14 जुलै हा दिवस फ्रान्समध्ये Fête Nationale Française किंवा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला बॅस्टिल डे (Bastille Day) म्हणूनही ओळखले जाते. या दिवशीच 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान लोकांनी बॅस्टिलच्या किल्ल्यातील तुरुंग फोडला होता आणि त्यातील राजकीय कैद्यांची मुक्तता केली होती. त्या ऐतिहासिक घटनेचा हा वर्धापन दिन आहे. यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पॅरिसमध्ये पार पडणाऱ्या बॅस्टिल डे संचलनामध्ये सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या संचलनामध्ये भारतीय सशस्त्र दलांच्या 269 जवानांच्या चार पथकांनी सहभाग घेतला होता.
भारतीय आणि
फ्रेंच सैन्याचा संबंध पहिल्या महायुद्धाच्यावेळी आला. 1.3
दशलक्षाहून अधिक भारतीय सैनिकांनी युद्धात भाग घेतला होता. त्या महायुद्धात फ्रेंच
भूमीवरही भारतीय सैन्याने पराक्रमाने लढा दिला. त्यांच्या धैर्याने, शौर्याने आणि सर्वोच्च बलिदानाने केवळ शत्रूचाच पराभव केला नाही तर
युद्ध जिंकण्यातही मोठं योगदान दिलं. दुसऱ्या महायुद्धातही 2.5 दशलक्ष भारतीय सैनिकांनी आशियापासून आफ्रिका आणि युरोपपर्यंत
युद्धाच्या विविध आघाड्यांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये फ्रान्सच्या
युद्धक्षेत्रांचाही समावेश होता.
याआधी 2009 च्या
बॅस्टिल डे संचलनात भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी प्रमुख अतिथी म्हणून
आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळीही भारताच्या तिन्ही लष्करी दलांच्या तुकड्या बॅस्टिल
डेमध्ये सहभागी झाल्या होत्या. पण त्यावेळी फक्त संचलन तुकड्यांचा सहभाग होता.
भारतीय हवाईदलाची विमानं किंवा नौदलाची युद्धनौका या समारंभात सहभागी झालेल्या
नव्हत्या.
भारतीय
भूदलाच्या तुकडीचं नेतृत्व कॅप्टन अमन जगताप यांनी केलं. भारतीय भूदलाचं
प्रतिनिधित्व करणाऱ्या पंजाब रेजिमेंटच्या तुकडीत 77
जवान आणि राजपुताना रायफल्सच्या बँडपथकात 38 जवान
सहभागी झाले होते. पंजाब रेजिमेंट भारतीय भूदलाच्या सर्वात जुन्या रेजिमेंटपैकी एक
आहे. पहिल्या महायुद्धात पंजाब रेजिमेंटनं मेसोपोटेमिया, गॅलीपोली,
पॅलेस्टाईन, इजिप्त, चीन,
हाँगकाँग, दमास्कस आणि फ्रान्समध्ये गाजवलेल्या
शौर्यामुळं तिला 18 बॅटल आणि थिएटर ऑनर्सनी सन्मानित करण्यात
आलं होतं. फ्रान्समध्ये, त्यांनी सप्टेंबर 1915 मध्ये न्यूव्ह चॅपेलजवळच्या लढाईत भाग घेतला आणि बॅटल ऑनर्स 'लूस' आणि 'फ्रान्स
आणि फ्लँडर्स' मिळवले. द्वितीय विश्वयुद्धात या रेजिमेंटनं
16 बॅटल ऑनर्स आणि 14
थिएटर ऑनर्स मिळवले होते.
राजपुताना
रायफल्सचे बँडपथक पंजाब रेंजिमेंटच्या तुकडीला साथ देत संचलनात सहभागी झाले होते. ही
रेजिमेंट भारतीय लष्करातील सर्वात वरिष्ठ रायफल रेजिमेंट आहे. त्याच्या बहुतेक
बटालियनचा दीर्घ आणि गौरवशाली इतिहास आहे. त्यांनी दोन्ही महायुद्धांमध्ये मोठी
कामगिरी बजावली होती. दुसऱ्या महायुद्धात या रेजिमेंटच्या बटालियन्स भारतीय
सैन्याचा सहभाग असलेल्या प्रत्येक युद्धभूमीमध्ये लढले होते. त्यामुळे या
रेजिमेंटला स्वातंत्र्यापूर्वी सहा व्हिक्टोरिया क्रॉस मिळाले होते. रेजिमेंटचा
बँड 1920 मध्ये नसीराबादमध्ये (राजस्थान) स्थापित झाला
होता.
बॅस्टिल डे
संचलनात भारतीय नौदलाच्या तुकडीचं नेतृत्व कमांडर व्रत बघेल यांनी केलं. त्या
पथकात नौदलाच्या चार अधिकारी आणि 64 नौसैनिकांचा समावेश होता. याबरोबरच भा.
नौ. पो. चेन्नई (INS Chennai) ही भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक विनाशिका 12 ते 16 जुलैदरम्यान फ्रान्सच्या ब्रेस्ट
बंदरामध्ये नांगर टाकून होती. ती युद्धनौका तेथील बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी
झाली होती. या विनाशिकेनं फ्रांसला दिलेली भेट दोन्ही देशांमधील विस्तृत सागरी सहकार्य
अधोरिखित करत होती.
संचलनात भारतीय
हवाई दलाच्या तुकडीचं नेतृत्व स्क्वाड्रन लीडर सिंधू रेड्डी यांनी केलं. भारतीय
हवाईदलाची राफाल लढाऊ विमानंही या संचलनातील फ्लाय पास्टमध्ये सहभागी झाली होती. या संचलनासाठी चार राफाल लढाऊ विमानं, दोन C-17 ग्लोबमास्टर्स-3 आणि 72 वायुसैनिक फ्रांसला
गेले होते. फ्रांसच्या राष्ट्रीय सणात (बॅस्टिल डे) भारतीय हवाईदलाचा सहभाग दोन्ही
देशांमधील हवाई शक्तीच्या क्षेत्रातील दीर्घ सहकार्याचं प्रतीक ठरला. वेलीणकर,
शिवदेव सिंग, एचसी दिवाण आणि जंबो मजुमदार
यांसारख्या अनेक भारतीय वैमानिकांनी दोन्ही महायुद्धांदरम्यान फ्रांसच्या आकाशात
शौर्य गाजवलं होतं.
भारत आणि फ्रांस
यांच्यातील व्यूहात्मक भागीदारीला यंदा 25 वर्षे पूर्ण
झाली आहेत. दोन्ही देशांचे नियमित संयुक्त लष्करी सराव होत आहेत. गेल्या काही
वर्षांत भारत आणि फ्रांस विश्वसनीय संरक्षण भागीदार बनले आहेत. भारत-फ्रांस
संबंधांच्या या पार्श्वभूमीवर तिन्ही भारतीय लष्करी दलांची पथकं Avenue des Champs-Élysées वरून दिमाखात संचलन करत गेली.
![]() |
सर्व फोटो - पीआयबी |
छान माहिती
उत्तर द्याहटवा