Silver Trumpet and Trumpet Banner - परंपरा शंभर वर्षांची



      राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली. प्रत्येक राष्ट्रपतीच्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडणारा हा औपचारिक, शिस्तबद्ध आणि दिमाखदार समारंभ. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 14 मे 1957 ला राष्ट्रपती अंगरक्षक दलाला पहिली राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली होती. चंदेरी तुतारी देण्याच्या या प्रथेच्या 100व्या आणि राष्ट्रपती अंगरक्षक दलाच्या 250 व्या वर्षात यंदाचा हा समारंभ पार पडत होता.

      राष्ट्रपती अंगरक्षक दल (PBG) हे भारतीय भूदलाची सर्वात प्रतिष्ठीत आणि जुनी रेजिमेंट आहे. या दलाला राष्ट्रपतीची चंदेरी तुतारी आणि पताका (President’s Silver Trumpet and Trumpet Banner) प्रदान करण्यास सुरुवात झाली 1923 मध्ये. तेव्हा राष्ट्रपती अंगरक्षक दल Governor-General’s Body Guard म्हणून ओळखलं जात होतं. त्या दलाच्या स्थापनेला 1923 मध्ये 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्या दलाचा सन्मान म्हणून भारताचा तत्कालीन गव्हर्नर-जनरल लॉर्ड रीडिंग यानं या दलाला चंदेरी तुताऱ्या आणि तिच्यावर लावलेल्या पताका दिल्या होत्या. तेव्हापासून आजतागाजत ती प्रथा सुरू आहे. त्यावेळी अंगरक्षक दलाला दोन पताका प्रदान केल्या जात असत, एकावर भारताच्या गव्हर्नर-जनरलची राजमुद्रा असे, तर दुसरी पताका Star of India आणि या दलाला मिळालेल्या विविध युद्धसन्मानांचं प्रतिनिधित्व करत होती. स्वातंत्र्यानंतर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाल्यावर गव्हर्नर-जनरलच्या जागी राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आलं. त्यामुळं Governor-General’s Body Guard दलाचं नामकरण राष्ट्रपती अंगरक्षक असं झालं. त्यानंतरही चंदेरी तुतारी आणि पताका देण्याचा समारंभ सुरू राहिला, मात्र आता भारत स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक असल्यामुळं त्या पताकांमध्ये बदल करण्यात आला.

                स्वातंत्र्योत्तर काळात चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान करण्याचा समारंभ (Silver Trumpet and Trumpet Banner Ceremony) नव्या राष्ट्रपतींनी पदभार स्वीकारल्यावर काही दिवसांनी आयोजित केला जातो. त्यामुळं दर पाच वर्षांतून एकदा हा समारंभ होत असतो. या समारंभात राष्ट्रपतींसह विविध देशांचे भारतातील राजदूत आणि लष्करी प्रतिनिधी तसेच सामान्य नागरिकही सहभागी होत असतात. लष्करी शिस्तीत पार पडणाऱ्या या समारंभाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलाच्या घोडेस्वारांच्या On Parade ने होते. राष्ट्रपतींचे घोडेस्वार अंगरक्षक खास समारंभासाठीचा हिवाळी पोशाख परिधान करून राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात येतात. तगडे घोडे, लाल-शुभ्र पताका लावलेले भाले हातात घेऊन घोड्यांवर स्वार झालेले अंगरक्षक, त्यांच्या छातीवर चमकणारी पदकं आणि पार्श्वभूमीवर असलेलं ऐतिहासिक राष्ट्रपती भवन. सगळंच दृश्य मोहक असतं.

      प्रांगणात राष्ट्रपतींच्या आगमनानंतर राष्ट्रगीत होतं आणि समारंभाची औपचारिक सुरुवात होते. अंगरक्षकांकडून राष्ट्रपतींना सन्मान गार्ड (Guard of Honour) दिला गेल्यावर सगळे घोडेस्वार Hollo Square चा दिला गेल्यावर सगळे घोडेस्वार Hollo Square चा आकार करून उभे राहतात आणि अंगरक्षक दलाचा प्रमुख आणि तुतारीवाहक आपापल्या घोड्यांवरून राष्ट्रपतींच्या समोर येतात. त्यानंतर तुतारीवाहक राष्ट्रपतींकडून Silver Trumpet आणि Trumpet Banner स्वीकारतो. इथून पुढे पाच वर्ष प्रजासत्ताक दिन सोहळा, राष्ट्रपतींचं संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला होणारं संबोधन या औपचारिक समारंभांच्यावेळी राष्ट्रपतींना मानवंदना या तुतारीद्वारे दिली जाते. या तुतारीला जोडलेल्या उंची रेशमी कापडाच्या पताकेच्या मध्यावर राष्ट्रपतींच्या नावामधली आद्याक्षरं देवनागरी मोनोग्राममध्ये रेशमी धाग्यानं लिहिलेली असतात. सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावामधली द्रौमु ही आद्याक्षरं आताच्या पताकेवर भरतकामाने लिहिलेली आहेत. या पताकेच्या लाल रंगाच्या कापडावर सोनेरी धाग्यानं केलेलं नक्षीकाम अधिक उठावदार दिसत असतं. त्या पताकेवर राष्ट्रपतींच्या नावाच्या आद्याक्षरांच्या भोवतीनं भारताची राजमुद्रा, हत्ती, तराजू आणि कमळाची चित्रंही सोनेरी रेशमी धाग्यानं भरतकामाद्वारे चितारलेली असतात. ही तुतारी आणि पताका वाहण्याचा विशेष मान भारतीय भूदलातील केवळ राष्ट्रपती अंगरक्षक दलालाच आहे.

     चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान करून झाल्यावर हे घोडेस्वार राष्ट्रपतींसमोर संचलन करून त्यांना सलामी देतात. त्यानंतर राष्ट्रपती अंगरक्षक दलाच्या इतिहासाविषयी माहिती देणारी एक ध्वनिचित्रफीत दाखवली जाते. मग राष्ट्रपती अंगरक्षक दलामधले घोडेस्वार आपली घोडेस्वारीमधली कौशल्य उपस्थितांपुढं सादर करू लागतात.


      दरम्यान, या समारंभात सहभागी झालेलं लष्कराच्या तिन्ही दलांचं बँडपथक राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांवरून विविध धून सादर करत राहतं. समारंभाच्या मध्यावर हे पथकही प्रांगणात येऊन बँडच्या काही धून सादर करून जातं. अशा या दिमाखदार सोहळ्याचा समारोपही राष्ट्रगीतानं होतो.

(सर्व फोटो-पीआयबी)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा