प्रादेशिक सहकार्यासाठी ‘क्वाड’ (भाग-1)

QUAD Leaders Summit 2023 (Photo-PIB)


जपानमधील हिरोशिमामध्ये 20 मे 2023 ला क्वाडची तिसरी शिखर परिषद (QUAD Leaders’ Summit) पार पडली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियपंतप्रधान अँथनी अल्बानीज, जपानी पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अमेरिकन राष्ट्रपती जोसेफ बायडेन सहभागी झाले होते. आधीच्या नियोजनानुसार ही परिषद ऑस्ट्रेलियात पार पडणार होती, पण देशातील बिकट आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांना जपानमधील जी-7 च्या शिखर परिषदेनंतर तातडीने मायदेशी परतावे लागणार होते. त्यामुळे क्वाडची शिखर परिषद ऑस्ट्रेलियाऐवजी हिरोशिमामध्येच पार पडली. 2024 मधील क्वाडची शिखर परिषद भारतात होणार आहे.

यावेळच्या क्वाड परिषदेत सहभागी राष्ट्रांमधील समान असणारी लोकशाही मूल्ये आणि धोरणात्मक हितसंबंधांची पुष्टी झाली. या परिषदेमध्ये हिंद-प्रशांत क्षेत्र खुले, मुक्त आणि सर्वसमावेशक असावे या आपल्या दृष्टीकोनाचा पुनरुच्चार करण्यात आला. त्याच्या अनुषंगाने, या क्षेत्रातील सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडत्व आणि वादविवादांचे शांततापूर्ण निराकरण ही त्वे अबाधित राखण्यासाठीही बांधिलकी व्यक्त करण्यात आली. शिखर परिषदेनंतर "हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी शाश्वत भागीदारीहे क्वाड राष्ट्रप्रमुखांच्या संकल्पांचे संयुक्त निवेदन जारी केले गेले.

हिंद-प्रशांत क्षेत्राची समृद्धी आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता बळकट करण्यासाठी, या क्षेत्राच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांना पूरक ठरणाऱ्या पुढील उपक्रमांची, या नेत्यांनी घोषणा केली:

A. Clean Energy Supply Chains Initiative म्हणजेच स्वच्छ ऊर्जापुरवठ्याची साखळी निर्माण करणारा उपक्रम. या उपक्रमामुळे संशोधन, विकास सहजतेने करता येतील आणि हिंद-प्रशांत क्षेत्रामधील ऊर्जा संक्रमणाला (पारंपरिक ऊर्जेचा वापर टाळून किंवा कमी करून अपारंपरीक ऊर्जास्रोतांकडे वळणे) बळ मिळेलत्यामुळे या क्षेत्रातील स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळीच्या विकासासाठी, स्वच्छ ऊर्जापुरवठा साखळीच्या क्वाड तत्त्वांना मान्यता देण्यात आली.

B. या क्षेत्रातील धोरणकर्ते आणि व्यावसायिकांना, आपापल्या देशांत टिकाऊ आणि व्यवहार्य पायाभूत सुविधांची रचना, निर्मिती आणि व्यवस्थापन याकरता पाठबळ पुरवण्यासाठी QUAD Infrastructure Fellowship Programme हा पायाभूत सुविधा छात्रवृत्ती कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

C. रचनात्मकता, उत्पादन, समुद्राखालून केबल जोडण्या टाकणे आणि त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, यामधील क्वाडच्या सामूहिक कौशल्याचा फायदा घेण्यासाठी, या जोडण्यांचे जाळे सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, केबल जोडण्यांची कामे आणि त्यातील कुठल्याही परिस्थितीला सामावून घेणाऱ्या लवचिकतेसाठी भागीदारी निर्माण करण्याचे ठरले आहे.

D. प्रशांत क्षेत्रात पहिल्यांदाच, पलाऊमध्ये, थोड्या प्रमाणात ORAN (ओपन रेडिओ अॅक्सेस नेटवर्क) हे रेडिओ लहरी प्राप्त करण्याचे जाळे तैनात करण्यासाठी क्वाडचे पाठबळ मिळणार आहे. खुल्या, आंतरपरिचालन करणाऱ्या आणि सुरक्षित दूरसंचार उपक्रमांमधील उद्योग गुंतवणुकीला समर्थन देण्यासाठी ORAN सुरक्षा अहवालही जारी करण्यात आला आहे.

E. QUADInvestors’ Network क्वाडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे जाळे, धोरणात्मक तंत्रज्ञानातील गुंतवणूक सुलभ करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील व्यासपीठ म्हणून सुरू करण्यात आले आहे.

F.  गेल्या वर्षी टोकियोत झालेल्या क्वाड शिखर परिषदेत घोषित केलेल्या, सागरी क्षेत्रातील जागरूकतेसाठी हिंद-प्रशांत क्षेत्रातील भागीदारीअंतर्गत आग्नेय आणि प्रशांत क्षेत्रातील भागीदारांमध्ये माहितीची देवाणघेवाण सुरू आहे आणि त्यात लवकरच हिंद महासागर क्षेत्रातील भागीदारांचा समावेश केला जाईल. या क्षेत्रात मागणीनुसार विकासातील सहकार्यासाठी भारताचा असलेला दृष्टिकोन, या सर्व प्रयत्नांना कसा हातभार लावत आहे यावर पंतप्रधान मोदी यांनी प्रकाश टाकला. संयुक्त राष्ट्र संघटना, तिची सनद आणि संयुक्त राष्ट्रांच्या वेगवेगळ्या संस्था यांच्यातील एकजिनसीपणा जपण्याच्या गरजेवर, क्वाड देशांनी सहमती दर्शवली. UNSC म्हणजेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सदस्यत्वाच्या, कायमस्वरूपी आणि हंगामी अशा दोन्ही श्रेणींमध्ये विस्तारासह बहुपक्षीय प्रणाली मजबूत करणे आणि तिच्यात सुधारणा घडवून आणणे, यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवण्यावर त्यांनी सहमती दर्शवली.

या परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी राखण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून क्वाड समूहाची गरज आता अधोरेखित झाली आहेहिंद-प्रशांत क्षेत्र हे जागतिक व्यापार, नवोन्मेष (Innovation) आणि विकासाचे इंजिन आहे. हिंद-प्रशांत क्षेत्राची सुरक्षितता यश केवळ या क्षेत्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्वाचे आहे. रचनात्मक कार्यक्रमासह आणि सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारे आपण पुढे जात आहोत. संयुक्त प्रयत्नांमधून आपण मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राच्या आपल्या ध्येयाला व्यावहारिकतेची जोड देत आहोत. पर्यावरण संरक्षण, आपत्ती निवारण, धोरणात्मक तंत्रज्ञान, विश्वासार्ह पुरवठा साखळ्या, आरोग्य सुरक्षा, सागरी सुरक्षा, दहशतवादाचा बिमोड अशा अनेक क्षेत्रांत आपले सकारात्मक सहकार्य वाढत आहे. अनेक देश आणि समूह त्यांच्या हिंद-प्रशांत क्षेत्रासंबंधीच्या ध्येयधोरणाची रणनीतीची घोषणा करत आहेत. हा क्वाड समूह जागतिक कल्याण, मानवकल्याण, शांतता आणि समृद्धीसाठी सदैव कार्यरत राहील याची मला खात्री आहे.

क्वाडची वाटचाल

      क्वाडमुळे समान विचारांच्या देशांना परस्पर हिताच्या प्रकल्पांमध्ये देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली आहे. क्वाडमध्ये सहभागी असलेल्या चारही देशांना या निमित्ताने संवादासाठीचे एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मात्र या गटाकडे अन्य एखाद्या गटाचा स्पर्धक किंवा एखाद्या गट किंवा देशाचा विरोधातील आघाडी असे पाहिले जाऊ नये, असे या गटाचे मत आहे. खुल्या आणि मुक्त हिंद-प्रशांत क्षेत्राबाबत या चारही देशांचा समान दृष्टिकोन आहे. हे सर्व देश या क्षेत्रातील विकास आणि आर्थिक प्रक्रियेत सहभागी झालेले असून सागरी परिस्थितीविषयक जागरुकता (Maritime Domain Awareness) आणि सागरी सुरक्षेला प्रोत्साहन देण्याबाबत आग्रही आहेत.

      हिंद-प्रशांत क्षेत्रातील झपाट्याने बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 2017 नंतर क्वाडच्या नियमित बैठका होत आहेत. अलीकडील काळात क्वाडची संकल्पना मूळ धरू लागली असल्याने भविष्यात तिचा विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोव्हिड-19 साथीच्या विरोधातील प्रयत्नांच्या निमित्ताने क्वाड+ देश एकत्रितपणे सहकार्य करू लागले आहेतच.

सप्टेंबर 2019 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान यांच्यात मंत्रिस्तरीय ‘चतुष्कोनी सुरक्षा संवादा’मध्येही (Quadrilateral Security Dialogue) संरक्षणविषयक चर्चा झाली होती. त्यानंतर ‘राष्ट्रीय तपास संस्थे’ने (एनआयए) 21 व 22 नोव्हेंबर 2019 दरम्यान ‘क्वाड’ देशांबरोबर पहिल्या दहशतवादविरोधी सरावांचे (CT-TTX, Counter Terrorism Table Top Exercise) आयोजन केले. या सरावांमुळे सर्व देशांना त्यांच्या दहशतवादविरोधी व्यवस्थांचे मूल्यांकन करता आले, तसेच या बाबतीत सहकार्य वाढीसाठी नव्या संधींचा शोध घेतला.

(क्रमश:)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा