व्यूहात्मक महत्वाचा उत्तर-दक्षिण कॉरिडॉर

  

International North-South Transport Corridor (Photo - Wikipedia)

      भारत, रशिया आणि युरोप यांच्यातील व्यापाराची गती वाढवणारा आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण विशेष वाहतूक मार्ग (International North-South Transport Corridor) सुरू होऊन नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. या मार्गावरून जून 2022 मध्ये रशियाहून भारतात पहिल्यांदा माल पाठवला गेला होता. रशियातील सेंट पीटर्सबर्गहून लोहमार्गाने तो माल रशियाच्या कॅस्पियन सागराच्या किनाऱ्यावरच्या अस्त्राखान बंदरात आणला गेला. त्यानंतर जहाजाने तो माल पुढे इराणच्या कॅस्पियन सागराच्या किनाऱ्यावरील अंजाना बंदरात आणला गेला. पुन्हा तो माल लोहमार्गाने इराणच्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील बंदर अब्बास इथं पोहोचला. त्यानंतर जहाजाने तो मुंबईला पाठवण्यात आला होता.

भारत, इराण आणि रशिया यांच्या संबंधांमधील नवं पर्व ‘आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण विशेष वाहतूक मार्गा’द्वारे सुरू झालं आहे. या मार्गामुळं दक्षिण तसंच आग्नेय आशिया आणि रशिया व युरोप यांच्यातील अंतर कमी होऊन व्यापार जलद आणि सुलभ होऊ लागला आहे. या मार्गाच्या उभारणीचं काम पूर्णत्वाकडं निघालं असताना आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण विशेष वाहतूक मार्गाशी अन्य मार्ग संलग्न करण्याचं काम सुरू झालं आहे.

      रशियाचा विस्तार प्रचंड असून त्याचा काही भाग युरोप, तर काही भाग आशियात येतो. या वैशिष्ट्यामुळे युरोप आणि आशिया यांना जोडणाऱ्या सेतूची भूमिका बजावण्याची रशियाची इच्छा आहे. त्याचा रशियाला आर्थिक आणि सामरिक लाभही होणार आहे. या मार्गाप्रमाणेच युरोपला अतिपूर्वेच्या देशांशी जोडण्याच्या हेतूने ट्रान्स-सैबेरियन लोहमार्गाचा व्लदिवस्तोकच्या पुढे उत्तर आणि दक्षिण कोरियापर्यंत विस्तार करण्यावरही अलीकडे विचार सुरू झाला होता. INSTC ने माल पाठविल्याने वाहतुकीवरील खर्चातही कपात होणार आहे. या मार्गामुळे सुएझ कालव्याला एक पर्याय उपलब्ध झाला असून तो कमी अंतराचा आहे. या मार्गाने युरोपीय संघाला भारत, चीन आणि आग्नेय आशियातील बाजारपेठांपर्यंत जलद पोहोचता येणार असल्याने जर्मनी, पोलंडबरोबरच स्कँडिनेव्हियन देशही या प्रकल्पात रस घेत होते. मात्र आता तो विचार मागे पडला आहे.

      INSTC उभारण्याचा विचार सर्वप्रथम सन 2000 मध्ये मांडण्यात आला होता. त्याला अनुसरून असा मार्ग विकसित करण्यासाठी भारत, रशिया आणि इराण यांनी 12 सप्टेंबर 2000 रोजी केलेल्या कराराची 16 मे 2002 पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली होती. या मार्गामुळे भारत आणि रशिया यांच्यादरम्यान होणाऱ्या मालवाहतुकीवरचा खर्च सुमारे 40 टक्क्यांनी कमी झाला आहे. तसेच त्यांच्यातील मालवाहतुकीचा कालावधीही निम्म्याने कमी होणार आहे. या मार्गाने होणारी वाहतूक प्रामुख्याने कंटेनरमधून होत आहे. या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून रशियातील सेंट पीटर्सबर्ग, उस्त-लुया आणि ओल्या येथील बंदरांवर कंटेनर टर्मिनल उभारण्यात आली आहेत. दक्षिण आणि आग्नेय आशियातून कंटेनर जलमार्गाने इराणच्या बंदर अब्बासपर्यंत आणले जातात. नंतर रस्ता तसेच लोहमार्गाने ते इराणच्या उत्तरेकडील कॅस्पियन सागरावरील बंदर अंजालीपर्यंत नेले जातात. तिथून पुन्हा जलमार्गाने ते या सागराच्या दुसऱ्या बाजूला वसलेल्या रशियातील ओल्या आणि अस्त्राखान बंदरात आणले जातात. तिथून ते कंटेनर पुढे रशियातील सेंट पीटर्सबर्गपर्यंत पाठविले जातात.

      ‘आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण विशेष वाहतूक मार्ग’ फायदेशीर असल्याने कझाकस्तान, बेलारुस, तुर्कस्तान, पोलंड, ओमान, बहरिन आदी देश या प्रकल्पात रस घेतला आहे. या मार्गामुळे भूवेष्टीत मध्य आशियाई देशांनाही आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. ज्या क्षेत्रातून ‘उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग’ जात आहे, त्या क्षेत्राला आंतरराष्ट्रीय राजकारणात व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्व आहे. हा संपूर्ण परिसर कायम संवेदनशील मानला जातो. या प्रदेशामधले आपले सामरिक हितसंबंध जपण्यासाठीही हा मार्ग भारतासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा मार्ग भारताला मध्य आशियाशी संपर्क साधण्याचे एक महत्त्वाचे साधन उपलब्ध करून देत आहे.

काही वर्षांपूर्वी इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमाबाबत इराण आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच स्थायी सदस्य आणि जर्मनी यांच्यात तडजोड करार झालेला होता. त्यामुळे तेहरान आणि अमेरिका, युरोप यांच्यातील तणाव निवळू लागला होता. त्यामुळे ‘उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गा’च्या कामाला गती देण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले होते. पण त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं इराणबरोबरचा अणुकरार रद्द करून त्याच्यावर आणखी निर्बंध लादले होते. परिणामी INSTC चं काम पुन्हा थंडावलं होतं. पण अनेक अडचणींमुळं अनेक वर्ष रखडलेला हा मार्ग सुरू झाला आहे.

टिप्पण्या