12 एप्रिल 2023 च्या लोकमतमध्ये प्रकाशित झाेला माझा लेख. |
पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस 12 एप्रिल 2023
रोजी 45 वर्षांची होत आहे. या कालखंडात तिच्यात अनेक बदल होत गेलेले आहेत.
मुंबई-पुण्यादरम्यान धावणाऱ्या ऐतिहासिक पुना मेलचा प्रवास आधी मिरज आणि नंतर
कोल्हापूरपर्यंत वाढवला गेला होता. त्यामुळे मुंबई-पुण्यासाठी स्वतंत्र गाडी सुरू
करावी अशी मागणी होत होती. ती मागणी 12 एप्रिल 1978 रोजी सिंहगड एक्सप्रेसच्या
रुपाने पूर्ण झाली. ‘सिंहगड’ पुण्या-मुंबईसाठी समर्पित अशी या
मार्गावरची तिसरी गाडी ठरली होती.
सिंहगड एक्स्प्रेस त्यावेळी वैशिष्ट्यपूर्ण
ठरली ती तिला जोडण्यात येणाऱ्या दुजली (Double Decker) डब्यांमुळे. सकाळी लवकर पुण्याहून निघून
मुंबईला पोहचणे शक्य झाल्यामुळे ही गाडी लगेचच लोकप्रिय झाली. पण डबल डेकर
डब्यांमध्ये खालच्या मजल्याच्या सीट दोन्ही बाजूंच्या चाकांच्या मधल्या भागात आणि
रुळांच्या अगदी जवळ असल्यामुळे चाकांचा आवाज आणि धूळ यांचा मोठा त्रास प्रवाशांना
होत होता. त्यामुळे पुढे सिंहगड एक्सप्रेसला डबल डेकर डब्यांच्या जागी सामान्य
डबेच जोडले जाऊ लागले. तो या गाडीमध्ये झालेला पहिला मोठा बदल ठरला.
सिंहगड एक्सप्रेस सकाळी सहा वाजून पाच
मिनिटांनी पुण्याहून निघत असल्यामुळे प्रवाशांच्या चहा-नाश्त्याच्या सोईसाठी तिला
पँट्री कार जोडली जात होती, ज्यातून गरमागरम ताजे पदार्थ प्रवाशांना पुरवले जात
होते. पण रेल्वेच्या बदललेल्या नियमानंतर ‘सिंहगड’
पँट्री कारशिवाय धावू लागली आहे.
कोव्हीड-19 नंतर सिंहगड एक्सप्रेस पुन्हा सुरू झाली, तेव्हापासून या
गाडीची मुंबईहून निघण्याची वेळ दुपारी 2.35 ऐवजी संध्याकाळी 5.50 करण्यात आली आहे.
हा या गाडीमध्ये झालेला तिसरा मोठा बदल.
‘सिंहगड’ला आता अत्याधुनिक एलएचबी डबे जोडले जात आहेत. पण त्यामुळे तिच्या डब्यांची आणि आसनांची संख्या कमी झाली आहे. परिणामी या गाडीच्या आरक्षित डब्यांमध्ये इतर प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. म्हणून या गाडीच्या डब्यांची संख्या वाढवावी, अशी जोरदार मागणी प्रवासी करत आहेत. सध्या तरी काही तांत्रिक अडचणींमुळे ‘सिंहगड’चे डबे वाढविणे शक्य होत नाही आहे. पण एक मात्र नक्की की, आज प्रवासाची अन्य साधने उपलब्ध असली तरीही ‘सिंहगड’ अजूनही लोकप्रिय आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा