Aero India 2023 मध्ये सहभागी झालेली अमेरिकेची बी-1बी विमानं (फोटो-पीआयबी) |
अलीकडेच बेंगळुरूजवळच्या यलहंका हवाईतळावर पार पडलेल्या Aero India 2023 हवाई प्रदर्शनात अमेरिकेच्या बी-1बी या व्यूहात्मक बाँबफेकी (Strategic Bomber) विमानांनी अचानक लावलेली हजेरी आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या एफ-35 लाटनिंग-2 या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांनी त्यात घेतलेला सहभाग या विशेष लक्षवेधक घटना ठरल्या. याच प्रदर्शनात रशियाच्या UnitedAircraft Corporation नं असं जाहीर केलं की, या कंपनीनं आपल्या नव्या Tu-160M या व्यूहात्मक बाँबफेकी विमानाचे नामांतर तेरेश्कोव्हा/Tereshkova (रशियन नाव – Tерешкова, रशियन उच्चार – तिरिष्कोवा) असं केलं आहे. ही विमानं मात्र एअरो इंडियामध्ये सहभागी झाली नव्हती.
बी-1बी आणि टीयू-160एम या
विमानांचा समावेश जगातील प्रमुख Strategic Bombers मध्ये होतो. सध्या रशिया, अमेरिका आणि चीन या
तीनच देशांकडे अशी विमानं आहेत. बदलत्या सुरक्षाविषयक परिस्थितीत भारतही आता अशी विमानं हवाईदलात सामील
करण्याच्या विचारात आहे. एअरो इंडियात सहभागी होण्यासाठी बी-1बी लान्सर
या स्वनातीत अवजड बाँबफेकी (supersonic heavy strategic bomber)
विमानांनी प्रशांत महासागरातील गुआममधील अमेरिकन हवाईदलाच्या अँडरसन तळावरून
उड्डाण केलं होतं. गेल्या एअरो इंडियामध्येही हे विमान सहभागी झालं होतं. अमेरिकेच्या
महावाणिज्यदुताच्या मते, भारताबरोबरच्या अमेरिकेच्या वाढत्या व्यूहात्मक
भागीदारीचं (strategic partnership) महत्व या विमानानं या प्रदर्शनात पुन्हा एकदा सहभागी होऊन अधोरेखित केलं
आहे.
अमेरिकेच्या
हवाईदलात असलेलं बी-1बी हे आधीच्या बी-1 विमानाची सुधारित आवृत्ती आहे. हे आकार आणि वहन क्षमतेच्या दृष्टीनं जगातील सर्वात मोठं लढाऊ विमान आहे. बी-1बी हे विमान पारंपारिक शस्त्रास्त्रं मोठ्या प्रमाणात वाहून
नेऊ शकतं. रडारच्या
नजरेपासून लांब राहू शकणारे हे विमान उंचावरून उडत असताना 1.25 मॅकचा वेग (ताशी सुमारे
1325 किमी) गाठू शकते. हे विमान त्यावरील शस्त्रास्त्रं, इंधन यांसह जास्तीत जास्त
216 टन वजन घेऊन उडू शकते. रशियन मिग-31 वरच्या रडारच्या नजरेपासून दूर
राहण्यासाठी बी-1बीवरच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणात
सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
बी-1 विमानाच्या विकासाचा कार्यक्रम 1982 मध्ये सुरू झाला होता. ऑगस्ट 2019
मध्ये बी-1बीमध्ये सुधारणा करून त्याची शस्त्रास्त्रवहन क्षमता वाढवली गेली. त्यामुळं
आता या विमानातून 2300 किलो वजनाची हायपरसॉनिक क्षेपणास्त्रंही वाहून नेता येऊ
शकतात. हे विमान अण्वस्त्र हल्ल्यासाठीही उपयोगी ठरतं. अमेरिकन हवाईदलासाठी नवीन व्यूहात्मक
बाँबफेकी विमानांचा – B-21 –
विकास केला जात आहे. ते विमान हवाईदलात सामील झाल्यानंतर बी-1बी आणि आधीच्या B-52 Stratofortress विमानांना हळुहळू सेवानिवृत्त
केलं जाणार आहे.
18 फेब्रुवारी 2023 ला उत्तर कोरियानं डागलेलं
आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Inter-continental Ballistic Missile) जपानच्या सागरी
क्षेत्रात पडलं होतं. उत्तर कोरियाच्या त्या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी
अमेरिकेनं तातडीनं जपान आणि दक्षिण कोरियाच्या हवाईदलांसोबत संयुक्त सराव केला.
त्यामध्ये बी-1बी विमानं सामील झालेली होती. उत्तर कोरियानं काही आगळीक करण्याचा
प्रयत्न केलाच, तर अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांकडून त्याला किती तातडीनं
प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं, हे दर्शवण्यासाठी हे सराव केले गेले होते.
रशियाचे तेरेष्कोवा (स्रोत - File:Tupolev Tu-160 RF-94109.jpg - Wikipedia)
तेरेष्कोवा/ टीयू-160एम (TU-160M)
टीयू-160एम हे विमान रशियन एअरोस्पेस
फोर्सेसकडं नुकतंच सुपूर्द करण्यात आलं आहे. आधीच्या टीयू-160 विमानाचं
अत्याधुनिकीकरण करून ही आवृत्ती विकसित करण्यात आलेली आहे. त्यात आणखी सुधारणा
करण्यात येत असून टीयू-160एम2 ही नवी आवृत्तीही काही वर्षांमध्ये रशियन एअरोस्पेस
फोर्सेसमध्ये सामील होणार आहे.
टीयू-160एम हे जगाच्या लष्करी वैमानिकी
इतिहासातील सर्वात मोठं, सर्वात वजनदार, स्वनातीत विमान आहे. व्हॅलेंटिना
तेरेष्कोवा (रशियन भाषेतील नाव – Валентина Терешкова/वल्येंचिना
तिरिष्कोवा) या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत. त्यांचे नाव या विमानाला देण्यात
आलं आहे. हे
विमान रशियन एअरोस्पेस फोर्सेसच्या दीर्घपल्ल्याच्या बाँबफेकी ताफ्याचा आधार असणार
आहे.
|
बी-1बी |
तेरेष्कोवा |
पल्ला |
12,000 किलोमीटर |
12,300 किमी |
युद्ध पल्ला |
साडेपाच हजार
किलोमीटर |
2,000 ते
7,500 किमी |
जास्तीत जास्त
उंचीवरून उडण्यास सक्षम |
18,000 मीटर |
16,000 मी. |
शस्त्रास्त्र
वहनक्षमता |
सुमारे 67 टन |
सुमारे 45 टन |
लांबी |
44.81 मी. |
54.1 मी. |
उंची |
10.36 मी. |
13.1 मी. |
शस्त्रास्त्र
आणि इंधनासह एकूण वजन |
216.3 टन |
275 टन |
वेग |
1324 किमी/तास |
2,220
किमी/तास |
सर्वाधिक वेग |
1.25 मॅक |
2.05 मॅक |
टीयू-160एम आणि बी-1बी ही दोन्ही विमानं
1980च्या दशकामधली शीतयुद्धकालीन गरज लक्षा घेऊन विकसित करण्यात आली होती. त्यामुळे
शत्रूच्या प्रदेशावर टेहळणी, वेळप्रसंगी शत्रूवर मोठ्या पारंपारिक शस्त्रसाठ्यासह
हल्ला आणि आण्विक हल्ल्याच्या हेतूनं ही विमानं विकसित केली गेली होती. पण या
विमानांच्या विकासाच्या काळातच सोव्हिएट संघ आणि अमेरिका यांच्यात आपापल्या
ताफ्यांमधली व्यूहात्मक शस्त्रास्त्रं कमी करण्यासाठी चर्चा सुरू झाली होती. अनेक
वर्षे चाललेल्या त्या चर्चेला 1991 मध्ये यश आलं आणि दोन्ही देशांमध्ये पहिली व्यूहात्मक
शस्त्रास्त्रे कपात संधी म्हणजेच Strategic Arms Reduction Treaty (START-1) झाली. त्यानंतरच्या 1993 च्या START-2 मधल्या तरतुदींनुसार
रशिया आणि अमेरिका यांनी आपापल्या हवाईदलातील व्यूहात्मक शस्त्रास्त्रवाहक बाँबफेकी
विमानांवरील (Strategic Bomber) अण्वस्त्रविषयक यंत्रणा
काढून टाकल्या. याच संधीचा पुढचा टप्पा 2010 मध्ये करण्यात आलेला New START
or START-3 हा होता. जो बायडेन यांनी अमेरिकेचं राष्ट्रपतिपद
स्वीकारल्यावर New START ला 5 वर्षांची मुदतवाढ देण्याला
अमेरिकेनं मंजुरी दिली.
उत्तम लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाछान माहिती.
उत्तर द्याहटवा