सुंदर, आलिशान राजवाडे, मंदिरं, अन्य
ऐतिहासिक वास्तू आणि अभयारण्य असलेल्या राजस्थानात देश-विदेशातून लाखो पर्यटक येत
असतात. #राजस्थान म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं थरचं वाळवंट आणि त्यात संचार
करणारे उंट. कला, संस्कृती, अनेकविध रंगांची उधळण करणारे उत्सव यामुळंही
राजस्थानची ख्याती जगभर पसरलेली आहे. अशाच सुंदर राजस्थानामधलं एक सुंदर शहर आहे
बीकानेर. वायव्य राजस्थानात वसलेलं #बीकानेर शहर राजस्थानामधलं एक महत्वाचं पर्यटन
केंद्र आहे.
बीकानेरच्या परिसरामध्ये आढळणारा लाल आणि पिवळा वालुकाश्म आणि उंट या
गोष्टी या शहराला खास ओळख प्रदान करून देत आहेत. तिथं आशियामधलं सर्वात मोठं उंट
संवर्धन केंद्र आहे. जुन्या बीकानेरमधील अनेक घरं लाल वालुकाश्मातच बांधलेली आहेत.
त्यावरूनच या शहराला राजस्थानचं लाल शहर असं नाव पडलेलं आहे. बीकानेर शहरामध्ये
आणि त्याच्या आसपास अनेक पर्यटक ठिकाणं आहेत.
राव बिका राठोड यांनी 1488 मध्ये बीकानेर
राज्याची स्थापना केली होती. जोधपूर शहराचे संस्थापक राव जोधा राठोड यांचे ते
सर्वात ज्येष्ठ सुपुत्र. तोपर्यंत या परिसराला जंगलदेश म्हणून ओळखलं जायचं. त्याच्याही
पूर्वी प्राचीन काळापासून मध्य आशिया आणि गुजरातदरम्यानच्या व्यापारी मार्गावरचं ते
एक महत्वाचं शहर बनलं होतं.
देश्नोकच्या कर्णी मातेच्या आशीर्वादानं राव बिका यांनी या शहराची
स्थापना केली होती. कर्णी मातेचं देश्नोकमधलं मंदिर जगातलं असं एकमेव मंदिर आहे,
जिथं उंदराला पवित्र मानलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे या मंदिरात
प्रवेश करताच सगळीकडे उंदरांचा मुक्त संचार दिसतो. हे मंदिर बीकानेरपासून साधारण
33 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. बीकानेरचे महाराजा गंगा सिंग यांनी या मंदिराला
दान केलेला चंदेरी दरवाजाही इथं पाहायला मिळतो. गंगा सिंग यांनीच #bikaner राज्यामध्ये सिंचनासाठी गंगा कालवा बांधला होता.
बीकानेरमध्ये असलेला जुनागढ किल्ला अतिशय भव्य
आणि सुंदर आहे. याच्या बांधणीत लाल वालुकाश्म आणि संगमरवराचा प्रामुख्यानं वापर करण्यात
आलेला आहे. जुन्या शहरापासून काहीच अंतरावर उत्तर दिशेला राजा राज सिंग यांनी हा
किल्ला बांधला होता. याच्या भोवतीनं खोल खंदक खोदलेला आहे. सुरज पोल हे या
किल्ल्याचं मुख्य द्वार. या किल्ल्यात असलेल्या हर मंदिरामध्ये राजघराण्याचे विवाह
सोहळे आणि जन्म सोहळे पार पडत असत.
जुनागढ किल्लात अनुप महाल, करण महाल, बिजाई
महाल, डुंगर निवास, गंगा निवास आणि रंग महाल असे महत्वाचे राजवाडे आहेत. पण चंद्र
महाल आणि फूल महाल हे या किल्लामधले सर्वात सुंदर आणि आकर्षक राजवाडे आहेत. या
महालांमध्ये सजावटीसाठी आरसे, बारीकबारीक कलाकुसर, चित्रकला यांचा वापर केलेला
आहे. यामुळं या महालांचं अंतर्गत सौंदर्य अगदी खुलून गेलं आहे. त्याचबरोबर उंच
स्तंभ, कमानी यांचाही या महालांच्या बांधकामात समावेश करण्यात आलेला आहे. म्हणूनच
या किल्ल्याला भेट देणं हा अतिशय सुंदर अनुभव ठरू शकतो.
लालगढ राजवाडा |
गंगा सुवर्ण महोत्सव संग्रहालयात हडप्पा-पूर्व
संस्कृतीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू पाहायला मिळतात. गुप्त आणि कुशाण काळामधल्या
वस्तूही तिथं मांडलेल्या आहेत. याबरोबरच अनेक सुंदर शिल्पकृती तिथं पाहायला
मिळतात. टेराकोटा, चिनी मातीच्या वस्तू, चित्रं, जुनी हत्यारं आणि जुन्या
नाण्यांचा संग्रहही तिथं आहे. बीकानेरच्या परिसरातील खास कला आणि कलाकुसरीच्या
वस्तूंचा खजिना विशेष दालनात मांडलेला आहे.
देवी कुंड ही बीकानेरमधली शाही घराण्याची
स्मशानभूमी आहे. बीकानेर शहरापासून हे ठिकाण 8 किलोमीटरवर आहे. बीका घराण्यामधल्या
राजांच्या स्मरणार्थ तिथं अनेक छत्र्या उभारण्यात आलेल्या आहेत. त्यातील महाराजा
सुरत सिंग यांच्या छत्रीच्या छतावर राजपूत पद्धतीची चित्रकला केलेली पाहायला
मिळते.
बीकानेरच्या आसपास अनेक उद्याने आणि
अभयारण्ये आहेत. गंगा निवास सार्वजनिक उद्यान आणि प्राणिसंग्रहालय, रतन बिहारी
मंदिर उद्यान, भवन राजवाडा उद्यान आणि गजनेर अभयारण्य ही सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
गजनेर अभयारण्यात गच्च झाडी असून तिथं नीलगायी, चिंकारांचं मोठ्या प्रमाणात
वास्तव्य आहे. या अभयारण्यातच गजनेरचा राजवाडा वसलेला आहे. पूर्वी बीकानेरचे
महाराजा याचा वापर उन्हाळी निवासस्थान म्हणून करत असत. या अभयारण्यामधल्या एका
तळ्याच्या किनाऱ्यावर हा राजवाडा बांधलेला आहे. आता त्याचं हॉटेलमध्ये रुपांतर
करण्यात आलं आहे.
अशा या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण बीकानेर
शहराला पुन्हा एकदा भेट देण्याची इच्छा आहेच. मागच्यावेळी एका सहल कंपनीमार्फत
गेल्यामुळं दीड-दोन दिवसांमध्ये बीकानेर पाहताना गडबड होत होती. आता मात्र गेलो तर
स्वतंत्रपणेच जाईन.
म्हारो रंग रंगीलो राजस्थान
उत्तर द्याहटवाखरंय!
हटवाखूप छान माहिती.बिकानेरची पुन्हा सफर झाली
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूप छान माहिती.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा