आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

उमेद भवन, जोधपूर (Photo : Wikipedia)

      स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत. उमेद भवन राजवाडा स्वातंत्र्यप्राप्तीच्या जेमतेम चार वर्षे आधी बांधून पूर्ण झाला होता. त्यामुळं हा उपखंडातला सर्वात तरूण राजवाडा मानला जातो. आम्ही हा राजवाडा पाहायला गेलो, त्याला आता 33 वर्ष होत आली आहेत, पण तरीही त्या आठवणी अजून ताज्या आहेत.

      जोधपूरचे महाराजा उमेदसिंह यांनी 1925 मध्ये एक राजवाडा उभारण्याचा निर्णय घेतला होता. महाराजांना हा निर्णय घ्यावा लागला, कारण त्या काळात जोधपूरच्या परिसरात प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यामुळं जनतेचे होत असलेले हाल पाहून महाराजा उमेदसिंह यांनी जनतेला मदत करण्याचं ठरवलं. तो निर्णय त्यांनी जनतेला कळवला. पण जनतेनं महाराजांना स्पष्टच सांगितलं की, आम्हाला मदत दान म्हणून नको आहे. त्याचबरोबर जोधपूर संस्थानातील सर्व जनतेनं महाराजांना अशीही विनंती केली की, महाराजांनी त्यांना काही काम देऊन त्याचा मोबदला द्यावा. त्यातूनच उमेद भवन उभारण्याची कल्पना पुढे आली.

      महाराजा उमेदसिंह यांनी नव्या राजवाड्याच्या उभारणीची जबाबदारी लंडनस्थित लँकेस्टर अँड लॉज या कंपनीकडे दिली. त्यानंतर कंपनीचे प्रमुख आणि प्रसिद्ध वास्तुरचनाकार हेंरी वॉघन लँकेस्टर याने उमेद भवनचे आरेखन सादर केले. त्यानंतर 18 नोव्हेंबर 1929 ला नव्या राजवाड्याची पायाभरणी झाली. सोनेरी-पिवळसर रंगाच्या चित्तार प्रकारच्या वालुकाश्मात उभारलेल्या उमेद भवनचे काम 1943 मध्ये पूर्ण झाले. म्हणजे या वर्षी उमेद भवनाला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत.

      उमेद भवनचं आरेखन नवी दिल्लीतील राष्ट्रपतीभवनाशी साधर्म्य सांगते. हा राजवाडा उभारताना दगडाचे दोन तुकडे जोडण्यासाठी सिमेंट किंवा तत्सम पदार्थाचा वापर न करता सर्व दगड सांध्यांच्या मदतीनं जोडलेले आहेत. उमेद भवनचा एकूण परिसर सुमारे 26 एकरचा असून त्यापैकी 15 एकर परिसरात उद्यानं केलेली आहेत. त्यातीलच एक उद्यान राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरही आहे. बाहेरच्या फाटकातून थेट राजवाड्याकडे जाणारा रस्ता याच उद्यानातून जातो. राजवाड्याचं मुख्य प्रवेशद्वार थोडं उंचावर असल्यामुळं त्याच्या समोर पायऱ्या केलेल्या आहेत. तिथून आत गेल्याबरोबर राजवाड्याच्या आकर्षक मध्यवर्ती घुमटाच्या आतील बाजूला केलेली कलाकुसर दर्शनास पडते. या घुमटाची उंची सुमारे 105 फूट आहे. याच्या झरोक्यांमधून आत येणारा नैसर्गिक प्रकाश तिथलं वातावरण प्रसन्न राखण्यास मदत करतो.

      अतिशय भव्य उमेद भवनातील हवेल्या आणि अन्य कक्षांमधील अप्रतिम कलाकुसर या राजवाड्याच्या सौंदर्यात भर तर टाकतेच, शिवाय राजवाड्याला भेट देणाऱ्या प्रत्येकाला संमोहित करते. या राजवाड्याच्या उभारणीत संगमरवराचा अक्षरश: मुक्त म्हणजेच तब्बल दहा लाख चौरस फूट इतका वापर केलेला आहे. राजवाड्यात 347 कक्ष आहेत. त्यांच्यापैकी काही कक्षांमध्ये आणि राजवाड्याच्या अंतर्गत भागात इतरत्र युरोपियन पद्धतीची सजावट केलेली आढळते. राजवाड्यातील सिंहासन कक्षात रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित भित्तीचित्रे रेखाटलेली आहेत. तसंच तळघरात एक रुग्णालय आहे. इतर कक्षांमध्ये महाराजांचे खासगी संग्रहालय, नृत्यकक्ष केंद्रीय कक्ष आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घड्याळांचं अनोखं संग्रहालय यांचाही समावेश आहे. केंद्रीय कक्षात संस्थानकाळात महाराजा आणि त्यांचे विशेष अतिथी यांच्या भेटीगाठी होत असत. तसंच काही महत्वाचे प्रसंगही इथं साजरे केले जात असत.

      उमेद भवनमध्ये खास महाराजांना टेनिस, बिलियर्ड्स आणि स्क्वॉश खेळण्यासाठी कोर्ट्स आणि अन्य कक्ष तयार केलेले आहेत. त्यापैकी स्क्वॉशचं कोर्ट संगमरवरात बनवलेलं आहे. राजवाड्यात पोहण्याचा तलाव, बगीचे आणि अन्य सुविधाही उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

      स्वातंत्र्यानंतर देशातील संस्थानिकांना सुरू असलेल्या विविध सवलती, मानसन्मान आणि तनखे इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात 1971 मध्ये बंद करण्यात आले. त्याचा विपरित आर्थिक परिणाम देशातील सर्व राजघराण्यांवर झाला. त्या बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जोधपूरच्या महाराजांनी 1977 मध्ये आपल्या निवासस्थानातील, उमेद भवनमधील काही भागांचं आलिशान हॉटेलमध्ये रुपांतर केलं. त्यासाठी या राजवाड्याची मोठ्या प्रमाणात डागडुजी करण्यात आली. त्यामुळे आज उमेद भवन तीन भागांमध्ये विभागलं गेलं आहे. एका भागात पंचतारांकित हॉटेल आणि दुसऱ्या भागात जोधपूरच्या राजवैभवाची माहिती देणारं शाही संग्रहालय आहे. उर्वरित भागात महाराजांचं खासगी निवासस्थान आहे. अशा प्रकारे शाही हॉटेलमध्ये रुपांतरित झालेला उमेद भवन हा भारतातील पहिला राजवाडा ठरला होता. जोधपूर शहराजवळच्या चित्तार टेकड्यांवर हा राजवाडा वसलेला असल्यामुळं स्थानिक लोक याला चित्तार महाल म्हणूनही संबोधतात.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा