न्योमा - लडाखमधला हवाईतळ

न्योमामध्ये उतरलेलं पहिलं विमान (फोटो-पीआयबी)
 

       भारतीय भूदलानं नुकताच लडाखमधल्या न्योमामध्ये सराव केला. चीनबरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून अगदी जवळ असलेल्या न्योमामध्ये हे सराव होणं महत्वपूर्ण आहे. या सरावात भूदलामधल्या स्वदेशी धनुष हॉवित्झर तोफांबरोबरच एम-४ हे त्वरित प्रतिसाद दल वाहन (Quick Reaction Force Vehicle), टी-७२ आणि टी-९० रणगाडेही सहभागी झाले होते. हा सराव सिंधू नदीच्या किनाऱ्यावर १४,५०० फूट उंचीवर करण्यात आला.

न्योमाचं सामरिक महत्व लक्षात घेऊन इथं हवाईदलाच्या विमानांसाठी Advanced Landing Ground पुनरुज्जीजित करण्यात आलं आहे. ही धावपट्टी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून २३ किलोमीटर अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून १३,३०० फूट उंचीवर स्थित आहे. ही धावपट्टी १९६२ मध्ये चीनी आक्रमणाच्या आसपास बांधण्यात आली होती. न्योमाच्या या धावपट्टीचा आणखी विस्तार करून तिथं लढाऊ विमाने उतरविता येतील, अशी सोय करण्यात येत आहे. इथं हवाईदलाचा पूर्ण क्षमतेचा तळ उभारण्याचं काम येत्या २ वर्षांमध्ये पूर्ण करण्याची योजना आहे.

भारतीय हवाईदलाचं AN-32 विमान 18 सप्टेंबर 2009 ला सकाळी 06.25 वाजता न्योमाच्या Advanced Landing Ground (ALG) वर उतरलं होतं. 16,200 फूट उंचीवर असलेल्या दौलत-बेग-ओल्डी (DBO) मध्ये AN-32 उतरल्यानंतर अवघ्या पंधरा महिन्यांनी हे लँडिंग झालं होतं. भारताच्या संरक्षण तयारीच्या दृष्टीने ते एक महत्वाचं पाऊल ठरलं होतं. त्याआधी या ठिकाणी हवाईदलाची हेलिकॉप्टर उतरत असत, पण न्योमाच्या या कॉम्पॅक्टेड एअरस्ट्रिपवर म्हणजेच तेथील मातीला घट्ट करून तयार केलेल्या धावपट्टीवर स्थिर पंख असलेले विमान उतरण्याची ती पहिलीच वेळ होती. भूदलाच्या १४व्या कोअरच्या अभियंता रेजिमेंटनं स्थिर पंखाच्या विमानांच्या संचालनासाठी आवश्यक मानकांनुसार हे ALG विकसित केलं होतं. आता या धावपट्टीच्या ठिकाणी पूर्ण क्षमतेचा हवाईतळ विकसित केल्यामुळे भूदलाबरोबरच हवाईदलालाही लेह-लडाख प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (Line of Actual Control/LAC) जवळच्या दुर्गम भागांचं संरक्षण अधिक प्रभावीपणे करणं शक्य होणार आहे. या तळावरून हवाईदलाची सर्व प्रकारची विमानं आणि हेलिकॉप्टर्सचं संचालन करता येईल.

चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अतिशय दुर्गम भागात, हिमालयातील प्रतिकूल हवामानाचा सामना करत न्योमाचा हवाईतळ विकसित करण्यात येत आहे. लडाख प्रदेशातील दुर्गम भागांना मुख्य भूमीशी जोडण्याच्या उद्देशानेही न्योमामध्ये विकसित करण्यात आलेली धावपट्टी उपयुक्त ठरत आहे. कडाक्याच्या हिवाळ्यात या क्षेत्रात भूदलासाठी रसद पुरवठा आणि स्थानिक जनतेसाठीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात ही धावपट्टी महत्वाची भूमिका बजावत आहे. न्योमा (Nyoma) हे आग्नेय लडाखमधील भूदल आणि हवाईदल या दोघांसाठीही एक महत्त्वाचे ठिकाण आहे. इथं हवाईतळ विकसित करण्यासाठी सुरुवातीच्या अंदाजानुसार सुमारे 2,173 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. न्योमामध्ये हवाईतळ उभारण्याचा प्रस्ताव तिथं An-32 विमान उतरल्यावर लगेचच 2010 मध्ये मांडण्यात आला होता.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा