भीषण रेल्वे अपघाताचं संभावित कारण

कोरोमंडल एक्सप्रेस घसरण्यासाठी कारणीभूत ठरलेला रुळाचा भाग (सांधा).

  

      2 जूनला संध्याकाळी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामधल्या बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी आणि दोन प्रवासी रेल्वेगाड्यांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. त्या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 1,100 च्या वर प्रवासी जखमी झालेले आहेत. अलीकडच्या काळातला हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला असून विविध देशांकडून भारताला शोकसंदेशही पाठवण्यात आले आहेत.

      नेहमीप्रमाणेच भीषण अपघात झाल्यावर त्याचं वार्तांकन आणि चर्चा आपल्याकडच्या सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यात, सर्वात आधी Ground Zero वरून आमचे वार्ताहर कसं सटीक वार्तांकन करत आहेत, हेही सांगितलं जाऊ लागलं. त्याचवेळी हा अपघात कशामुळे झाला आहे, याचा निष्कर्षही ग्राफिक्समधून काढण्याची स्पर्धा या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली. त्या निष्कर्षांमध्ये सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे एकाच मार्गावर दोन गाड्या येऊन त्या आदळल्याचं, मानवी चूक असल्याचं वगैरे वगैरे सांगितलं जाऊ लागलं. तसंच कोरोमंडलला आधी हिरवा सिग्नल दिला होता, पण तो अचानक तिचा सिग्नल लाल केला गेला आणि त्यामुळं ती गाडी शेजारच्या लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली असंही एक तथ्यहिन कारण सांगितलं जाऊ लागलं. या सगळ्या निष्कर्षांमध्ये मला फारसं तथ्य वाटत नसल्यामुळं या अपघाताबाबत माझं मत इथं मांडावसं वाटतं.

      अपघात होण्याआधी शालिमारहून (कोलकाता) चेन्नईकडे जाणाऱ्या 12841 कोरोमंडल एक्सप्रेसला मार्ग मोकळा करून देण्यासाठी तिच्या पुढे असलेल्या मालगाडीला बहानगा बाजार स्थानकात लूप लाईनवर घेण्यात आलं होतं. त्यानंतर सगळ्या तांत्रिक प्रक्रिया रीतसर पूर्ण करत मागून येत असलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसला लाईन क्लिअर दिली गेली. त्यामुळे बाहानगा बाजारचा अप होम सिग्नल हिरवा होता आणि त्याची खात्री त्याच्या मागचा डिस्टंट सिग्नलही करून देत होता. परिणामी कोरोमंडल पूर्ण वेगानं स्थानकात शिरत होती. कोरोमंडलच्या लोको पायलटने होम सिग्नल हिरवा असल्याचा जबाब चौकशीत दिला आहे. त्यामुळे होम सिग्नलच्या पुढे असलेल्या रुळांच्या मुख्य सांध्याच्या (Point) पुढच्या रुळामध्ये काहीतरी बिघाड झाला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. कदाचित कोरोमंडल पूर्ण वेगानं पुढे येत असताना त्या रुळातील बिघाडामुळे जोरजोरात हेलकावे खाऊ लागली असावी. अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी गाडी जोरात हेलकावे खात होती, असं म्हटलं आहे. वेग आणि हेलकाव्यांमुळं रुळावरून घसरून अनियंत्रित झालेल्या गाडीचे इंजिन शेजारी लूप लाईनवर उभ्या मालगाडीवर चढले असावे. या झटक्यानं कोरोमंडलचे मागचे डबेही रुळावरून घसरले आणि शेजारच्या डाऊन मेन लाईनवर पडले होते. माध्यमांमध्ये सांगितलं जात असल्याप्रमाणं सिग्नल लाल झाल्यानं कोरोमंडलनं इतक्या वेगानं मालगाडीला लूपवर जाऊन मागून धडक दिली असण्याची शक्यता वाटत नाही.

      एकीकडे संध्याकाळी 6.55 ला कोरोमंडल बहानगा बाजार स्थानक ओलांडणार होती आणि बेंगळुरूहून हावड्याला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेसही हे स्थानक ओलांडणार होती. त्यामुळे तिलाही डाऊन मेन लाईनचा होम सिग्नल हिरवा मिळाला होता. एकाचवेळी या गाड्या विरुद्ध दिशेनं हे स्थानक ओलांडणार होत्या. स्टेशन मास्तर आणि पॉईट्समन आपापल्या नियोजित जागांवर हिरवे सिग्नल हातात घेऊन दोन दिशांना उभे होते. दरम्यान, स्थानकात शिरल्यावर लगेचच कोरोमंडल रुळावरून घसरली होती, तेवढ्यात विरुद्ध दिशेनं हावडा एक्सप्रेस वेगानं स्थानक सोडत होती. यामध्ये हावडा एक्सप्रेसला थांबवण्यासाठी स्टेशन मास्टरला क्षणभरही वेळ मिळाला असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं ती गाडी कोरोमंडलच्या घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली.

      रेल्वेगाड्यांमध्ये न बसवल्या गेलेल्या कवच या धडकविरोधी यंत्रणेचाही मुद्दा प्रसारमाध्यमांनी लावून धरला आहे. पण या दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये कवच यंत्रणा जरी बसवलेली असती, तरी अशा प्रकारचा अपघात ती टाळू शकली असती असं वाटत नाही.

      सिग्नल यंत्रणेतील बिघाड किंवा कवचचा अभाव यापेक्षा रुळांच्या, विशेषत: सांध्यांच्या नियमित देखभालीतील अभावामुळे झाला असावा असं वाटत आहे. हा अपघात झाला तो मार्ग दक्षिण-पूर्व रेल्वे विभागाच्या अखत्यारित येतो. या विभागात भारतामधली सर्वाधिक मालगाड्यांची वर्दळ होत असते आणि प्रवासीगाड्यांचीही संख्या लक्षणीय आहेच. त्यामुळे लोहमार्गांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेला मोकळा वेळ अतिशय कमी मिळत असतो. त्यातच गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय रेल्वे संरक्षा कोषमधील निधीही इतरत्र वापरला जात आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर होत आहे. अलीकडच्या काळात रुळांची, इंजिनं-डब्यांच्या देखभालीपेक्षा, आधुनिकीकरणापेक्षा चकचकीतपणा आणि अनावश्यक बाबींवरील खर्चाचं महत्व वाढलेलं आहे. त्याचा परिणाम अशा प्रकारच्या अपघातांमधून दिसत आहे.  याबाबत भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षकांच्या अहवालातही स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षभरात गाड्या रुळावरून घसरून झालेल्या अपघातांची संख्या एकूण अपघातांमध्ये 77 टक्के राहिली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा