वागीर आणि पाणबुड्यांसाठी AIP यंत्रणा

वागीर पाणबुडीचं भारतीय नौदलात सामिलीकरण

         ‘डीसीएनएस’ या फ्रेंच कंपनीबरोबर झालेल्या ‘तंत्रज्ञान हस्तांतर’ करारानुसार भारतात ‘प्रकल्प-75’अंतर्गत कलवरी वर्गातील पाणबुड्या बांधल्या जात आहेत. फ्रांसमध्ये या पाणबुड्या ‘स्कॉर्पीन’ (Scorpene) या नावानं ओळखल्या जात आहेत. या ‘प्रकल्प-75’मधील पाचव्या पाणबुडीचं – वागीरचं – 23 जानेवारी 2023 ला नौदलात सामिलीकरण झालं आहे. त्याचवेळी पाणबुड्यांना अधिक काळ पाण्याखाली राहता यावं यासाठी त्यांच्यावर AIP यंत्रणा बसवण्यासंबंधीचाही करार करण्यात आला आहे.

पाणबुड्यांसाठी स्वदेशी AIP यंत्रणा

मुंबईच्या माझगाव गोदीत बांधल्या जात असलेल्या कलवरी (Kalvari) वर्गातील पाच पाणबुड्या भारतीय नौदलात आता सामील झालेल्या असून शेवटची पाणबुडी येत्या वर्षभरात नौदलात सामील होईल. या श्रेणीतील पाणबुड्या जगातील अत्याधुनिक, शत्रूच्या नजरेपासून दूर राहू शकणाऱ्या हल्लेखोर डिझेल-इलेक्ट्रीक पाणबुड्या (Stealth Diesel-Electric Attack Submarine) मानल्या जातात. सागरी प्रदेशावर टेहळणी करतानाच शत्रुच्या प्रदेशावर नजर ठेवून त्यांच्यावर अनपेक्षितपणे प्रभावी हल्ला चढवण्याची या पाणबुड्यांमध्ये क्षमता आहे. मात्र भारतीय नौदलात सामील होत असलेल्या ‘स्कॉर्पीन’ पाणबुड्यांवर ‘Air Independent Propulsion’ (एआयपी) यंत्रणा बसवलेली नसल्यामुळं त्यांना बॅटरी चार्ज करण्यासाठी दर 4-5 दिवसांनी पाण्याच्या पृष्ठभागावर येणं आवश्यक ठरतं. परिणामी पाणबुडीला शत्रूच्या नजरेपासून अधिक काळ दूर राहण्यावर बंधनं येतात. ही मर्यादा दूर करण्याच्या हेतूनं कलवरी वर्गातील पाणबुड्यांवर ‘Fuel Cell-based AIP’ यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळं पाणबुडी पाण्याखाली असतानाच तिच्यावर ऑक्सिजन आणि हायड्रोजनची निर्मिती करता येणार आहे आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी पाणबुडीला पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याची आवश्यकता राहणार नाही. परिणामी या पाणबुड्यांना पाण्याखाली अधिक काळ राहून शत्रूवर नजर ठेवणं शक्य होणार आहे.

कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांवर बसवण्यात येणारी AIP यंत्रणा स्वदेशी बनावटीची आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) Naval MaterialsResearch Laboratory (NMRL) नं या यंत्रणेची निर्मिती केलेली आहे. त्यासाठीचा करार NMRL आणि फ्रांसच्या नेव्हल गृप यांच्यात 23 जानेवारी 2023 ला मुंबईत करण्यात आला. पण ही यंत्रणा पाणबुड्यांमध्ये बसवत असताना कलवरी वर्गातील पाणबुड्यांमध्ये काही बदल करावे लागणार आहे. त्यासाठी नेव्हल गृप NMRL ला सहकार्य करणार आहे. ही यंत्रणा पहिल्या टप्प्यात या वर्गामधल्या पहिल्या पाणबुडीवर, भा. नौ. पो. कलवरीवर (INS Kalvari) बसवली जाणार आहे.

शत्रुच्या नजरेपासून दूर राहून त्याच्या हालचाली टिपण्यासाठी, आपल्या सागरी प्रदेशाची टेहळणी करण्यासाठी आणि निर्णायक प्रतिहल्ल्यासाठी नौदलात पाणबुड्यांचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. अलीकडे चीनच्या हिंदी महासागरातील वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलातील पाणबुड्यांच्या कमतरतेमागील गांभीर्य अधिकच स्पष्ट होत आहे. पहिल्या टप्प्यात प्रोजेक्ट-75अंतर्गत फ्रांसकडून 6 स्कॉर्पीन पाणबुड्या खरेदी करण्यात येत आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात प्रोजेक्ट-75 आयअंतर्गत आणखी 6 पारंपारिक (हल्लेखोर डिझेल-इलेक्ट्रीक) पाणबुड्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्या पाणबुड्यांवरही एआयपी यंत्रणा बसवलेली असणार आहे.

वागीर - सँड शार्क

वागीर किंवा Sand Shark हा समुद्रातील वाळूत वावरणारा शार्क छुप्या कारवाया आणि निर्भयता यांचं प्रतीक आहे. याच दोन वैशिष्ट्यांचे पाणबुड्यांच्या कामगिरीशी साधर्म्य आहे. साहस, शौर्य, समर्पण हे वागीर पाणबुडीचं घोषवाक्य आहे.

(सर्व फोटो - पीआयबी)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा