दिवाळी विशेष – भायखळ्याचं ऐतिहासिक स्टेशन


यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख. मुंबईत अनेकवेळा जाणं झालं असलं तरी भायखळ्याला जाऊन त्या स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीला भेट देण्याची संधी अलिकडेच मिळाली होती.

भायखळा रेल्वेस्थानक भारतीय रेल्वेवरच्या सर्वात जुन्या रेल्वेस्थानकांपैकी एक. 16 एप्रिल 1853 ला आशियामधली सर्वात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदरहून ठाण्यापर्यंत धावली होती. त्या घटनेला पुढच्या वर्षी 170 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या दिवसापासूनच भायखळ्याचंही रेल्वेस्थानक अस्तित्वात आलं होतं. पहिल्या रेल्वेगाडीला जोडण्यात आलेल्या वाफेच्या इंजिनांपैकी एक चक्क भायखळ्याच्या रस्त्यावर उतरवलं गेलं होतं. त्यावेळी भायखळ्याच्या स्थानकाची इमारत म्हणजे एक साधी छोटी लाकडी शेड होती. त्यानंतर 1857 मध्ये त्या शेडच्या जागी एक दगडी इमारत उभारण्यात आली. त्या इमारतीला आता 165 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. मूळची इमारत आजही शाबूत असलेलं हे भारतामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जुनं रेल्वेस्थानक आहे. चेन्नईमधल्या रोयापुरम रेल्वेस्थानकाची इमारत भारतीय उपखंडामधली सर्वात जुनी इमारत आहे, जी तिच्या मूळच्या स्वरुपात अजूनही वापरात आहे.

1857 मध्ये उत्तर भारतात ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा सुरू झाला होता. त्याचे लोण भारतीय उपखंडात वेगानं पसरतात की काय अशी भिती ब्रिटिश सत्तेला वाटत होती. त्या पार्श्वभूमीवर अखंड, खंडप्राय भारतात लोहमार्गांचं जाळं असणं किती आवश्यक आहे, हे अधोरेखित झालं होतं. त्याचवेळी अशा आणीबाणीच्या प्रसंगी गोऱ्या लोकांना आश्रय घेता येईल अशा पद्धतीनं त्या काळी महत्वाच्या रेल्वेस्थानकांच्या इमारतींचं आरेखन केलं जाऊ लागलं होतं. भायखळ्याची इमारत ही त्याची अगदी सुरुवात वाटते. हे स्थानक बांधताना त्या मागे तसा विचार असण्याचं कारणही जाणवतं, ते म्हणजे माझगाव आणि भायखळ्याच्या जवळपासच्या परिसरात युरोपीयनांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य होतं. त्यामुळं या स्थानकाची दर्शनी बाजू पाहिली तर ही इमारती एखाद्या छोटेखानी बराकीप्रमाणं भासते.

भायखळा स्थानकात त्याकाळी युरोपियन प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ होती. त्यामुळं भायखळ्याला काही मेल/एक्सप्रेस आणि सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबत होत्या. ऐतिहासिक पुना मेल म्हणजे सध्याची महालक्ष्मी एक्सप्रेस त्यापैकीच एक. त्याचबरोबर मुंबई-सोलापूर एक्सप्रेस-कम-पॅसेंजरही इथं दोन्ही दिशांनी थांबत होती. डेक्कन एक्सप्रेस फक्त अप दिशेनं इथं थांबत होती. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनंतर सगळ्या मेल/एक्सप्रेस आणि पॅसेंजर रेल्वेगाड्यांचा भायखळ्याचा थांबा कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आणि तेव्हापासून हे स्थानक पूर्णपणे उपनगरीय वाहतुकीसाठी वापरलं जात आहे.

    16 एप्रिल 1853 ला बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गाचं उद्घाटन झालं, तेव्हा हा 33 किलोमीटरचा मार्ग एकपदरी होता. पण काही वर्षांमध्येच अप आणि डाऊन असे स्वतंत्र मार्ग सुरू करण्यात आले. ते मार्ग म्हणजे सध्याचा मंदगती मार्ग (स्लो लाईन). भायखळ्याची नवीन स्थानकाची इमारत उभारत असताना युरोपियन प्रवाशांना मुंबईच्या उन, पावसाचा त्रास होऊ नये यासाठी त्या फलाटांवर भल्यामोठ्या लोखंडी कमानी उभारून शेड टाकण्यात आली. ती शेड आपल्याला आजही एक आणि दोन नंबरच्या फलाटांवर पाहायला मिळते. त्या काळात गाड्यांना सहा-सात डबेच जोडले जात असत. त्यामुळं तेव्हाचे छोटे फलाट पुरेसे होते आणि त्यावरील शेडखाली अख्खी रेल्वेगाडी सामावली जात होती. पण मुंबईत उद्योग, शिक्षण, व्यापार इत्यादी क्षेत्रांची वाढ होत गेली, तसतशी बाहेरून मुंबईत नोकरी, शिक्षण, कामासाठी येणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत गेली. ती वाढती गर्दी सामावून घेण्यासाठी पुढे मेल/एक्स्प्रेस आणि लोकल गाड्यांचे डबेही वाढवावे लागले. त्यामुळे फलाटांची लांबी वाढवावी लागली. परिणामी जुन्या कमानदार शेडच्या बाहेर फलाट वाढत गेले. पण त्या वाढीव फलाटांवर पूर्वीप्रमाणे कमानदार शेडऐवजी साधीच शेड टाकली गेली.

पुढे छत्रपती शिवाजी महाराज (ट)पासून ठाण्यापर्यंतचा मार्ग चारपदरी झाल्यावर या फलाटांच्या बाजूलाच दोन नवे फलाट उभारले गेले. ते नवे मार्ग मेल/एक्सप्रेस आणि वेगवान (फास्ट) लोकल गाड्यांसाठी वापरले जाऊ लागले. पण त्या फलाटांवरील शेडचं डिझाईनही जुन्या फलाटांवरच्या शेडशी मिळतंजुळतं असलं, तरी त्या जुन्या शेडप्रमाणं संपूर्ण रुळ आच्छादतील अशा उभारल्या गेल्या नाहीत.

     या इमारतीला मध्यभागी तीन मोठ्या दगडी कमानींचं मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याच्यासमोर पोर्च उभारलेला आहे. पूर्वीच्या काळी श्रीमंत युरोपियन या स्थानकात येत असत, त्यांच्या घोडागाड्या आणि पुढच्या काळात मोटारगाड्या इथं उभ्या राहू शकतील, अशा पद्धतीनं हा पोर्च उभारलेला आहे. पोर्चमधून पुढं गेल्यावर एक छोटा व्हरांडा आहे आणि लगेचच रेल्वेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विविध कक्ष आहेत. या व्हरांड्यावर अतीतीव्र उताराचं छप्पर आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला इमारतीच्या छोट्या कमानदार खिडक्या पाहायला मिळतात. अशाच खिडक्या फलाटाकडच्या बाजूलाही करण्यात आलेल्या आहेत.
    पोर्चच्या समोर असलेल्या तीन मुख्य दगडी कमानींच्या या प्रवेशद्वाराजवळ आता संगणकीकृत आरक्षण केंद्र आहे. त्यापैकी मधल्या कमानीतून सरळ फलाटावर उघडणारा दरवाजाही आहे. या संपूर्ण इमारतीमध्ये असलेल्या सगळ्या कक्षांना बसवलेले जुन्या पद्धतीचे लाकडी दरवाजे आकर्षक वाटतात. सध्या पोर्चच्या बाजूला असलेल्या छोट्या दरवाज्यातून प्रवाशांना फलाटावर जाता येतं.

      काळनुरुप भायखळा स्थानकाच्या इमारतीत अनेक सुविधा दिल्या जाऊ लागल्या, त्यानुसार या इमारतीत बदल होत गेले. पण ते बदल इमारतीच्या मूळच्या स्वरुपाला शोभणारे नव्हते, त्या बदलांमुळं ही ऐतिहासिक इमारत बेढब दिसू लागली होती. म्हणूनच भायखळ्याच्या स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीचं महत्व विचारात घेऊन तिचं पुनरुज्जीवन करण्यासाठी शायना एन. सी. आणि नाना चुडासामा यांच्या मुंबई माझी लाडकी - I Love Mumbai या बिगर-सरकारी संघटनेनं (NGO) पुढाकार घेतला. पण हे करत असताना त्या इमारतीचं ऐतिहासिक स्वरुप कुठंही बदललं जाणार नाही याचीही काळजी घेतली गेली. काळानुरुप या इमारतीमध्ये जे बदल करण्यात आले होते आणि जे या इमारतीच्या सौदर्याला बाधक ठरत होते, ते अन्यत्र हलवले गेले. इमारतीच्या दर्शनी बाजूला पावसापासून संरक्षणासाठी लावलेले पत्रे बदलले गेले. आता त्यांच्या जागी कौलं बसवण्यात आली आहेत. तिकीट खिडक्यांमधील जुन्या लाकडी वस्तू बदलल्या गेल्या. इमारतीचा मधला भाग सभागृहसदृश्य अतिशय उंच असून त्यावर असलेल्या पत्र्याच्या छपराला आतल्या बाजूनं लोखंडी फ्रेमनी आधार दिलेला आहे. पूर्वी या लोखंडी फ्रेमच्या जागी लाकडी फ्रेम्स होत्या. या इमारतीत जुन्या पद्धतीचे दिवे लावून तिच्या सौंदर्यात भर घालण्यात आली आहे. आता भायखळा स्थानकाच्या या टुमदार इमारतीनं आपली ऐतिहासिक ठेवण जपत वाय-फाय, ATVMs, CCTV, अत्याधुनिक बाबीही स्वत:मध्ये सामावून घेतली आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा