AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता

      कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) म्हणजे कृत्रिम पद्धतीने विकसित करण्यात आलेली बौद्धिक क्षमता. अलीकडील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जात आहे. या बुद्धिमत्तेवर आधारलेलं यंत्र मानवाप्रमाणं स्वत: विचारही करू शकतं आणि परिस्थितीनुरुप निर्णयही घेऊ शकतं.

कृत्रिम बुद्धिमत्तेची ऐतिहासिक पार्श्वभूमी

      उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळापासून मानव आपल्या कार्यात यंत्राची मदत घेण्याचे प्रयत्न करू लागला होता. एकमेकांच्या पुढे जाण्याच्या सहज मानवी प्रवृत्तीतून स्पर्धा निर्माण होत गेली आणि मानवाकडून इतरांवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नवनवीन कल्पनांचा विकास होत गेला. त्यातूनच युद्धासाठीही विविध शस्त्रास्त्रं विकसित होत गेली. याबरोबरच आपलं आयुष्य अधिक सुखकर बनवण्याच्या इच्छेतूनही यंत्राच्या निर्मितीला आणि त्यांच्याकडून आपली कामं करवून घेण्याच्या पद्धतीला चालना मिळत गेली.

      इसवी सन पहिल्या शतकात ग्रीक वैज्ञानिक हेरोन यानं मानवाला त्याच्या कामात उपयुक्त ठरू शकणाऱ्या यंत्राचा उल्लेख केला होता. त्यानं काही यंत्र बनवलीही होती. त्यानं आपल्या ग्रंथांमध्ये 100 पेक्षा जास्त यंत्रांचं सचित्र वर्णन केलं होतं. त्यात फायर इंजिन, वाऱ्यावर संचालित होणारं ऑर्गन आणि वाफेवर चालणाऱ्या यंत्राचाही समावेश होता. ग्रीसमधील टेरेंटम या वैज्ञानिकानं वाफेवर चालणाऱ्या एका कबुतराची निर्मिती केली होती.

      भारतीय पौराणिक कथांमध्ये अशा स्वरुपाच्या यांत्रिक वस्तूंवर आधारित कथांचा समावेश आहे. ज्यूधर्मीयांच्या कथांमधील मातीच्या गोलेन, प्राचीन ग्रीक कथांमधील यांत्रिक दास ही त्या काळातील यंत्रांची काही उदाहरणं आहेत. इब्न अल-जजरी या अरब वैज्ञानिकांनं आपल्या लेखनात मानवाप्रमाणं दिसणाऱ्या आणि काम करू शकणाऱ्या यंत्रमानवाची संकल्पना सर्वात आधी मांडली होती. त्यानं मांडलेल्या संकल्पनांमध्ये शंभरपेक्षा जास्त यंत्रांमध्ये यांत्रिक चाकांचा वापर करून वेग आणि गतीचं नियंत्रण करण्याच्या पद्धतींचा समावेश होता. चीनमध्ये सु सोंग यानं 1088 मध्ये एक यांत्रिक घंटागृह उभारलं होतं.

      औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात वैज्ञानिकांनी यंत्रमानवाच्या संकल्पनेवर अधिक विस्तारानं विचार करण्यास सुरुवात केली. विज्ञानाच्या मदतीनं आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची त्यामागे प्रेरणा होती.

      जपानच्या पुढाकारानं 1970 पासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेला लोकप्रियता मिळत गेली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी जपाननं 1981 मध्ये 5th Generation Project सुरू केला होता. त्याद्वारे महासंगणकाची (Super Computer) निर्मिती करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये त्यानंतरच्या काळात एल्बी प्रकल्प हाती घेण्यात आला. तसाच कार्यक्रम (एस्प्रिट) युरोपीय संघानंही हाती घेतला होता.

यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

      यंत्रमानव (Robot) किंवा अन्य यंत्रांचे नियंत्रण मानवाकडून केलं जातं. त्यामुळं नंतरच्या काळात मानवानं त्याच्याही पुढे विचार करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये अशा यंत्रांच्या निर्मितीबाबत विचार मांडला जाऊ लागला, जी यंत्र परिस्थितीनुरुप स्वत:हून निर्णय घेऊ शकतील, जिला विविध वस्तूंविषयी मानवाप्रमाणेच संवेदनशील असेल. या दृष्टीनं 1950 नंतर संशोधन सुरू झालं. अलिकडील काळात होत असलेल्या व्यापक संशोधनामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनात प्रवेश करू लागलेली दिसत आहे. आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेले दूरचित्रवाणी संच (टी.व्ही.), धुलाई यंत्र (Washing Machine), शीतपेटी (Fridge) यांसारखी यंत्र कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणं आहेत. आपण त्यामध्ये ज्या पद्धतीनं आज्ञावली (Programming) करू, त्याप्रमाणं ती कार्यरत राहतात. त्यामुळं यंत्रमानव हे आता केवळ यंत्र राहिलेलं नसून मानवाप्रमाणं विचार, आचार करू लागले आहेत आणि वस्तूंबाबत त्यांची जाणीव वाढू लागली आहे. ही यंत्र एखाद्या घटनेवर आपलं मत देऊ लागली आहेत आणि एखाद्या घटनेचं विश्लेषणसुद्धा करू लागली आहेत. हे सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेमुळंच शक्य होत आहे.

      कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जास्तीतजास्त माहितीचं संकलन आणि तिचं अत्यंत वेगानं विश्लेषण या दोन्ही घटकांना अतिशय महत्व असते. त्यासाठी संगणक किंवा यंत्राला संलग्न केलेला processor उच्च क्षमतेचा असणे अत्यावश्यक असते.

      चालता-बोलता यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यात फरक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे संगणकशास्त्राचे सर्वात अत्याधुनिक रुप आहे. त्याद्वारे यंत्रमानव बनवला जात नाही, तर असा कृत्रिम मेंदू बनवला जातो, ज्याद्वारे संगणक स्वत: विचार करायला लागेल. हा कृत्रिम मेंदू मानवी मेंदूप्रमाणेच काम करू शकेल अशा पद्धतीनं बनवला जातो. सद्यस्थितीत स्वत:हून विचार करण्याची क्षमता सर्व सजीवांमध्ये आहे. त्यात दृष्टी क्षमता, बोलण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता यांचा प्रामुख्याने समावेश होतो. अशी क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे यंत्रात विकसित केल्यास ते यंत्र आपले आदेश ऐकू शकेल, त्यांचं विश्लेषण करू शकेल आणि त्यानंतर त्या परिस्थितीत स्वत:हून योग्य निर्णय घेऊ शकेल.

      अलिकडे कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची यंत्र बसवलेली असतात, जी अनेक माणसांची कामं कमी वेळेत करू शकतात. अलिकडे चालकरहित मोटारगाड्या ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागली आहे. या गाड्या कृत्रिम बुद्धिमत्तेचंच उदाहरण आहेत. या गाड्या स्वयंचलित आणि रस्त्यावरील परिस्थितीनुसार वाहनाचे नियंत्रण करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं मानवी मेंदूचे कृत्रिम प्रतिरुप बनवण्याचे प्रयत्न होत आहेत. हा कृत्रिम मेंदू मानवी मेंदूप्रमाणेच विचार, विश्लेषण करून निर्णय घेऊ शकेल. तो स्वत:चे तर्कही मांडू शकेल.

      फेसबुकच्या वापरकर्त्यांना त्यांच्या संभाव्य मित्रांची सूची सतत पाठवली जात असते. कधी असंही होतं की, आपण इंटरनेटवर काम करत असताना आपल्याला विविध जाहिराती अचानक स्क्रीनवर दिसू लागतात. अलिकडील काळात भ्रमणध्वनी संचाला (mobile phone) वापरकर्त्याने प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर त्या यंत्राकडून दिलं जातं. या सर्व बाबी कृत्रिम बुद्धिमत्तेचाच भाग आहेत. अलिकडे यंत्रांमध्ये ऐकण्याची, पाहण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही एखाद्या यंत्राची बुद्धिमत्ता असते. पंचेंद्रियांच्या माध्यमातून सजीवाला ज्ञान मिळत असते. पंचेद्रियांकडून आलेल्या संवेदनांची माहिती मेंदूपर्यंत पोहचवली जाते. त्यानंतर त्या माहितीचे मेंदूमध्ये विश्लेषण होऊन सजीवांकडून निर्णय घेतले जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेत अशाच प्रकारे विविध संवेदकांचं जाळं निर्माण केलेलं असतं. त्यांच्या मदतीनं या संजाळातील मुख्य संगणकापर्यंत माहिती पाठवली जाते. त्या माहितीच्या आधारे तो संगणक त्या माहितीचे विश्लेषण करून योग्य तो निर्णय घेतो.

Machine Learning technology

                कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी machine learning हे तंत्र वापरलं जातं. त्याच्या मदतीनं यंत्र किंवा संगणकाला शिकवलं जातं. त्या प्रक्रियेत दृष्य पाहणं, संकेतार्थांचं शिक्षण, संगणकाची दृष्टी, रोबोटिक्स अशा विविध बाबींचा समावेश होतो. Machine learning च्या मदतीनं संबंधित आज्ञावली (software) विविध उदाहरणांचे स्वत:हून अध्ययन करते. त्याच्या मदतीनं एक algorithm बनवून अंतिम निर्णय घेते आणि त्या निर्णयाच्या आधारे बौद्धिकदृष्ट्या अधिकाधिक संपन्न होण्याचा प्रयत्न करत जाते. IBM-Watson ला सुरुवातीला केवळ विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं देण्याच्या हेतूनं बनवलं गेलं होतं.

      कृत्रिम बुद्धिमत्तेत अशा प्रकारे एका यंत्राला अगदी मानवाप्रमाणं चालण्यापासून भाव-भावनांपर्यंतच्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यावेळी कोणत्या परिस्थितीत कसं वागावं, हे मानवाकडून यंत्राला शिकवलं जातं. एकदा यंत्राचं प्रशिक्षण पूर्ण झालं की, त्या यंत्राला स्वत:हून निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं. पुढं आपल्या आधीच्या निर्णयांच्या आधारे संबंधित यंत्र स्वत:हून नवीन गोष्टी शिकत जाते, त्याला machine learning म्हटलं जातं.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोग

  • डिजिटलीकरणाच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व बरंच वाढलेलं आहे. मानवापेक्षा वेगानं काम करू शकणाऱ्या यंत्रांचं महत्व आज वाढलेलं आहे. चिकित्सा, बांधकाम, अंतराळ संशोधन आणि मानवी जीवनाशी निगडीत विविध कामं करण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाची ठरू लागली आहे.
  • भविष्यात नॅनो तंत्रज्ञानातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू होईल. त्याच्या मदतीनं सूक्ष्म यंत्रमानव रुग्णांवर शस्त्रक्रिया करू शकेल. म्हणजे डॉक्टरांच्या अत्यल्प हस्तक्षेपानं यंत्राच्या आधारे जटील शस्त्रक्रिया पूर्ण केल्या जाऊ शकतील. वैद्यकीय क्षेत्रातील अन्य कार्यांमध्येही सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहेच.
  • क्रीडा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. सामन्याची उच्च क्षमतेची छायाचित्रं जलद गतीनं काढणं, प्रतिस्पर्ध्यांचे डावपेच पाहून आपले डावपेच रचणं यात कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करत आहे.
  • बांधकाम क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता लाभदायक ठरणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुधारणा करण्यासाठी तिचा वापर होत आहे.
  • अंतराळ संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेचं अतिशय महत्वाचं स्थान आहे. मानवासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या अंतराळ मोहिमांमध्ये याचा वापर वाढत आहे.
  • सायबर गुन्हेगारीमध्ये फसवणुकीचा शोध घेणे किंवा वित्तीय अनियमितता शोधून काढणे, वित्तीय देवघेवींवर देखरेख ठेवणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरत आहे.
  • सध्या वेगानं वाढत असलेल्या ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जात आहे.
  • विविध कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांची माहिती गोळा करणे, त्यांना संदेश पाठवणे, नव्या उत्पादनांची माहिती पाठवणे, सूची करणे इत्यादींसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे.
  • वाहतूक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं मोटारगाड्या, विमानांचं संचालन मानवी हस्तक्षेपाशिवाय केलं जात आहे.
  • कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा असा असणार आहे की, एकदा यंत्रामध्ये आपण आज्ञावली समाविष्ट केली की, ते यंत्र काम करण्यासाठी स्वत:चे नियम स्वत:च बनवेल.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रकार

  • प्रतिक्रियावादी यंत्र – ही यंत्र त्यांना जेवढं काम नेमून दिलं आहे, तेवढं करण्यासाठी सक्षम असतात.
  • मर्यादित साठवण (memory) – यामध्ये यंत्र आधीच लोड केलेल्या ज्ञान आणि निरीक्षणांच्या आधारे आपलं काम करतात.
  • मेंदूच्या सिद्धांवर आधारित – सध्या यावर वेगानं कार्य होत आहे. ही यंत्र भावना आणि व्यवहारांना समजून घेऊन त्यानुसार कार्य करण्यास सक्षम असतील.
  • आत्म जागरुकता – या प्रकारची संवेदना असलेलं यंत्रही बनवण्याचे प्रयत्न होत आहेत. ही यंत्र मानवाच्या आतील भावनांना समजून घेण्यास सक्षम असतील.

जॉन मॅकार्थींचं योगदान

      1950 च्या दशकात अमेरिकेतील डार्टमाऊथ कॉलेजमधील संगणकतज्ज्ञ जॉन मॅकार्थी यांनी उत्सुकतेपोटी संशोधन सुरू केलं की, एखादं यंत्र किंवा संगणक मानवाप्रमाणं सर्व क्रिया करू शकेल की नाही. त्याच विचाराला त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता असा शब्द वापरला होता. 1956 मध्ये त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात डार्टमाऊथ संमेलनाचंही आयोजन केलं होतं.

टिप्पण्या