जुना राजवाडा, बेलग्रेड (फोटो-Wikipedia) |
पूर्वीच्या युगोस्लाव्हियाच्या आणि आताच्या
सर्बियाच्या राजधानीत असलेल्या जुन्या राजवाड्यात आज बेलग्रेडची महानगरपालिका
भरते. सर्बिया प्रांतानं 19व्या शतकाच्या शेवटी स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं. पण त्याच्याही
कित्येक वर्षे आधी म्हणजे 1394 मध्ये
बाल्कन प्रदेशातील स्लाव्ह वंशियांचा तुर्कांनी पराभव केला आणि त्यानंतर बरीच
वर्षे हा प्रदेश आधी ओटोमन आणि त्यानंतर ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याचा भाग राहिला
होता. सर्बियानं 1817 मध्ये ओटोमन साम्राज्यापासून स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर
सत्तेत आलेलं ओब्रेनोविच (Obrenovic) राजघराणं
1842 पर्यंत आणि नंतर परत 1858 ते 1903 दरम्यान गादीवर राहिलं होतं. या घराण्यानं आपल्या
वास्तव्यासाठी 1882 ते 1884 दरम्यान एक भव्य राजवाडा बांधून घेतला, तोच आजचा जुना
राजवाडा. त्याचं आरेखन ॲलेक्सांदर
बुगार्स्की यानं केलं होतं.
दोन्ही महायुद्धांमध्ये या राजवाड्याचं बरंच
नुकसान झालं होतं. याच्या आतील बाजूला ओक वृक्षाच्या लाकडापासून बनवलेले आकर्षक
जिने पहिल्या महायुद्धात पूर्णपणे नष्ट झाले होते. त्यानंतर 1930 मध्ये मोठ्या
प्रमाणात पुनरुज्जीवित केलेल्या जुन्या राजवाड्याचं दुसऱ्या महायुद्धात पुन्हा
अपरिमित नुकसान झालं. पण महायुद्धानंतर 1947 मध्ये या राजवाड्याचं थोड्या
प्रमाणातच पुनरुज्जीवन करण्यात आलं होतं. त्यावेळी मूळच्या आरेखनातील अनेक
वैशिष्ट्ये काढून टाकली गेली, जसं की, उद्यानाच्या बाजूचे राजवाड्याचे दोन्ही घुमट
हटवले गेले. तसंच राजवाड्याची दर्शनी बाजूही बदलली गेली.
जुन्या राजवाड्यात 1919-20 मध्ये पहिल्या
महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या हंगामी नॅशनल असेंब्लीच्या बैठका होत असत. 1922
पर्यंत हाच राजवाडा राजघराण्याचं मुख्य निवासस्थानही होता. पुढं 1941 पर्यंत इथं
राजघराण्याच्या विशेष समारंभांबरोबरच सर्बियाच्या भेटीवर आलेल्या अतिविशिष्ट
व्यक्तींचे स्वागत समारंभ होत असत.
दुसऱ्या महायुद्धानंतर मार्शल टिटो यांच्या
प्रयत्नानं 25 नोव्हेंबर 1945 ला बाल्कन प्रदेशातील विविध प्रांतांचं एकीकरण होऊन Socialist Federal Republic of Yugoslavia स्थापन
झाला. त्यानंतर तत्कालीन राजा पीटर (दुसरा) याला युगोस्लाव्हियातून हद्दपार
करण्यात आलं आणि त्याबरोबरच सर्बियातील राजेशाहीचा अस्त झाला. त्यानंतरच्या काही
काळासाठी जुना राजवाडा युगोस्लाव्ह संघराज्याचं मुख्यालय बनला होता. पण 1961 पासून
या राजवाड्यात बेलग्रेडची महानगरपालिका भरत आहे.
जुन्या राजवाड्याची इमारत चौरसाकृती असून
19व्या शतकात सर्बियात बांधली गेलेली ही सर्वात आकर्षक वास्तू ठरली होती. या
इमारतीनं सर्बियामध्ये नव्या पद्धतीच्या वास्तुरचनेचा पाया घातला होता. इमारतीच्या
दर्शनी बाजूला व्हरांडे असून त्यांना नक्षीदार कठडे करण्यात आलेले आहेत. याच
बाजूला डोरीक शैलीच्या स्तभांच्या दरम्यान मोठ्या खिडक्या केलेल्या आहेत.
राजवाड्याच्या समोरच्या बाजूला एक बगीचाही आहे. राजवाड्याच्या मध्यभागी असलेल्या
मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मध्यवर्ती कक्ष येतो. हा कक्ष 130 चौरस मीटर
क्षेत्रफळाचा असून त्याच्या भोवतीनं व्हरांडे, उंच स्तंभ आणि राजवाड्यातील अन्य
कक्ष आहेत. त्यांच्यापैकी Great Hall हा सर्वात मोठा कक्ष असून तिथं पूर्वी अनेक स्वागत समारंभ होत असत.
याच इमारतीत ग्रंथालय आणि उद्यानाकडच्या बाजूला छोटंसं चर्च आहे. जुन्या
राजवाड्यात बसवण्यात आलेली विविध प्रकारची उपकरणं प्रामुख्यानं व्हिएन्नाहून
आणलेली होती.
तांबड्या दिवाणखान्यात सुंदर भित्तिचित्रे
लावलेली आहेत. तसंच बेलग्रेडच्या भेटीवर आलेल्या विविध परदेशी शिष्टमंडळांकडून
मिळालेल्या भेटवस्तूही तिथं ठेवण्याची सोय करण्यात आली होती. राजवाड्यामधला आणखी
एक कक्ष आहे पित कक्ष. पोप जॉन (आठवे) यांनी 16 एप्रिल 878 मध्ये लिहिलेल्या
पत्राची हुबेहुब दुय्यम प्रत इथं जतन करून ठेवण्यात आलेली आहे. या कक्षातही अनेक
तैलचित्रं लावलेली असून लाकडाच्या शिल्पकृतीही ठेवलेल्या आहेत.
राजवाड्यामधला गाला हॉल हा सुमारे 230 चौरस मीटर क्षेत्रफळाचा असून त्यातील भिंतीच्या वरच्या बाजूला असलेल्या खिडक्यांना रंगीत काचा बसवलेल्या आहेत. कक्षाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना खास फ्रांसहून आणलेली आकर्षक पितळी झुंबरं लावलेली आहेत. तसंच सर्पाकृती ॲशट्रे, पुष्पपात्रंही इथं आहेत.
पराग,, तु बेलग्रेड येथील राजवाड्या बद्दल खुप छान आणि छान वर्णन केले आहेस
उत्तर द्याहटवापराग,तू लिहिलेले वर्णन वाचून पुन्हा बेलग्रेडला गेल्यासारखे वाटले
उत्तर द्याहटवाअप्रतिम वर्णन केले आहे.
उत्तर द्याहटवाGOOD GOOD GOOD
उत्तर द्याहटवा