एक दिवस अचानक....

         ही गोष्ट आहे ठीक 25 वर्षांपूर्वीची. मी कॉलेजमध्ये शिकत होतो. संध्याकाळ झाली होती. घरी आम्ही सगळे नेहमीप्रमाणेच सातच्या मराठी बातम्या बघण्यासाठी टी. व्ही.च्या समोर एकवटलो होतो. बातम्या सुरू झाल्या आणि पहिलीच बातमी ऐकून मला प्रचंड रोमांचित व्हायला झालं. कारण अशा प्रकारची बातमी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली होती. ती बातमी होती ‘ऑपरेशन शक्ती’अंतर्गत भारतानं पोखरणमध्ये घेतलेल्या अणुचाचण्यांची. 11 मे 1998 ला पोखरणच्या वाळवंटात दुपारी पावणेचार वाजता 3 अणुचाचण्या घेतल्या होत्या. आजही ते क्षण आठवले की रोमांचित व्हायला होतं. त्यामुळंच पोखरणमध्ये अणुचाचण्या घेतल्याची बातमी ऐकताच मी ठरवून टाकलं, “उद्या मित्रांना माझ्याकडून पार्टी!”

एकाही देशाला काहीही पत्ता लागू न देता भारतानं घेतलेल्या या चाचण्यांमुळं संपूर्ण जगच चक्रावून गेलं होतं. भारतानं हे कसं आणि का घडवून आणलं त्याचीही माहिती नंतरच्या काळात माध्यमांमधून, व्याख्यानांमधून समोर येत राहिली. या चाचण्यांनंतर लगेचच भारताच्या विरोधात जगभरातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या, तसे भारतातही त्या चाचण्यांच्या विरोधात सूर उमटू लागले होते. पण त्या प्रतिक्रियांपेक्षा या चाचण्यांसंबंधीच्या बातम्यांमध्ये मला जास्त रस वाटत होता.

भारतानं घेतलेल्या या अणुचाचण्यांच्या आधी 18 मे 1974 ला पहिली अणुचाचणी घेतली होती. भारताची सुरक्षा, तिच्यासमोरची आव्हानं, भारताची नि:शस्त्रीकरणाविषयीची भूमिका, भारताला 98 मध्ये अणुचाचण्या घेण्याची गरज का भासली या सर्वांबद्दल पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमाच्या काळात माहिती मिळत गेली. त्यानंतर या घडामोडींवर मला कुठंतरी लिहावं वाटत होतं. मग आमच्या कॉलेजच्या वार्षिक अंकात पोखरणच्या अणुचाचण्यांवरचा माझा लेख प्रकाशित झाला होता. तो काळ म्हणजे माझ्या लेखन कारकीर्दीची अगदी सुरुवात होती. मी काही लिहिलं आहे आणि ते कुठंतरी छापून आलंय अशी ही दुसरीच वेळ होती. त्याचाही मला खूप आनंद झाला होता. माझ्या त्या लेखाची स्कॅन्ड फाईल खाली जोडलेली आहे.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा