्या शेजारच्या भिंतीवर लिहिलेलं आहे – Asia’s only Naval Aviation
Museum. बऱ्याच
वर्षांपासून असलेली हे संग्रहालय पाहण्याची इच्छा पूर्ण होत असल्यामुळं त्याच्या
परिसरात पाऊल ठेवताना अतिशय उत्साहित झालो होतो.
आयलँडर विमान |
Sea Hawk |
भारतीय नौदलातून काही वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झालेलं सी हॅरियर हे लढाऊ विमानही इथं पाहायला मिळालं. सी हॅरियरच्या शेजारीच कामोव्ह-25 हे पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात उपयुक्त ठरणारं हेलिकॉप्टरही पाहता येतं.
Sea Harrier and Ka-28 Helicopter |
व्हर्च्युअल रिॲलिटी कॉर्नरला
स्वप्नपूर्ती करणारं दालन म्हणूनही ओळखलं जातं. कारण या दालनात बसवलेल्या
सिम्युलेटरच्या मदतीनं एखाद्या लढाऊ विमानाच्या कॉकपीटमध्ये बसून विमान उडवत असण्याचा
अनुभव आपल्याला घेता येतो. पण हे दालन नुतनीकरणासाठी बंद असल्यामुळं मला पाहता आलं
नाही.
भारत-पाक युद्धांमधील, विशेष करून 1971 च्या युद्धामधील नौदलाच्या हवाई शाखेच्या उल्लेखनीय कामगिरीची सचित्र माहिती करून देणारं मोठं दालन इथं आहे. नौदलाच्या हवाई शाखेत वापरली गेलेली विविध प्रकारची शस्त्रास्त्र आणि वेगवेगळ्या विमानांची इंजिनंही संग्रहालयात जागोजागी मांडलेली आहेत. विमान दालनात नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या आणि सध्या वापरात असलेल्या विमानं-हेलिकॉप्टर्सची तांत्रिक माहिती आणि सोबतच त्यांची छोटी मॉडेल्स ठेवण्यात आलेली आहेत.
संग्रहालयाच्या सर्वात मोठ्या कक्षात भारतीय नौदलाच्या हवाई शाखेचा इतिहास
सांगणारी आणि गोवा मुक्तिसंग्रामाशी संबंधित अनेक छायाचित्रंही लावलेली आहेत. एका
दालनात तर आपल्याला नौदलाच्या हवाई शाखेच्या आजपर्यंतच्या वाटचालीची थोडक्यात
माहिती एका ध्वनिचित्रफितीतून करून घेता येते. भारतीय नौदलाच्या आजपर्यंतच्या
प्रमुखांची आणि नौदलाच्या वेगवेगळ्या हवाईतळांची ओळख करून देणारी अनुक्रमे यश आणि
अद्वितीय ही दोन दालनं इथं आहेत. सशक्त दालनात एरोस्पेस मेडिसीन, लढाऊ विमानामधली वैमानिकाची
सीट, वैमानिकांसाठीची आपत्कालीन बचाव साधनं, हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा यांची
माहिती करून घेता येते.
संग्रहालयात असलेल्या Glass Cockpit Café मध्ये थोडंफार खाऊन मी संग्रहालयातून बाहेर पडण्याआधी,
माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणं आठवण म्हणून मी इथून काही भेटवस्तू (souvenirs) खरेदी केल्या. त्यानंतर बाहेर जात
असतानाच टीयू-142 एम विमानाचा भलामोठा पंखा नजरेस पडला. भारतीय नौदलात 2017 पर्यंत
हे दीर्घपल्ल्याचं विमान सागरी गस्त आणि पाणबुडीविरोधी कारवायांसाठी वापरलं जात
होतं. नौदलात अतिशय प्रभावी कामगिरी बजावलेलं हे विमान मात्र या संग्रहालयात
पाहायला मिळालं नाही याची रुखरुख होती. भविष्यात हे विमान इथं ठेवलं जाण्याचीही
शक्यता वाटत नाही, कारण त्या भल्यामोठ्या विमानाला सामावून घेण्याइतकी जागा इथं आता
तरी शिल्लक नाही.
Glass Cockpit Cafe |
संग्रहालयाच्या संपूर्ण भेटीत
लष्करी टापटिपीची छाप सगळीकडे दिसत होती. नुतनीकरणाच्या कामामुळं बंद असलेली संग्रहालयामधली
काही दालनं पाहायची राहून गेली असली तरी बरंचसं संग्रहालय पाहायला मिळाल्यामुळं मला
खूप रोमांचित वाटत होतं, आणि आठवणी आल्या की आजही तसंच व्हायला होतं!
Short Sealand-II |
आंतरराष्ट्रीय राजकारणात, अर्थकारणात आणि
एकूणच भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हिंदी महासागराचं महत्व अनन्यसाधारण आहे.
या महासागरातील भारताच्या राष्ट्रहितांच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल
पाण्याखालून, पाण्यावरून आणि समुद्रावरील आकाशातून सक्षमपणे पार पाडत आहे. यापैकी
समुद्रावरील आकाशातील भारतीय नौदलाच्या शक्तीची ओळख करून घेण्यासाठी गोव्यातील
नौवहन संग्रहालय (Naval Aviation Museum) एक महत्वाचे साधन ठरत आहे. म्हणूनच या पूर्ण नुतनीकृत संग्रहालयाला पुन्हा-पुन्हा
भेट द्यायची माझी खूप इच्छा आहे.
आपल्या मुळे अनेक विषयांची , संग्रहाल्यांची माहिती मिळते , ज्ञानात भर पडते या उपक्रमा बद्दल आपले आभार .
उत्तर द्याहटवाVery nice article published on the occasion of Diwali. Like it!
उत्तर द्याहटवा